Why Not Press Clutch While Braking: गाडी चालवताना प्रत्येकजण आपल्या सुरक्षिततेला प्राधान्य देतो. पण, अनेक वेळा अज्ञानामुळे आपण अशा चुका करतो, ज्याचा परिणाम थेट आपल्या जीवावर बेतू शकतो. गाडी चालवताना एक्सीलेटर, ब्रेक आणि क्लच ही तीन महत्त्वाची साधनं असतात. एक्सीलेटर वेग वाढवतो, ब्रेक वाहनाला थांबवतो, तर क्लच गिअर बदलण्यासाठी आणि इंजिनमधील पॉवर नियंत्रित करण्यासाठी काम करतो. पण, तुम्हाला माहिती आहे का, गाडीचा वेग जास्त असताना ब्रेक लावताना क्लच दाबणं किती प्राणघातक ठरू शकतं?

अनेक नवीनच नव्हे तर अनुभवी वाहनचालकदेखील ही गंभीर चूक सतत करत असतात. “ब्रेक दाबताना क्लचही दाबा” हा गैरसमज लोकांच्या मनात खोलवर घर करून बसलेला आहे. पण, प्रत्यक्षात हा उपाय तुमचं आणि तुमच्या गाडीचं मोठं नुकसान करू शकतो.

रस्त्यावर गाडी वेगाने धावत असते… आणि अचानक ब्रेक लावायची वेळ येते. पण, बहुतेक वाहनचालक नकळत एक मोठी चूक करतात. ब्रेकसोबत क्लच दाबतात. वाटतं की हा सुरक्षित उपाय आहे…, पण खरं सांगायचं तर ही चूक तुमच्या गाडीला थेट दरीकडे ढकलू शकते. होय, एका क्षणाची ही चूक जीवावर बेतू शकते…

नेमकं काय होतं क्लच दाबल्यावर?

क्लच दाबल्यावर वाहनाची चाके गीअर्सच्या पकडीतून पूर्णपणे सुटतात. म्हणजे उतारावर किंवा वेगात असताना जर तुम्ही क्लच दाबून ब्रेक लावलात, तर गाडीचा वेग अचानक ६०-७० पर्यंत झपाट्याने जाऊ शकतो आणि वाहन नियंत्रणाबाहेर जाऊ शकतं. अशावेळी ब्रेकसुद्धा नीट काम करत नाहीत आणि वाहन घसरत सुटतं. काही सेकंदातच अपघात होण्याची भीती वाढते.

क्लचचा चुकीचा वापर, वाढतं इंधनखर्च, खराब गाडी

जिथे क्लचची आवश्यकता नाही तिथे त्याचा वापर केल्यास इंधनाचा अपव्यय होतो. शिवाय सतत क्लचवर पाय ठेवण्याची सवय असल्यास क्लच प्लेट लवकर खराब होते. ही प्लेट बदलण्याचा खर्चही मोठा असतो.

नेमकं काय करावं?

ब्रेक लावताना नेहमी गाडीचा योग्य गिअरमध्ये वापर करा. क्लच फक्त गिअर बदलताना किंवा गरज असल्यावरच दाबा, अन्यथा अचानक क्लच दाबल्याने होणाऱ्या वेगवाढीमुळे तुम्ही आणि तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

म्हणूनच वाहनचालकांनो लक्षात ठेवा, “ब्रेक लावताना क्लच दाबू नका” हा फक्त सल्ला नाही, तर जीव वाचवणारा नियम आहे. पुढच्या वेळेस गाडी चालवताना हा धडा नक्की लक्षात ठेवा, नाहीतर एका क्षणाची चूक तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही, असा धक्का देऊ शकते.”