‘‘समीर, मी ऑफिसला जायला निघते आहे. तू तुझी खोली साफ करून ठेव. मला तुला रोज तेच तेच सांगायचा कंटाळा आला आहे. मी ऑफिसमधून आल्यावर मला घर टापटीप दिसलं पाहिजे.’’ समीरच्या आईने ऑफिसला जाताना समीरला जरा दरडावूनच सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘ होऽऽऽय. तू गेल्यावर बघ मी घर कसं लखलखीत करतो ते,’’ असं म्हणून तो त्याच्या मोबाइलमध्ये डोकं घालून बसला. समीर एक नंबरचा आळशी मुलगा होता. आईचा लाडकाही होता. त्यामुळे आईच्या रागाला तो फारशी दाद द्यायचा नाही. दुपारी जेव्हा समीरच्या पोटात कावळे ओरडू लागले तेव्हा कुठे त्यानं हातातला मोबाइल बाजूला ठेवला आणि तो स्वयंपाकघरात जेवायला काय आहे ते बघायला गेला.

हेही वाचा – चित्रास कारण की.. : नोटांची गंमत

‘ओह नो!’ शिराळऱ्याची भाजी आणि पोळी बघून त्याचा मूडच गेला. ‘आईला दुसरं काही बनवायला सुचतच कसं नाही!’ समीरच्या मनात आलं. ‘शेजारच्या आशीषदादाच्या घरातून किती छान वास येतात. त्याची आई नेहमी घरी असते आणि किती छान छान पदार्थ बनवते. अलीकडे त्याच्या आईनं काही पाठवलं नाही बरेच दिवसांत!’ चवदार पदार्थाच्या आठवणीनं समीर बेचैन झाला. समीरनं त्या दिवशी स्वत: ऑमलेट करून खायचं ठरवलं. त्यानं फ्रिजमधून अंडी आणि चीज बाहेर काढलं. फ्राइंग पॅन काढला. मोठ्ठं ऑमलेट करायचं म्हणून मोठ्ठंच पॅन घेतलं. ‘आई हॅम का आणत नाही कोण जाणे!’ असं म्हणत त्यानं समीर स्पेशल ऑमलेट बनवायला सुरुवात केली. काड्यापेटीच्या बऱ्याच काड्या वाया गेल्यावर एकदाचा गॅस पेटला. अंडी फेटता फेटता भांडं कलंडून थोडं फेटलेलं अंडं वाया गेलं. ओट्यावर सगळा राडा झाला. अंड्यात काही तरी काळी पावडर घालतात ती न मिळाल्यामुळे मोहरी दिसली तीच समीरने फेटलेल्या अंड्यात घातली. गडबडीत पॅनमध्ये तेल घालायला समीर विसरला आणि पुढे जो पदार्थ तयार झाला तो अर्थातच समीरनं खाण्यालायक नव्हताच.

सगळा पसारा तिथेच सोडून समीर रागारागानं बाहेर गेला पिझ्झा, वडापाव खायला. बाहेरच खाऊन समीर मित्रांच्या अड्ड्यावर जाऊन बसला. मोबाइल बघत गप्पा मारत जो बसला तो संध्याकाळी आई यायच्या वेळेलाच घरी परतला. समीर आणि आई घरात शिरून पाहतात तर काय! घर एकदम लखलखीत होतं. स्वयंपाकघरही चकाचक दिसत होतं.

‘‘समीर, अरे किती छान ठेवलं आहेस घर! गुणी गं माझं बाळ.’’ असं म्हणत आईनं समीरला शाबासकी दिली. समीर घर पाहून चकित झाला होता. तो आळशी होता; पण सहसा खोटं बोलत नसे. त्यानं आईला सत्य तेच सांगितलं. ‘‘मग हे काम कोण करून गेलं असेल बरं!’’ असा प्रश्न दोघांनाही पडला. “चोर तर नक्कीच नाही. भूत असेल का?” आई विचारात पडली; पण समीर आणि त्याची आई दोघांचाही भुताखेतावर विश्वास नव्हता. त्यातून भूत दुपारी नाही येत म्हणतात. त्यांच्या कामाच्या नलिनीबाई नुकत्याच पंधरा दिवसांपूर्वी वारल्या होत्या. त्यांचं भूत नसेल ना येऊन साफ करून गेलं! असंही दोघांच्या मनात येऊन गेलं; पण नलिनीबाई जिवंत होत्या तेव्हाही उत्तम काम करत नसत, तर भूत बनून कशाला येतील कामाला!

चोर नाही, भूत नाही, मग कोण असेल बरं! अशा चिंतेत आई म्हणाली, ‘‘पोलिसांत जाऊ या बाबा.’’ पण समीर महा वस्ताद! तो म्हणाला, ‘‘आई, फुकट कोणी तरी काम करून जातंय, बरं आहे की.’’ ‘‘मी उद्या रजा घेते ऑफिसमधून. तूही थांब घरात. बघू या कोण येतं ते घर साफ करायला.’’ रात्री झोपल्यावर आईला उगाचच स्वयंपाकघरातून आवाज येताहेत असे भास होत होते. तिनं दोन-तीन वेळा उठूनही पाहिलं; पण घर तसंच स्वच्छ होतं आणि घरात कोणीही फिरत नव्हतं. नलिनीबाईंचं भूत नव्हतं, या विचारानं नाही म्हटलं तरी आईला हुश्श झालं. सकाळ झाली. दुपारच्या जेवणाची वेळ झाली; परंतु घरसफाईला कोणीही आलं नाही.

‘‘आई, चल ना समोरच्या उडप्याकडे जाऊन पटकन काही तरी खाऊन येऊ. तिथून आपलं घर दिसतंसुद्धा. कोणी आत शिरताना दिसलं तर चटकन घरी जाऊन पकडता येईल. मला जाम भूक लागली आहे.’’ समीर म्हणाला आणि दोघेही जेवायला बाहेर पडले. जेवून घरी परतल्यावर त्यांना घराचं दार थोडं उघडं दिसलं. दोघेही खूश झाले कोण साफ करून जातं त्याचा निकाल लागणार म्हणून. आईनं घरात प्रवेश केला आणि तिला स्वयंपाकघरात हालचाल जाणवली. ‘‘कोण आहे?’’ तिनं ओरडून विचारलं, पण आतून उत्तर आलं नाही.

तिने समीरचा हात गच्च धरून स्वयंपाकघरात प्रवेश केला आणि समोरचं दृश्य पाहून तिला घेरी आली. समोर भांडी धूत असलेल्या विचित्र मशीनला पाहून ते दोघेही खूप घाबरले; पण साक्षात रोबोला भांडी घासताना पाहून समीर मात्र खूश झाला. आईला पडताना पाहून रोबोनं तिच्यावर ताबडतोब पाणी शिंपडलं आणि तो पुन्हा भांडी धुऊ लागला. समीरनं प्रसंगावधान राखून मोबाइलवरून व्हिडीओही घ्यायला सुरुवात केली. त्याला त्याच्या घरात रोबो भांडी घासतोय असा व्हिडीओ त्याच्या मित्रांच्या अड्ड्यावर दाखवायला मिळणार म्हणून आनंद झाला होता.

हेही वाचा – बालमैफल: संकल्प करावा नेटका

आई डोळे विस्फारून सर्व पाहात तशीच उभी राहिली. रोबो स्वयंपाकघर आवरून समीरच्या खोलीत जाऊ लागला आणि त्याच्यामागून समीर त्याची खोलीही कशी साफ होतेय ते पाहायला रोबोच्या मागून गेला. त्याचा व्हिडीओ चालूच होता. पण.. तिकडे रोबोचा मूड बदलला. तो काही तरी पुटपुटत समीरचं सामान अस्ताव्यस्त फेकत राहिला. ‘‘यो डो इट. यो डो इट.’’ असं पुटपुटत तो रागावून जोरजोरात सामान फेकून घराबाहेर निघून गेला आणि शेजारच्या घरात शिरला.

हे कृत्य कोणाचं असणार हे समीरच्या ताबडतोब लक्षात आलं. शेजारचा आशीषदादा रोबॉटिक्स शिकत होता आणि त्याचंच हे काम होतं. आशीषदादा त्यांच्या घरातून समीरची मजा हळूच पडद्यामागून पाहात होता. त्यांच्याकडे समीरच्या घराची एक चावी असते, त्यामुळे त्यानं रोबोचा प्रयोग समीरवर करून पाहिला.

आशीषचा प्रयोग सफल झाला. समीरही मस्तपैकी रुळावर आला. रोबोमुळे का होईना, समीर त्यापुढे घर व्यवस्थित ठेवू लागला ही त्याच्या आईसाठी खूपच आनंदाची गोष्ट झाली. थोड्याच दिवसांत पेपरमध्ये बातमीही आली, ‘आशीष देशमुखचा घर स्वच्छ करणाऱ्या रोबोचा शोध!’

vidyadengle@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balmaifil child too lazy to clean house robot cleaned the house what happened next ssb
First published on: 14-01-2024 at 00:10 IST