महानगरी मुंबईत सुट्टी घालविण्यासाठी आलेले अकबर बादशहा आणि बिरबल संध्याकाळच्या रम्य वेळी समुद्रकिनाऱ्यावरून फेरफटका मारत होते. सूर्यास्ताची ती आनंददायी वेळ असूनही बादशहा अबोलपणे येरझारा घालत होता. त्याच्या मनात खूप काही शिजत असलं पाहिजे, हे बिरबलाला एवढय़ा वर्षांच्या सहवासावरून सहज लक्षात आलं होतं. एखादा राजकारणी डावपेच तरी आखला जात असावा. किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय लवकरच जाहीर करण्याची योजना आखली जात असावी; वा कोणतातरी नवीन फतवा काढला जाण्याची तयारी खाविंद करीत असावेत, हे बिरबलाच्या लक्षात आले होते. पण वेळ आली की ते सारं सर्वाच्या आधी आपल्यालाच कळणार याची खात्री असल्याने, त्याने तोंडात मिठाची गुळणी घेतली होती. तिन्हीसांजा उतरून रात्र चढायला लागण्याच्या अगोदर बादशहाकडे वळून बिरबल म्हणाला, ‘‘माफी असावी सरकार. आज मुलांना घेऊन बाहेर जेवायला जायचं ठरवलं आहे, तसं घरी सांगूनही आलो आहे. हुजुरांनी लवकर जाण्याची परवानगी द्यावी.’’ पण बादशहा आपल्याच विचारात मग्न होता. बिरबलाच्या या मागणीवर त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. बिचारा बिरबल निमूटपणे बादशहाबरोबर येरझारा घालत राहिला. एकदम बादशहाच्या येरझारांचा वेग वाढला आणि वाढतच गेला. बिरबल कसाबसा त्या वेगाशी जुळवून घेत होता. इतक्यात बादशहा अचानक थबकला आणि जोरकस स्वरात म्हणाला, ‘‘बस्स बिरबल ठरलं, एकदम पक्कं ठरलं, महाराष्ट्रातून मराठी एकदम हद्दपार करायची. काही गरज नाहीए इथे मराठीची. एक लक्षात आलंय का बिरबल? इथे फारसं कोणी मराठीत बोलतच नाही. दुकानदार, टॅक्सीवाले, भाजीवाले, शाळा-कॉलेजातील मुलं अनेकजण िहदी किंवा इंग्रजीतच बोलतात. आणि ते सगळ्यांना समजतं, मग काय गरज आहे मराठीची. बरं जे कोणी मराठी बोलतात ते किती चुकीचं बोलतात ते ऐकलंस ना. ‘म्हणाला’, ‘सांगितलं’, ‘ओरडला’ यातला भेदच लक्षात घेत नाहीत हे. सगळ्यासाठी सरसकट ‘बोल्ला’ म्हणतात नि मोकळे होतात. ‘भेटला’ आणि ‘मिळाला’ यातला फरक नाहीसाच झालाय.  ‘न’ आणि ‘ण’ योग्य रितीनं उच्चारणं बहुधा गुन्हा असावा की काय? ‘च’च्या उच्चारातील फरक जसा ‘चमचा’ आणि ‘चंद्र’ म्हणताना करावा लागतो तो समजूनच घेतला जात नाही अनेकदा. अरे, ‘जंगल’मधील ‘ज’ जर मधल्या ‘ज’सारखा उच्चारला जातो. मला वाटतं बिरबल, अशी मोडकीतोडकी मराठी बोलण्यापेक्षा आपण कायद्याने मराठी हद्दपारच केली की काम होईल. तेव्हा उद्या आलास की पहिल्यांदा फतवा काढ की, आजपासून कोणीही मराठीत बोलण्याची गरज नाही. सर्वानी मराठीव्यतिरिक्त कोणत्याही भाषेत संवाद साधावा.’’
नेहमीच्या अनुभवावरून बिरबल जाणून होता की आत्ता गप्प राहणे शहाणपणाचे आहे. त्यामुळे त्याने तेच केले. बादशहाची परवानगी घेऊन निघाला आणि पुढची रात्र मुलांबरोबर मौजमजेत घालवली.
दुसऱ्या दिवशी प्रभातफेरीसाठी बिरबल नेहमीप्रमाणे पहाटेच हजर झाला. आज बादशहाही प्रसन्न दिसत होता. चालता चालता बादशहाने चौकशी केली, ‘‘काय बिरबल, कसा काय झाला हॉटेलमधला खाना?’’ म्हणजे काल आपण परवानगी विचारली तेव्हा यांनी ऐकलं होतं तर, बिरबल मनातल्या मनात म्हणाला. नेहमीप्रमाणे चेहेऱ्यावर मिश्कील हास्य आणत तो म्हणाला, ‘‘हुजूर, माफी असावी. काल आपण मला लवकर घरी जायची परवानगी दिली नाही त्यामुळे माझी मनातल्या मनात फार चिडचिड झाली होती. त्यातच तो रिक्षावाला माझ्या घराच्या दिशेने येत नाही म्हणाला हे ऐकून मी संतापलो. बस स्टॉपवर गेलो तर ही गर्दी. कसाबसा बसमध्ये चढलो. तर कंडक्टर मला सट्टय़ा पैशावरून बडबडला, तेव्हा माझा संताप संताप झाला अगदी. त्याच रागाच्या तिरमिरीत घरी पोहोचलो तर मुलांनी मी वेळेवर आलो नाही म्हणून घर डोक्यावर घेतलं होतं. ते बघून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. घरात गेल्या गेल्या माझ्या पत्नीने उशीर का झाला म्हणून लागोपाठ प्रश्न विचारून मला भंडावून सोडलं आणि माझा रागाचा पारा प्रचंड चढला. रागाने तणतणतच घरातून बाहेर पडलो. बाहेर पडल्यावरही मी रागाने धुमसतच होतो. काही केल्या माझा राग शांत होतच नव्हता. सगळे प्रसंग पुन्हापुन्हा आठवून अंगाचा तिळपापड होत होता. मी दिशाहीनपणे भटक भटक भटकलो. शेवटी तुम्ही सांगितलेली युक्ती आठवली महाराज. खूप राग येवून तो आनावर झाला तर दीर्घ श्वसन करावे. समुद्रकिनारी बसून तोच उपाय केला तेव्हा राग थोडासा निवळला आणि मी घरी परतलो. मुलंही बाहेर जाणं रहीत झालं म्हणून रागाने मुसमुसतच झोपली म्हणे. आज सकाळीही सगळेजण रागाने खदखदत असलेले मला स्पष्ट जाणवलं. संध्याकाळी गेल्यावर बहुधा त्यांच्या रागाचा स्फोट होईल आणि मला तोफेच्या तोंडी जावं लागेल बहुधा.’’
‘‘या अल्ला, बिरबल काल केवढी वाईट संध्याकाळ गेली रे तुझी. अरेरे, बिच्चारा. पण आज घरी गेल्यावर त्यांना खूश करायची युक्ती नाहीए का काही?
‘‘आहे ना. आज त्यांनी म्हटल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी मी जर का करू शकलो तर त्यांच्या रागाचा पारा खाली येईल नाहीतर तो इतका वर चढेल की या क्रोधाच्या आगीत माझा संसार होरपळून निघेल खाविंद.’’ तेव्हा हुजूर, आज तरी मला लवकर घरी जाण्याची परवानगी देऊन माझ्यावर कृपा करावी.’’ परवानगी आहे बिरबल, पण मला खरं सांग, तू सांगतोय ते सगळं खरं आहे? तुला अभय आहे बिरबल.’’
‘‘ महाराज चुकांबद्दल क्षमा असावी. भावना अचूकरित्या व्यक्त करण्यासाठी मातृभाषेसारखी उत्तम भाषा नाही. आपण राज्यातून मराठी भाषा हद्दपार केली तर  माणसं व्यक्त कशी होणार? आता हेच पहा ना, चिडचिड, राग, क्रोध, संताप इत्यादी वेगवेगळ्या शब्दांनी राग या एकाच भावनेची तीव्रता किती अचूकतेने आणि परिणामकारकतेने पोहचवता येते. ते आत्ताच मी तुम्हाला दाखवून दिलं. याचप्रमाणे  आनंद, दु:ख, प्रेम, खेद यांसारख्या भावनांची तीव्रता मराठी भाषेमुळे अचूक पोहोचवता येते महाराज. भावना जर योग्य शब्दांत आणि योग्य रितीने पोहोचवाता आल्या तर संभाषण परिणामकारक होतं. मराठी भाषेमध्ये भावना पोहोचविण्याची खूप मोठी ताकद आहे. तिची शब्दसंपदा समद्ध आहे. त्यामुळे इतर भाषा मराठीपेक्षा चांगल्या आहेत वा त्या व्यवहारात मोठय़ा प्रमाणात उपयोगात आणल्या जातात म्हणून मराठी पूर्णपणे हद्दपार करणं खरंच योग्य ठरेल का महाराज? आणि जर आपल्या भाषेतून भावना अचूकतेने पोहोचवता आल्या तर अरे हो, भा. पो. वगैरे म्हणावं लागणार नाही. खाविंद, भावनांच्या बिनचूक व्यक्ततेतून माणसामाणसातील बंध बळकट होतात. आणि माणसांमधील बंध बळकट झाले तर समजाला आणि राष्ट्रालाही बळकटी येते.
‘‘तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे बिरबल. भाषेचा नूर बदलतो ती वापरण्याची पद्धत बदलते पण भाषा कधीही टाकाऊ होत नसते. पण एवढं सगळं झालं तरीही मी फतवा काढणार आहे.’’
बादशहाच्या या वाक्यावर बिरबलाने चमकून पाहिलं. त्यावर गालातल्या गालात गालात हसत बादश्हा म्हणाला, ‘‘तो मराठी भाषा हद्दपार करा असा नाही, तर मराठी भाषा बळकट करा. तिला समृद्ध करा असा. मराठीच्या शुद्धतेकडे सर्वानी लक्ष द्यावं. किमान रोजच्या संवादासाठी अचूक मराठीचा वापर करावा, असंही असेल त्या फतव्यात. पण आतातरी खरं सांगशिल का काल तू काय केलंस नक्की?’’ बादशहा त्याच्या नेहमीच्या सवयीनुसार खो खो हसत म्हणाला. यावर बिरबलाने बादशहाकडे एक आनंदी कटाक्ष टाकला आणि तो सांगू लागला, ‘खाविंद..’