शं. रा. पेंडसे
अभ्यास करीत असलेला तन्मय एकदम उठून आजीकडे आला आणि म्हणाला, ‘‘आजी, महागाई म्हणजे काय गं?’’ तन्मयच्या या प्रश्नानं आश्चर्यचकित होत आजी म्हणाली, ‘‘बाळा, कुठल्या धड्यात हा प्रश्न आला आहे?’’ आपण विचारलेला प्रश्न अभ्यासातला नाही हे आजीला कळल्यामुळे आजीच्या जवळ बसत तन्मय म्हणाला, ‘‘अगं आजी, त्या वरुणची आई त्याला सांगत होती की महागाई खूप वाढली आहे. आता खर्च कमी करायला हवा.’’ तन्मयचं अभ्यासातलं डोकं कुठं भरकटलं होतं हे आजीच्या लगेच लक्षात आलं. ‘‘तन्मय, अरे एखाद्या वस्तूची किंमत आपण पूर्वी दिलेल्या किमतीपेक्षा जास्त द्यावी लागते तेव्हा आपण म्हणतो वस्तू किती महाग झाली हो!’’
तन्मय आजीच्या तोंडाकडे पाहत राहिला. ‘‘आजी, मला किनई तूं बोललीस ना त्यातलं काही म्हटल्या काही कळलं नाही.’’
‘‘हे बघ, अगदी सोप्पं करून सांगते. तू ज्यात वह्या-पुस्तके ठेवतोस ना त्या दफ्तराला पूर्वी शंभर रुपये पडायचे, आता त्याच दफ्तराला दोनशे रुपये पडतात. म्हणजेच गेल्या वेळेपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात म्हणजेच ती वस्तू महाग झाली!’’
आजीचं हे उदाहरण तन्मयला बरोब्बर कळलं. तन्मय लगेच म्हणाला, ‘‘अगं आजी, आमची ड्रॉइंगची चित्रं रंगवण्याची वॉटर कलरचा बॉक्स आता ऐंशी रुपयाला मिळतो.’’
आजी लगेच म्हणाली, ‘‘अरे तोच बॉक्स पूर्वी चाळीस रुपयाला मिळत होता.’’
टाळ्या वाजवीत तन्मय म्हणाला, ‘‘म्हणजेच कलरचा बॉक्स महाग झाला. महागाई वाढली. आता मला कळलं महागाई म्हणजे काय ते?’’
तोच तन्मयची आई विनया ऑफिसमधून घरी आली. ‘‘काय आजी-नातवाच्या गप्पा चालल्या आहेत वाटतं?’’
‘‘आई, आज मला आजीनं महागाई म्हणजे काय ते सोप्या भाषेत सांगितलं.
‘‘तन्मय, तू बाजारात आलास ना तर तुला ही महागाई पदोपदी दिसेल.’’ तन्मय आईकडे पाहतच राहिला. ‘‘सासूबाई, तूरडाळ एकशे ऐंशी रुपये किलो झाली आहे. आणि कांद्यांनी सत्तरी गाठली आहे. एका नारळाला पंचवीस रुपये मोजले मी.’’ विनया सांगत होती.
आजी तन्मयकडे बघून जणू काही सांगत होती, बघ बघ… अरे, महागाई म्हणजे काय ते तुला कळेल.
‘‘आजी, महागाईचा अर्थ तर कळला, पण महागाईच्या आधी काय असतं?
‘‘तन्मय, खूप चांगला प्रश्न विचारलास. ज्या वेळी तूरडाळ शंभर ते एकशेवीस रुपये किलो मिळत होती; तेव्हा ती आजच्या मानाने स्वस्त होती. कांदे तेव्हा चाळीसने मिळत होते, तर नारळ पंधरा रुपयाला मिळत होता. म्हणजेच आजच्या मानाने स्वस्ताई होती.
‘‘आजी, म्हणजे महागाई नसते तेव्हा स्वस्ताई असते. स्वस्ताई… स्वस्ताई… स्वस्ताई…’’
आजी तन्मयला म्हणाली, ‘‘अरे, या स्वस्ताईच्यासुद्धा गमतीजमती आहेत.’’
‘‘आजी, मलाही सांग ना!’’ तन्मय म्हणाला. म्हणजे बरोब्बर चाळीस वर्षांपूर्वी एक किलो तूरडाळ म्हणजे आपल्याला भातावरचं वरण करायला लागते ती कशी मिळत होती ठाऊक आहे?’’
‘‘कशी?’’ तन्मय उत्सुकतेनं म्हणाला.
आजीनं बाजूच्या टेबलावरची दोन नाणी तन्मयच्या हातात दिली. ‘‘आजी, हे एक नाणे दोन रुपयांचे अशी दोन नाणी म्हणजे चार रुपये.’’
‘‘तन्मय, चाळीस वर्षांपूर्वी ही दोन नाणी घेऊन तू बाजारात गेला असतास तर एक किलो तूरडाळ घेऊन आला असतास. अरे, चार रुपयाला एक किलो तूरडाळ, एक किलो गहू आणि एक किलो गूळ वा साखर मिळत होती!’’
‘‘अरे बापरे… इतकी स्वस्ताई होती. आई तर बाजारात जाताना हल्ली पाचशे रुपयांची एक नोट पाकिटात घालते. कारण महागाई… महागाई.’’
आजी तन्मयला जवळ घेत म्हणाली, ‘‘बाळा, आता महागाई म्हणजे काय आणि स्वस्ताई म्हणजे काय हे तू कधी विसरणार नाहीस ना.’’
‘‘खरंच आजी, कधीच नाही. आणि आता मी खर्चही कमी करेन.’’
shankarpendse@yahoo.in