20 October 2020

News Flash

‘हवाई’ स्त्रीपुराण..

तरुण जोडप्यांची इतकी क्लासिक कुचंबणा करणाऱ्या देशांमध्ये आपला नंबर अव्वल लागेल.

माझे नशीब असे आहे की रडक्या लहान मुलाला घेऊन माझ्या शेजारी एखादी तरी बाई येऊन बसतेच

प्रवास करत असताना वेळ घालवण्यासाठी काय करायचे, याचे वेगवेगळे मार्ग प्रत्येक जण शोधत असतो. मला व्यवसायानिमित्ताने खूपच प्रवास करावा लागतो. प्रवासात वेळ घालवण्यासाठी मी शोधलेला मार्ग हा निरीक्षण करत जीव रमवणे हा आहे. या निरीक्षणामुळे माझा कॉन्फिडन्स इतका वाढला आहे, की मी एकदा मध्यरात्री एका रेल्वेच्या कर्मचाऱ्याला ‘लूज शंटिंग करू नकोस. मला ते अजिबात आवडत नाही,’ असे बजावले होते. आणि त्यानेही बिलकूल काळजी करू नका. बिनधास्त झोपा साहेब,’ असे सांगितले होते. रेल्वे जेव्हा ट्रॅक बदलत असते तेव्हा तर मी आवर्जून खात्री करून घेतो की- आपला डबा हा नक्की इंजिनला जोडलेल्या रेल्वेच्या तुकडय़ाला जोडलेला आहे की नाही, ते! मला अनेकदा अशी भीती वाटते, की आपला डबा जर नीट घट्ट आवळून गाडीला बांधला नसेल तर फाटय़ावर इंजिन जायचे इगतपुरीला आणि आपण जायचो लोणावळ्याला!

निरीक्षणाने माणसाचा अभ्यास वाढतो, यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे माझ्या अभ्यासाचा एक भाग म्हणून मी प्रवासातील स्त्रियांचे कायम निरीक्षण करत असतो. त्यापैकी विमानप्रवासातली स्त्रियांच्या वर्तनावर आधारित माझी काही अभ्यासपूर्ण निरीक्षणे मी आज नोंदवणार आहे. आता विमानप्रवासात मी स्त्रियांचे निरीक्षण करण्याचा पर्याय का निवडला, याचे कारण- अन्यथा दुसरा पर्याय हा गालगुंड झाल्यावर घ्यायची काळजी, किंवा सुका कचरा व ओला कचरा यांचे निर्मूलन यासंदर्भातल्या जाहिराती बघत बसणे हा होता. ‘विद्रुप्रनि’ हे सरकारचे खाते या जाहिरातींची जबाबदारी घेते. सरकारी जाहिरातींच्या खात्याच्या नावात ‘विद्रूप’ असणे हे विराट पारदर्शकतेचे लक्षण आहे. त्या जाहिरातींचे निरीक्षण करण्यापेक्षा स्त्रियांचे निरीक्षण करणे हा जास्त हुशार पर्याय आहे, हे तुम्हालाही पटेल.

नवऱ्याला बरोबर घेऊन प्रवासाला निघालेली स्त्री ही विमानतळावरची सर्वात सुंदर स्त्री. सुमारे पाच-सहा बॅगा बरोबर. त्यातल्या लॅपटॉपच्या आकाराच्या बॅगेत नवऱ्याचे कपडे. बाकी सगळ्या अजस्त्र बॅगा मॅडमच्या असतात. बाईंच्या गळ्यात पर्स. आणि नवरा उरलेले सामान फरपटत नेत असतो. पाठीवर विटा लादून निघालेले गाढव जसे पाय ओढत चालताना दिसते, तसे विमानतळावर बॅगा ओढत चाललेले नवरे दिसत असतात.

एका भारतीय स्त्रीला साधारण दोन दिवसांच्या प्रवासाला किती सामान बरोबर नेणे गरजेचे वाटते? हे गणित आज इतकी वर्षे झाली तरी भारतीय विमान कंपन्यांना सोडवता आलेले नाही. माणसाच्या गरजा अमर्याद असतात असे गीतेत म्हणून ठेवलेच आहे. (‘कोणता अध्याय?’ असे लगेच विचारू नका. नसेल लिहिले तर राहिले असेल लिहायचे! ) त्यामुळे या अमर्याद गरजांपैकी फक्त गरजेपुरते सामान प्रवासात बरोबर न्यायचे जेव्हा एखादी बाई ठरवते तेव्हा गरजेपुरत्या वजनाचा तिचा आणि विमान कंपनीचा हिशोब कधीच जुळत नाही. तुम्ही विमानतळावर बॅगा उघडून वजनाचे हिशोब जुळवण्यासाठी या बॅगेतले सामान त्या बॅगेत करणारा- आणि हे सगळे चारचौघांत जमिनीवर फतकल मारून बसून करावे लागत असल्याने संकोचलेला प्राणी जेव्हा बघाल, तेव्हा या सगळ्याला निमित्तमात्र ठरलेली स्त्री ‘इदं न मम् ‘भाव चेहऱ्यावर बाळगत शेजारी कॉफीचे घोट घेत उभी असलेली दिसेल. विमान कंपनीने ठरवून दिलेली सामानाच्या वजनाची मर्यादा योग्य आणि न्याय्य आहे, म्हणणारी मला अजून भेटलेली नाही. जगात आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल स्त्रियांना आक्षेप असतात. पण त्यातही विमान प्रवासाशी निगडित प्रत्येकच गोष्टीबद्दल त्यांना आक्षेप असतात. आपण आपल्या पर्समध्ये जर पाण्याची बाटली लपवली तर सिक्युरिटी चेकमध्ये स्कॅनिंग मशीनला ती दिसणार नाही असे जवळजवळ सर्वच स्त्रियांना वाटते. दुर्दैवाने स्कॅनिंग मशीन सहृदयी नसल्याने ते त्या पर्समध्ये लपवलेली बाटली दाखवते. १०० मिलीपेक्षा जास्त द्रव पदार्थ न्यायला आपल्याकडे परवानगी नाही. बाईसाहेबांनी विमानतळावर महागडी पाण्याची बाटली घेतलेली असते. ती अवघ्या काही पावलांवर नेऊन सिक्युरिटीमध्ये फेकून द्यायचे तिच्या जिवावर येते. तिच्या मनात हिशोब सुरू होतात. १०० रुपयांची बाटली.. आपण फक्त दोनच घोट प्यायलो.. अजून ८० रुपयाचे पाणी फेकून कसे देणार? मग ती उरलेले साधारण ४० रुपयाचे पाणी वाया जाऊ  नये म्हणून संपवते. आणि आता अजून पाणी पिणे शक्य नाही म्हटल्यावर मोठय़ा जड अंत:करणाने ४० रुपयांचे पाणी फेकून देते. सिक्युरिटीमधल्या अधिकारी स्त्रियांनी पाण्याची बाटली फेकून दे सांगितल्यावर ‘हम क्या दहशतवादी लगते क्या तुमको? दोन स्कूल में जानेवाले मुलगे हे मेरेको. टाइम है क्या मेरे पास बॉम्ब लेके जानेको?’ हा डायलॉग तर प्रत्येक दुसरी बाई ऐकवते. सिक्युरिटीच्या रांगेत एका वेळेला साधारण दहा पुरुष आणि दहा स्त्रिया उभ्या राहिल्या तर स्त्रियांना सिक्युरिटी चेक करून बाहेर पडायला तिप्पट वेळ लागतो असे विमानतळावरचे आकडे सांगतात. विमानतळावर आपल्याला थांबवून सिक्युरिटी चेक करतात हे बायकांना अजिबातच आवडत नाही. प्रवासाला जायचे म्हणून प्रत्येक बाईने पर्समध्ये बॉडी लोशन आणि असे बरेच काय काय द्रव पदार्थ घेतलेले असतात. सिक्युरिटी मशीनमध्ये सापडू नयेत म्हणून ओढणी किंवा रुमालात ते लपवलेले असतात. आणि मग ते सापडले की त्यांच्या पर्समधून सिक्युरिटीवाले ते काढून घेतात. बऱ्याच बायकांना असे वाटते की, त्यांचे लोशन किंवा बाकी गोष्टी सिक्युरिटीवाल्या महिला त्यांना आवडल्या तर मुद्दामच विमानात चालणार नाहीत म्हणून सांगून काढून टाकायला लावत असतील. १७-१८ वर्षांच्या मुलीबरोबर प्रवासाला निघालेल्या माय-लेकींची तर वेगळीच तऱ्हा. मुलगी थोडे अंतर सोडून पुढे किंवा मागे चालत असते. आपण आईबरोबर आलेलो नाही आहोत असे दाखवायचा तिचा प्रयास असतो. किंवा आई कशाला आली बरोबर, असे तरी भाव असतात. परदेशात शिकायला किंवा नोकरीला जर एकटी मुलगी निघाली असेल तर आपल्याकडे ती लगेच ओळखू येते. आई-बाबांच्या गळ्यात पडून रडण्याचा एक सोहळा होतो. मुलीला आधी बोर्डिग पास, मग सिक्युरिटी, मग इमिग्रेशन हे सगळे करायला बराच वेळ लागतो. तेवढा वेळ बाहेर तिला सोडायला आलेले काचेतून जिथवर ती दिसत राहील तिथवर तिला बघत राहतात आणि हात हलवत एकमेकांना चोरून डोळे पुसत राहतात.  टी-शर्ट, जीन्स, स्पोर्ट शूज.. टी-शर्टबाहेर काढलेले मोठे मंगळसूत्र आणि चेन, हातात बांगडय़ा, शूजमध्ये जोडवी, कपाळावर व भांगेत कुंकू.. आणि मुख्य म्हणजे हातात मोठा चुडा घातलेल्या मुली हे तर भारताचे वैभवच आहे. जगात कुठेही या अवतारातल्या मुली दिसत नाहीत. लग्नानंतर नवऱ्याबरोबर मस्त फिरायला जायचे सुटसुटीत कपडे तर घालतात; पण घरचे सोडायला येणार म्हणून आणि चुडा वगैरे लग्नानंतर काही दिवस काढता येत नाही म्हणून तेही बिचाऱ्या अंगावर वागवीत असतात. तरुण जोडप्यांची इतकी क्लासिक कुचंबणा करणाऱ्या देशांमध्ये आपला नंबर अव्वल लागेल.

विमानतळावर सर्वात गंमत जर कोणाची येत असेल तर दोन छोटय़ा मुलांना घेऊन प्रवास करणाऱ्या स्त्रियांची! एक कडेवर, एक हाताला. शक्य असेल तर एक ट्रॉलीवर चढून बॅगेवर बसते. भलीमोठी पर्स हे आपल्याकडे सौभाग्याचे लक्षण आहे, त्यामुळे ती तर गळ्यात असतेच. पण हल्ली लॅपटॉपची वेगळी बॅगही असते. थोडे मोठे मूल स्वत:ची म्हणून स्वतंत्र बॅग घेऊन निघालेले असते.. जे विमानतळावर आल्या आल्या आईच्या गळ्यात देते! टेडी नावाचे धूड कडेवरच्यासाठी आणलेले असते. भारतीय स्त्रियांचा सगळ्यात पॉप्युलर विभ्रम- ‘नवरा असताना जर ही सर्कस मलाच एकटीला घेऊन फिरावी लागत असेल तर नवऱ्याचा उपयोग काय?’- चेहऱ्यावर घेऊन हे सगळे विमानतळावर प्रवेश करतात. लहान मुलांना घेऊन फिरणारी बाई ही आधीच करवादलेली असते. आणि मी हे अनुभवले आहे, की ती अजून चिडेल अशाच घटना आजूबाजूला घडत असतात. जसे की- या सर्कसला जर गेट नंबर ६ ला जायचे असेल, तर उबेरवाला हमखास त्यांना गेट नंबर १ ला उतरवून देतो. विमानतळावर एक पाय लंगडा असलेली ट्रॉली- जी जाम ओढायला जड आहे- ती यांनाच मिळते. कडेवरचा सांभाळत आणि हाताशी धरलेल्याला सुरक्षित उभे करून पर्समध्ये शोधायला जावे तर कोणातरी एकाचा पासपोर्ट पर्सच्या घनदाट जंगलात अजिबात सापडत नाही. सापडला तरी एकाला कडेवर घेतलेले असल्याने मोकळ्या असलेल्या एका हाताने दुसरा मुलगा पकडायचा की ट्रॉली ढकलायची? म्हणून मग दुसऱ्याला ट्रॉलीवर बसवले जाते. जो पोलिसाला पाहिल्यावर  ट्रॉलीवरून उतरतो आणि परत आईच्या मागे लपतो. अशा सगळ्या गोंधळात बोर्डिग काऊंटपर्यंत पोहोचले तर चेक- इनमध्ये कोणत्या बॅगा द्यायच्या आणि केबिनमध्ये कोणत्या न्यायच्या, याचा निर्णय होत नाही. कॉम्प्युटर हाताशी धरलेल्याला नेमक्या चार रांगांमागचा बोर्डिग पास देतो. या सगळ्या धावपळीत एका मातेने घाईघाईत आपल्या कडेवरच्या लेकराला बॅगेच्या जागी वजन करायला ठेवून सुटकेस कडेवर घेतली होती. सिक्युरिटीमधून दुधाची बाटली घेऊन जायचा एक मोठा सोपस्कार अजून बाकीच असतो. विमानातून दुधाची बाटली बाळ बरोबर असेल तर न्यायची परवानगी आहे. पण सुरक्षितता म्हणून ते दूध अधिकाऱ्यांसमोर बाळाला द्यावे लागते. आता चमत्कार दाखवायची पाळी कडेवरच्याची असते. तो जाम बाटलीला तोंडच लावत नाही. कसेबसे त्यांना पटवून दुधाची बाटली बरोबर नेता येते.  हाताशी धरून चालवलेल्या पाच-सहा वर्षांच्या मुलाला तोवर शू लागते. तो अजून पोलिसांच्या प्रभावातून बाहेर आलेला नसतो. त्यामुळे तो एकटा शू करायला जाणे नाकारतो. ‘पुरुषांसाठी’ लिहिलेल्या जागी सोबत म्हणून तरी कसे जायचे? याने आई गोंधळते आणि शेवटी कोणातरी प्रवाशाला विनंती करून कुलदीपकाला ‘मोकळा’ करून आणते.

माझे नशीब असे आहे की रडक्या लहान मुलाला घेऊन माझ्या शेजारी एखादी तरी बाई येऊन बसतेच! मी एसटी, रेल्वे, विमान, जहाज कशानेही प्रवास केला तरी हे काही चुकत नाही. मी माझ्या नशिबाला गंडवायला अनेकदा जी माझी सीट असेल ती सोडून भलतीकडेच जाऊन बसतो. पण तरीही माझ्यामागचा हा लेकुरवाळा जाच काही सुटत नाही. मग आपण प्रवासात काहीतरी वाचायचे ठरवावे, तर शेजारचे बाळ आपल्या पोटात पाय मारते. आपण बसलेलो असतो तीच जागा त्याच्या मोठय़ा भावंडाला आवडते आणि ते आपल्याला ती जागा खाली करून द्यायला लावते. बाळाला घेऊन एखादी बाई येताना दिसली की मला तिची भाषा कशी कळत नाही असा आव मी आणतो. कारण आपल्याला भाषा कळते अशी एकदा खात्री पटली, की मग प्रवासातल्या सगळ्या वेळात आपल्याला त्या बाळाचे कौतुक ऐकावे लागण्याचा एक छुपा धोका असतो. जर्मन, केनियन, अरबी, जपानी स्त्रियांकडून मी प्रवासात त्यांचा बबडू कसा एकमेवाद्वितीय आहे याचे किस्से ऐकलेत. भरल्या विमानात आपलेच बाळ मोठय़ाने टाहो फोडते आहे आणि त्यामुळे इतरांना त्रास होऊ  शकतो, याने संकोचून जाणारी एकही बाई मी जगात कुठेही पाहिलेली नाही. एका बाईने मला मी गाढ झोपलेलो असताना उठवून तिच्या बाळाला उचलून समोर वर्तमानपत्र वाचायला धरतात तसे धरायला लावले होते आणि बाळाचे डायपर बदलले होते. मग नंतर मीही या घटनेचा सूड म्हणून जेव्हा तिचा डोळा लागला आणि तिची कुलदीपिका आणि मी असे दोघेच जण जागे होतो तेव्हा भेसूर भाव चेहऱ्यावर आणून तिच्या कुलदीपिकेला घाबरवले आणि रडायला लावले आणि तिची आई जागी झाल्यावर मग मी मस्त झोपी गेलो.

मंदार भारदे mandarbharde@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2017 1:02 am

Web Title: author insightful observations based on behavior of women in airplane
Next Stories
1 अभिव्यक्तिस्वातंत्र्य!
2 मित्रपुराण
3 डाराडूर
Just Now!
X