सकाळ झाली. चिंटू अस्वल उठलं. गार वारा सुटला होता. झाडावर पाखरं किलबिलत होती. चिंटूनं छानशी स्वत:भोवती एक गिरकी घेतली. तोंडातून सुंदर शीळ फुंकली. त्याला आज खूपच प्रसन्न वाटत होतं. त्याचं कारणही तसंच होतं. आज चिंटू त्याच्यासाठी एक छानसं घर बांधायला सुरुवात करणार होता. चिंटू झुडपाजवळ गेला. तिथं ठेवलेलं मधाचं पोळं त्यानं काढलं. मस्तपैकी त्यातलं मध खाल्ला. चिंटूला खूप मजा आली.
चिंटू नुकताच इथं राहायला आला होता. पूर्वी तो दाट जंगलात राहायचा. त्या जंगलात खूपखूप झाडे होती. पशुपक्षी होते. सुंदर-सुंदर ससे, उडय़ा मारणारी हरणं, धूम पळणारे रानगवे, चितळं आणि हो, वाघपण होता. चिंटूचं मन तिथे रमलं होतं. त्याला छानसे मित्रही मिळाले होते. छुटकू नावाचे एक लाजाळूसे ससोबा आणि मयंक नावाचं एक हुशार हरीण चिंटूचे खास मित्र होते. चिंटूचं आणि त्या दोघांचं खूप पटायचं. तिघे मिळून भारीच मजा करायचे.
दिवस आनंदात जात होते. चिंटू शिकार करायचा. भरपूर खायचा. लहर आली की मित्रांसोबत खेळायला जायचा, नाहीतर छान झुडपात बसून आराम करायचा. पण एक दिवस मात्र विपरीत घडलं. जंगलात एक जोराचं वादळ आलं. झाडे-वेली गदागदा हलू लागल्या. काही मोठ-मोठी झाडं मानेतून मोडून पडली. पक्षी अचानक आलेल्या या संकटानं घाबरून गेले. प्राणी निवारा शोधण्यासाठी सैरावैरा पळू लागले. वाघही मोठमोठय़ाने डरकाळी फोडू लागला. जंगलात हाहाकार माजला. ज्यांची घरं होती ते त्या घरात सुरक्षित होते. पण चिंटूचं काय? त्याला तर घरच नव्हतं.
चिंटू ज्या झुडुपात राहायचा ते जोरानं आलेल्या वाऱ्यानं उडून गेलं. चिंटू घाबरला. वारा थांबत नव्हता. चिंटूनं कसाबसा आपला जीव वाचवला. ‘‘आता काय करावं? कुठे जावं? स्वत:चं घर असतं तर किती बरं झालं असतं,’’ चिंटू मनातल्या मनात विचार करत होता. अचानक त्याला आठवलं, ‘‘या जंगलात आपण एकटे कुठे आहोत? आपले जिवाभावाचे मित्रही आहेत की, छुटकू आणि मयंक. ते घेतील आपल्याला घरात. थांबवतील आग्रहानं!’’ चिंटू मनातून सुखावला. त्याला आनंद झाला. स्वत:ला कसाबसा वाचवत तो धावतच छुटकूच्या घराकडे निघाला. छुटकूचं घर थोडं लांब होतं. छुटकूच्या घरापर्यंत पोहोचता पोहोचता चिंटूला चांगलाच दम लागला. घराच्या दारात उभं राहून चिंटूनं साखळी वाजवली. आतून आवाज आला, ‘‘‘कोण?’’
चिंटूनं पुन्हा साखळी वाजवली, ‘‘अरे, छुटकू दार उघड. मी आलोय मी! तुझा मित्र चिंटू.’’ छुटकूनं मात्र दार उघडलं नाही. तो आतूनच ओरडला, ‘‘दारावरची पाटी वाचली नाहीस वाटतं? ती पाटी वाच आणि चालता हो इथून.’’ चिंटू नाराज झाला. त्याला वाईट वाटलं. जिवलग मित्र! कशाचा आलाय मित्र? चिंटू मागे वळला. दारावरच्या पाटीवर लिहिलं होतं. ‘‘बाहेरच्यांना घरात प्रवेश नाही!’’
चिंटू खूप थकलेला होता. त्याला भूकही खूप लागली होती. वादळ मात्र थांबलं नव्हतं. कुठेतरी निवारा शोधणं आवश्यक होतं. चिंटू मयंक हरणाकडे निघाला. थकूनभागून मयंकच्या घरापर्यंत पोहोचला. तिथेही तशीच परिस्थिती होती. मयंकनं तर साधी ओळखही दाखवली नाही. तो चिंटूला म्हणाला, ‘‘मी तुला ओळखतच नाही मुळी; मग आपण मित्र कसे?’’ चिंटूला मनोमन वाटलं, असे मित्र असण्यापेक्षा मित्र नसलेलेच बरे!
त्या दिवशी चिंटूला मनातून वाटलं, खरंच आपलंही एक घर हवं. वादळ शांत झाल्यावर तडक त्यानं ते जंगल सोडलं आणि ते मित्रही, जे मदत करणं तर दूरच; साधी ओळखही देत नाहीत. चिंटू आता नदीजवळच्या शांत जंगलात! इथं छान हिरवंगार लुसलुशीत गवत होतं. लांबलांब तुरेदार गवतावरून उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरं होती. उंचशा झाडांवर मधानं भरलेली पोळी होती. चिंटू इथं आनंदी होता. हा, इथं मित्र नव्हते, पण झुडपाजवळच्या उंच झाडावर एक सुंदर पोपट राहायचा. राघू नावाचा. चिंटूची त्याच्याशी छान ओळख झाली होती.
चिंटूनं आता मागचं सारं विसरायचं ठरवलं. आजचा दिवस छान होता. गवतांवर फुले फुललेली होती. वारा सुगंधाचा झालेला होता. चिंटूनं झाडावर पाहिलं. झाडावर राघू बसलेला होता. ‘‘हॅलो राघू, कसं काय? छान!’’ राघूनं मस्तपैकी मान हलवली आणि चिंटूसाठी झाडावरची दोन पिकलेली फळं खाली टाकली. चिंटूनं ती मजेत खाल्ली. आता त्याला नवा हुरूप आला होता. चिंटू लगेच घराच्या तयारीला लागला. तो राहायचा त्या झुडपाजवळच एक उंचशी जागा होती. चिंटून तिथेच घर बांधायचं ठरवलं. तो आपल्या लांब-लांब अणकुचीदार नखांनी माती उकरत होता. बाजूला मातीचा ढीग साचू लागला. जमिनीतली ढोल खोलखोल होत होती. एवढय़ात आतून एक भलामोठा नाग फुत्कारला- ‘‘कोण रे तू? आणि इथे काय करतोस? जवळच माझं बीळ आहे, हे कळत नाही का तुला?’’ चिंटूची बोबडी वळली. त्याच्या शरीराला घाम सुटला. चिंटू शक्य तेवढय़ा हळू आवाजात म्हणाला, ‘‘मी चिंटू, घर बांधतोय जमिनीत! माफ करा नागमहाराज, मला कल्पना नव्हती आपणही इथंच राहता म्हणून!’’
‘‘अच्छा चल, जास्त शहाणा बनू नकोस. बाजूला बनव तुझं घर,’’ नाग पुन्हा फुत्कारला.
चिंटूने नागाच्या बिळाकडची जागा सोडून दिली. पुन्हा तो ढोल करण्यात गर्क झाला. चांगली चार-पाच फूट ढोल खोल झाली. चिंटू आता चांगल्या रीतीनं ढोलीत शिरत होता. सारखी माती उकरण्यामुळे आजूबाजूला आवाज जात होता. एवढय़ात एक डरकाळी चिंटूच्या कानावर आदळली. ‘‘कोण आहे रे तिकडे.. जो माझ्या शांत झोपेत व्यत्यय आणू पाहतो?’’ चिंटूचे हातपाय लटपटू लागले. ‘‘बापरे! वाघ.’’ चिंटू त्याच ढोलीत लपून बसला. हळूहळू करून चिंटूने काही दिवसांतच आपले छानसे घर तयार करून घेतले होते.
चिंटूने छानपैकी घर तयार केले होते. तो त्यात आनंदानं राहू लागला होता. आता त्याला कशाचीच चिंता नव्हती. राघू आणि त्याची मैत्रीही गाढ झाली होती. दोघेही एकमेकांना मदत करायचे. कधी कधी नदीपर्यंत सोबत जायचे. छान खेळायचे. चिंटूचं सगळं छान चाललं होतं.
..पण तिकडे वरच्या जंगलात जिथे पूर्वी चिंटू राहायचा. मात्र कोरडा दुष्काळ पडला होता. सगळं जंगल सुकून गेलं होतं. जंगलात कुठेही पिण्यासाठी पाणी नव्हतं. पशुपक्षी अन्न-पाण्याशिवाय तडफडून मरत होते. ज्या प्राण्यांच्या शरीरात थोडंसं बळ उरलेलं होतं ते जंगल सोडून खालच्या हिरव्यागार जंगलाकडे निघाले होते. पाऊस येण्याची काहीच चिन्हं दिसत नव्हती. छुटकू ससोबा आणि मयंक हरणाचीही परिस्थिती अतिशय बिकट झालेली होती.  शेवटी न राहवून छुटकू आणि मयंकनं ते जंगल सोडण्याचं ठरवलं आणि ते चिंटू राहत असलेल्या जंगलाकडे यायला निघाले. वाटेत त्यांच्या मनात नाना शंका, विचार येत होते. त्या जंगलात आपण अनोळखी! चिंटू आपल्याला ओळखेल काय? मागे आपण त्याच्याशी अतिशय वाईट वागलो. त्याने ते जर मनात ठेवले असेल तर? मग आपण कुठे जायचे? पण त्यांना कुठलाही उपाय दिसत नव्हता.
छुटकू ससोबा आणि मयंक हरीण मजलदरमजल करत, वाटेत सापडेल ते खात, थोडे थांबून विश्रांती घेत आणि पुन्हा जंगलाच्या दिशेने चालू लागत. हळूहळू बरेच दिवस निघून गेले. छुटकू आणि मयंक एकदाचे त्या हिरव्यागार जंगलात पोहोचले. त्यांना फार आनंद झाला. मग त्यांनी चिंटूचे घर शोधले. पाहतात तर काय, चिंटूच्याही घरावर पाटी! ते क्षणभर थबकले. पण पाटीवर लिहिलं होतं- ‘या घरात सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे!’
-रवींद्र जवादे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintu bears home
First published on: 22-03-2015 at 02:34 IST