प्राची मोकाशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

At the stroke of the midnight hour,  when the world sleeps, India will awake to life and freedom…’

१४ ऑगस्ट १९४७.. म्हणजेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वसंध्येला पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या ‘Tryst with Destiny’ या अजरामर भाषणातून भारतीय बांधवांना स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा केली. त्या मध्यरात्री आपल्या देशावर दीडशे वर्षांहून अधिक काळ राज्य करणाऱ्या ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक’ मावळला आणि लालकिल्ल्याच्या लाहोरी गेटवर स्वतंत्र भारताचा ‘तिरंगा’ झळकला!

आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे सेनानी राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणायचे, ‘प्रत्येक राष्ट्राला त्याचा एक राष्ट्रध्वज हा हवाच. आपल्या देशात राहणाऱ्या हिंदू, मुस्लीम, ख्रिस्ती, ज्यू, पारशी आणि अशा अनेक बांधवांना- जे या देशाला आपलं घर मानतात- त्यांना एक ध्वज हवा; ज्यासाठी ते बलिदान करायला तयार होतील.’

मीच तो ‘तिरंगा’.. ज्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांचा तुरुंगवास भोगला. वेळप्रसंगी प्राणांची आहुती दिली. त्यांचा सदैव ऋणी असणारा मीच तो ‘तिरंगा’! केशरी आणि हिरव्या रंगांच्या आडव्या पट्टय़ांच्या मधोमध पांढऱ्या पट्टीवर निळ्या रंगाच्या अशोकचक्राने सुशोभित, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा मीच तो ‘तिरंगा’! स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला समस्त भारतीय स्त्रियांचं प्रतिनिधित्व करत स्वातंत्र्यसैनिक हंसा मेहता यांनी तो तिरंगा संसदीय समितीला सुपूर्द केला.. आपल्या भारत देशाचा ‘राष्ट्रध्वज’ म्हणून ज्याला सन्मान मिळाला, मीच तो ‘तिरंगा’!

हेही वाचा >>> बालमैफल : आजीच्या सुटकेची गोष्ट

१९२१ साली गांधीजींचे अनुयायी पिंगाला वेंकय्या यांनी एक तिरंगा बनवून गांधीजींना भेट केला, ज्यात केशरी आणि हिरवे असे दोनच रंग होते. गांधीजींनी त्यांच्यात पांढरा रंग आणि त्यावर चरख्याचं चिन्ह समाविष्ट करण्याचा बदल सुचवला. यापूर्वी जरी माझी अनेक रूपं निर्माण झाली असली तरी इथून माझ्या ‘घडण्या’ची खरी सुरुवात झाली. २२ जुलै १९४७ च्या संसदीय समितीच्या बैठकीत तिरंग्यावर चरख्याऐवजी ‘धर्मचक्रा’ला समाविष्ट करण्यात आलं. चक्रवर्ती सम्राट अशोकाला स्मरून धर्मचक्र हे चिन्ह ठेवण्याचा विचार आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा होता. या धर्मचक्राचा अर्थबोध खूप गहिरा आहे. ते प्रगतीचं द्योतक आहे. या चक्राला २४ आरे आहेत, जे दिवसाचे चोवीस तास दर्शवतात आणि निरंतर कार्यरत राहण्याचा संदेश देतात. ‘We have hard work ahead. There is no resting for any of us…’ पंडित नेहरू त्यांच्या भाषणातून देशवासीयांना हे सूचित करतात. या धर्मचक्रातील प्रत्येक आरा प्रेम, शौर्य, बलिदान, शांतता, सहकार्य, कर्तव्य अशा माणसामधील २४ गुणांचं प्रतीकदेखील आहे. प्रत्येक देशवासीयाने जर हे गुण अंगीकारले तर आपला देश प्रगतिपथावर नक्कीच अग्रेसर होईल.

जसं तिरंगा बघताक्षणी तुमच्या मनात देशप्रेमाचे उत्कट भाव जागे होतात, तसंच आपलं राष्ट्रगीत ‘जन गण मन’ जेव्हा तुम्ही एकत्र होऊन गाता, तेव्हा मलादेखील स्फुरण चढतं आणि मी जोमात फडकू लागतो. देशाला एका राष्ट्रध्वजाखाली एकसंध करणं हेच तर राष्ट्रगीताचं महत्त्व आहे! देशाचा इतिहास, परंपरा, संस्कृती, समृद्धी यांचं संक्षिप्त दर्शन जे घडवतं ते राष्ट्रगीत!

हेही वाचा >>> बालमैफल : खोटे बोलू नका!

‘भारतो भाग्यो बिधातो’ या बंगाली-संस्कृत भाषेमध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या कवितेतील सुरुवातीच्या काही ओळी म्हणजेच आपल्या भारताचं राष्ट्रगीत ‘जन गण मन’- जे त्यांनीच स्वरबद्धदेखील केलं आहे. या राष्ट्रगीताचं वैशिष्टय़ म्हणजे त्याची सहज-सोपी रचना आणि देशातील कुठल्याही भाषेत स्वीकारले जातील असे शब्द! पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग.. खऱ्या अर्थाने अनेकतेतून एकता साधणारं हे राष्ट्रगीत! नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत असताना कॅप्टन अबीद अली यांनी हे गीत हिंदी आणि उर्दूमध्येही भाषांतरित केलं. त्याचं शीर्षक होतं-‘शुभ सुख चैन’! पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रजासत्ताक होण्याच्या प्रवासात २४ जानेवारी १९५० च्या संसदीय समितीच्या बैठकीत या गीताला ‘राष्ट्रगीता’ची मान्यता मिळाली.

राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत ही त्या, त्या देशाच्या समृद्धीची प्रतीकं मानली जातात. या वर्षी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा बराच मोठा कालखंड आहे.. ज्यात घडलेल्या अनेक चांगल्या-वाईट घटनांचा मी साक्षीदार आहे! चांगल्या घटनांनी आपल्याला प्रेरणा दिली; तर वाईट घटनांनी शिकवण! ‘We end today a period of misfortunes and India discovers herself again….’ हे नेहरूंच्या भाषणातील वाक्य आजही समर्पक आहे. त्याचं अनुकरण करत, नकारात्मक घटनांना मागे टाकत आपण सगळे मिळून भारताच्या उन्नतीमध्ये सहभागी होऊ या.

हेही वाचा >>> बालमैफल : जादूचे खत

आपल्या राष्ट्रगीतामध्ये ‘भारत भाग्य विधाता’ हे भारताचं भविष्य सक्षमपणे आणि जबाबदारीने पेलवू शकणाऱ्या ‘शक्ती’ला म्हटलं आहे. ही शक्ती आहे, या देशाचा प्रत्येक नागरिक- जो जात- धर्म- रंग- वेष- भाषा यांच्या पलीकडे एकसंध होऊन केवळ भारताला ‘सुजलाम् सुफलाम्’ करण्यासाठी प्रयत्नशील राहील. आणि तेव्हाच आपल्या राष्ट्रगीतातील शब्दांना आणि मला- तुमच्या तिरंग्याला- पूर्णत्व मिळेल. चला तर पंडित नेहरूंच्या ‘The future beckons to us…’ या विश्वासाला सार्थ करत, खुणावत असलेल्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत राहू या! जय हिंद! mokashiprachi@100371492929925623940

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 75th independence day untold story of indian freedom zws
First published on: 14-08-2022 at 01:05 IST