एकनाथ आव्हाड यांची ‘आनंदाची बाग’, ‘मजेदार कोडी’, ‘पंख पाखरांचे’, ‘एकदा काय झालं’ ही पुस्तके मुलांचे चांगलेच मनोरंजन करतात.
‘आनंदाची बाग’ हे पुस्तक मुलांना आनंदाच्या राज्यात घेऊन जाणारं आहे. या कथांमधील मुलांची निरागस, जिज्ञासू वृत्ती वाचकाला भावते, विशेषत: लहानग्यांना खूप आपलीशी वाटते. या कथांमधला सूर्य रुसून बसतो, तसेच इथली आगळीवेगळी शाळा हवीहवीशी वाटते. संगणक मुलांचा मित्र बनतो. मुलांना आवडतील अशा या कथा आहेत. याचबरोबर ‘मजेदार कोडी’ या पुस्तकातील कोडय़ांमधून मुलांना उत्तरे शोधायची आहेत. ही कोडी नादमय असल्याने ती गुणगुणली जातात. प्राणी, पक्षी, निसर्गातील विविध गोष्टी, खेळ, कॅलेंडर, अशा विविध गोष्टीवर ही कोडी आधारीत आहेत. ‘पंख पाखरांचे’ या जोडाक्षरविरहित कविताही वाचनीय आहेत.‘एकदा काय झालं’ हा कथासंग्रह मुंलांना ‘घडविणारा’ आहे.
‘आनंदाची बाग’, ‘मजेशीर कोडी’, ‘पंख पाखरांचे’, ‘एकदा काय झालं’ – एकनाथ आव्हाड, अनुक्रमे- दिलीपराज प्रकाशन, किंमत- ८० रुपये,अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, किंमत- ६० रुपये, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, किंमत- ४० रुपये, दिलीपराज प्रकाशन, किंमत- ८० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सलीमसरांचा समीर’, ‘जुईबाईंची गमाडी गंमत जमाडी जंमत’
उषा मेहता यांची ‘सलीमसरांचा समीर’, ‘जुईबाईंची गमाडी गंमत जमाडी जंमत’ ही दोन्ही पुस्तके लहानग्यांचे भावविश्व उलगडतात. ‘सलीमसरांचा समीर’ही एक रहस्यकथा आहे. एक शाळकरी खोडकर, पण सच्च्या मनाचा हा मुलगा आहे. या कथेचा नायक साहसी आहे, पण अतिरेकी वृत्तीचा नाही. असा हा समीर आणि त्याच्या सलीमसरांची ही गोष्ट उत्तम आहे.
‘जुईबाईंची गमाडी गंमत जमाडी जंमत’ हा कथासंग्रह म्हणजे छोटय़ांचं मनोहारी भावविश्व! जुईच्या बालसुलभ मनाला पडलेली ही स्वप्नं अनोख्या बालविश्वाची सैर घडवतात.
‘सलीमसरांचा समीर’, ‘जुईबाईंची गमाडी गंमत, जमाडी जंमत’- उषा मेहता, ग्रंथाली प्रकाशन,
किंमत अनुक्रमे ८० रुपये, ६० रुपये

‘करू या मैत्री निसर्गाशी’
सुजाता लेले यांचे ‘करू या मैत्री निसर्गाशी’ हे पुस्तक म्हणजे लहानग्यांसाठी एक पर्वणीच आहे. निसर्गाची ओळख अगदी साध्या- सोप्या भाषेत लेखिका मुलांना करून देते. निसर्ग कसा अनुभवायचा याचा धडाच लेखिका देते. अनुभवकथन करतानाच लेखिका वृक्षवल्ली, हत्ती, वाघ, सिंह, जलचर व उभयचर, पक्षी यांची ओळख करून देते व अनेक माहितीपूर्ण गोष्टींचा उलगडा करते. उत्कृष्ट छपाई आणि चित्रांमुळे हे पुस्तक अधिकच वाचनीय झाले आहे. निसर्ग आपला मित्र आहे, त्याच्यासोबत खेळा, बागड, असा मौलिक संदेश लेखिका आवर्जून देते.
करू या मैत्री निसर्गाशी- सुजाता लेले, रिनायसन्स पब्लिकेशन्स, किंमत- १७० रुपये

‘आभाळाची खुशी’
रश्मी गुजराथी यांच्या ‘आभाळाची खुशी’ या कवितासंग्रहाचा विशेष म्हणजे कविता आणि चित्र असे याचे स्वरूप आहे. कवितेच्या शेजारीच त्या कवितेवर आधारीत चित्र दिले आहे. त्यामुळे कवितेबरोबरच चित्र रंगविण्याचा आनंदही मुले घेऊ शकतात. हे पुस्तक मुलांना कविता आणि चित्र असा दोन्हींचा आनंद देते.
या कवितांमधील स्वप्नांची गाडी ही खाऊने भरलेली आहे. या कवितांमध्ये ढगांची शाळा भरते, तर चांदोबाही आगळावेगळा हट्ट करतो.
आभाळाची खुशी- रश्मी गुजराथी
संयम पब्लिकेशन, पुणे, किंमत- ७० रुपये

रंजक विज्ञान
‘रंजक विज्ञान’ हे अनिल दांडेकर यांचं पुस्तक म्हणजे वैज्ञानिक गोष्टींची रंजक माहिती. साध्या-सोप्या भाषेत यात विज्ञानातील काही गूढ गोष्टींची माहिती वाचकांसमोर उलगडली आहे. नखांवरून मानवी आरोग्य कसे ओळखता येईल, रडारच्या शोधासाठी वटवाघुळे कशी सहाय्यभूत ठरली, वाळूचे टिकाऊ किल्ले, ताम्रयुगाचा शोध, सागरी पाण्यापासून ऊर्जानिर्मितीचा प्रयोग अशा अनेक महत्त्वपूर्ण आणि मनात कुतूहल निर्माण करणाऱ्या गोष्टींची माहिती लेखकाने करून दिली आहे.
रंजक विज्ञान- अनिल दांडेकर,
दिलीपराज प्रकाशन, किंमत- ८० रुपये.

‘बेटू आणि इतर कथा’, ‘अंगणवनातील कथा’
विद्यालंकार घारपुरे यांचे ‘बेटू आणि इतर कथा’, ‘अंगणवनातील कथा’ हे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘बेटू आणि इतर कथा’ या पुस्तकातील कथा म्हणजे रंजक आणि बोधक अशा म्हणता येतील. विज्ञाननिष्ठ, अंधश्रद्धा निर्मूलन, नास्तिकता, पर्यावरणरक्षण, मानव-मानवेतर प्राणी यांचे संबंध यांवर आधारीत आहेत. ‘अंगणवनातील कथा’ या निसर्गातील पशु-पक्षी, प्राण्यांच्या माध्यमातून बोध घडविणाऱ्या कथा आहेत. या कथांचा विशेष म्हणजे त्या आधुनिक धाटणीच्या आहेत. साधी-सोपी भाषा हा या कथांचा विशेष आहे.
‘बेटू आणि इतर कथा’, ‘अंगणवनातील कथा’- विद्यालंकार घारपुरे,
अक्षर मानव प्रकाशन, किंमत- ६० रुपये

‘बहुरंगी बुद्धिमत्ता’, ‘डोक्यात डकवा’
श्रुती पानसे यांची ‘बहुरंगी बुद्धिमत्ता’, ‘डोक्यात डकवा’ ही पुस्तके मुलांनी आपल्यातील बुद्धिमत्ता कशी शोधावी व आपल्यातील न्यूनतेवर मात करून त्यात कसे यशस्वी व्हावे याचं उत्तम मार्गदर्शन करतात. गणित, इंग्रजी, विज्ञान आणि भाषा हे विषय कशा प्रकारे जाणून घ्यावेत याविषयी ही पुस्तके माहिती देतात. याचबरोबर मेंदूसाठी सकस आहार कोणता, स्मृतींची साठवण कशी होते, मेंदूला टीव्ही आवडतो का? अशा अनेक गमतीशीर गोष्टी या पुस्तकांमध्ये सांगितल्या आहेत. त्या मुलांबरोबरच पालकांसाठीही उपयुक्त अशा आहेत.
बहुरंगी बुद्धिमत्ता, डोक्यात डकवा, श्रुती पानसे,
नितीन प्रकाशन, किमती- प्रत्येकी १२५ रुपये

‘हिरवाई’
कर्णबधिर मुलांसाठी काम करणाऱ्या शोभा नाखरे यांचा ‘हिरवाई’ हा कवितासंग्रह मुलांना वेगळय़ाच विश्वास घेऊन जातो. या कवितांमधून आजूबाजूच्या नेहमीच्या गोष्टी मुलांना सहज उमजतात.
गुलमोहोर झाला लालबुंद
बहावा लोंबतोय पिवळाजर्द
मुलांना कळतील अशा साध्या-सोप्या शब्दांमधील या कवितांमुळे त्या मुलांना आजूबाजूच्या निसर्गात घडणाऱ्या घडामोडींची सहजपणे माहिती करून देतात.
हिरवाई- शोभा नाखरे, प्रकाशक-गोपाळकृष्ण नाखरे, किंमत- १०० रुपये

‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने २०१५’
सुधीर आणि नंदिनी थत्ते यांचं ‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने २०१५’ हे पुस्तक म्हणजे नोबेल पुरस्कारविजेत्यांच्या शोधांची गोष्टीरूपाने दिलेली वैज्ञानिक माहिती होय. लहान मुलांपर्यंत विज्ञान पोहचविण्याचा हा अभिनव उपक्रम आहे. या पुस्तकात २०१५ या वर्षी रसायनशास्त्र विभागात थॉमस लिंडाल, पॉल मॉडरिच, अझीझ सॅन्कार यांना डीएनए दुरुस्ती यंत्रणेच्या अभ्यासाकरिता, तर वैद्यकशास्त्र विभागात विल्यम कॅम्पबेल, सतोशी ओमुरा, यूयू तू यांना अनुक्रमे पहिल्या दोघांना परोपजीवी गोलकृमींच्या संसर्गावरील आणि यूयू तू यांना हिवतापावरील नावीन्यपूर्ण उपचारांच्या शोधासाठी नोबेल पुरस्कार मिळाला.
न्यूट्रिनोंना वस्तुमान असते असे दर्शविणाऱ्या स्वरूपातील बदलांचा शोध लावल्याबद्दल काजिता तकाकी, आर्थर मॅक्डोनाल्ड व भौतिकशास्त्र विभागात या विषयांमध्ये नोबेल पुरस्कार मिळालेल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाची माहिती करून दिली आहे. त्या संशोधनाशी संबंधित लेखकद्वयींनी लिहिलेल्या कथा आहेत. या कथांमुळे या संशोधनातील बारकावे कळण्यास खास मदत होते.
‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने-२०१५’,
सुधीर आणि नंदिनी थत्ते, ग्रंथाली प्रकाशन, किंमत- ८० रुपये

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best storybooks for kids
First published on: 15-05-2016 at 01:02 IST