दमदार मायलेज आणि सुरक्षेचा विश्वास यामुळे ग्राहक टाटाच्या वाहनांना पसंती देतात. इंधनावर चालणाऱ्या वाहनांसह टाटाच्या ई वाहनांनाही मोठी मागणी आहे. मात्र, अशातच टाटाने मोठा निर्णय घेतला आहे. टाटाने आपल्या वाहनांची किंमत वाढवली असून उद्यापासून (७ नोव्हेंबर) ही किंमत लागू होणार आहे.
म्हणून किंमती वाढवल्या
वाहनांच्या किंमतीमध्ये सरासरी ०.९ टक्क्यांची वाढ होणार आहे. ही वाढ व्हेरिएंट आणि मॉडेलवर अवलंबून असणार आहे, असे टाटाने एका निवेदनातून सांगितले. कंपनी वाढलेल्या किंमतीचा मोठा भाग स्वत: सहन करत आहे. मात्र, इन्पुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याने वाहनांच्या किंमती वाढवल्याचे कंपनीने सांगितले. टाटा देशात टियागो, पंच, नेक्सॉन, हॅरिअर आणि सफारी या वाहनांची विक्री करते.
(वाहन विकण्यापूर्वी ‘हे’ काम आवर्जून करा, मोठे आर्थिक नुकसान टळेल)
ऑक्टोबर महिन्यात उत्पादनांची विक्री वाढली
एका अहवालानुसार, ऑक्टोबर महिन्यात टाटाने ४५ हजार ४२३ वाहनांची विक्री केली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा देखील समावेश आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात टाटाच्या ३४ हजार १५५ प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. यावरून वानांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. टाटाच्या वाहनांची मागणी वाढली आहे.
अलिकडेच लाँच केली टिआगो ईव्ही
टाटाने अलिकडेच स्थानिक बाजारात टिआगो ईव्ही लाँच केली आहे. हे ईलेक्ट्रिक वाहन ८.४९ लाख (एक्स शोरूम) ते ११.७९ लाख रुपयांपर्यंत मिळते. टिआगो ईव्हीमध्ये दोन बॅटरी पॅक देण्यात आले आहेत. १९.२ किलोवॉट हवरचा छोटा बॅटरी पॅक आणि २४.२ किलोवॉट हवरचा मोठा बॅटरी पॅक. छोट्या बॅटरी पॅकने २५० किमी रेंज, तर मोठ्या बॅटरी पॅकने ३१५ किमीची रेंज मिळत असल्याचा दावा केला जात आहे.