Monsoon Car Care: जून महिना सुरू झाला असला तरी अजूनही काही ठिकाणी हवा तसा पाऊस पडलेला नाही. पण, सध्याचे वातावरण पाहता कधी मुसळधार पाऊस सुरू होईल हे सांगता येत नाही. पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा कार चालवताना ती मध्येच बंद पडते. तुम्हीदेखील कारचालक असाल तर या दिवसात तुम्हाला तुमच्या कारची काळजी घ्यायला हवी.
पावसाळ्यात गाडी चालवताना कारची अशी घ्या काळजी
तुम्हीदेखील कारचालक असाल तर तुम्हाला आधीपासूनच गाडीची योग्य काळजी घ्यायला हवी. पावसाळ्यात हेडलॅम्प, इंडिकेटर आणि गाडीतील इतर महत्वाच्या गोष्टी आधीच तपासून पाहा. नाही तर तुम्हाला पावसाळ्यात गाडी घेऊन घराबाहेर पडल्यावर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
पावसाळ्यात स्पेअरसह तुमच्या टायर्सची स्थिती आणि ट्रेड लेव्हल तपासा आणि ब्रेक चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करून घ्या. तसेच कारचे वायपर ब्लेड आणि वॉशर सिस्टीम तपासून घ्या आणि सर्व लाइट्स आणि बॅटरी व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे तपासून पाहा.
पावसात तुमच्या पुढे असलेल्या गाडीपासून ठराविक अंतर ठेवा, कारण पावसामुळे रस्ता ओला झाल्यामुळे ब्रेक लावणं खूप कठीण असतं. त्यामुळे समोरच्या गाडीपासून थोडं अंतर राखण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून गरज पडल्यास इमर्जन्सी ब्रेक लावता येईल.
पावसाळ्यात तुमच्या कारच्या डीफॉगरचा वापर करा. जर तुमच्या कारमध्ये डिफॉगर नसेल तर एसीचा वापर करा आणि तापमान संतुलित राखण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे मॅन्यूअल एअर कंडिशनिंग सिस्टम असल्यास, डायलद्वारे दिशा बदलण्यास विसरू नका. खिडकीच्या काचेवर धुके असल्यास, खिडकी खाली करा आणि ती साफ करा. विंडशील्ड स्वच्छ ठेवा.
पावसाळ्यात क्रूझ कंट्रोल बंद ठेवा. रस्त्यावरील पाण्याचे प्रमाण नेहमीच बदलते आणि क्रूझ कंट्रोल सिस्टीम पाण्याची स्थिती आणि पातळी बदलण्याचा अंदाज लावू शकत नाही.
हेही वाचा: किंमत ५.५४ लाख, मायलेज ३४.०५ किमी; मारुतीच्या ‘या’ ३ स्वस्त कारला तुफान मागणी, खरेदीसाठी शोरुम्ससमोर लागल्या रांगा
रस्त्यात वेगाने गाडी चालवल्यास अनेकदा रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज लागत नाही, ज्यामुळे बऱ्याचदा अपघात होतात. त्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना टाळण्यासाठी गाडीचा वेग कमी ठेवा.
गाडी पाणी साचलेल्या ठिकाणी थांबल्यास ताबडतोब रिस्टार्ट करण्याचा प्रयत्न करू नका, कारण इंजिनमध्ये पाणी शिरले असल्यास या स्थितीत कार चालू करण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्या इंजिनचे गंभीर नुकसान होऊ शकते.