दिवाळीला काहीच दिवस बाकी राहिले होते. पणत्या छानपैकी रंगवून सजवण्यात अक्षता मग्न असताना तिला कुजबूज ऐकू आली. आवाज काही ओळखीचे वाटेनात, पण आवाज देवघरातून येत असल्यामुळे कोण बोलतंय, हे जाणून घेण्यासाठी रंगवत असलेली पणती घेऊनच ती त्या खोलीत डोकावली. निरांजन, समई, गुंडाळून ठेवलेली दिव्यांची माळ चक्क एकमेकांशी बोलताना तिला दिसले.
‘विजेच्या झगमगाटामुळे आपली अपूर्वाई कमी झालीय,’ निरांजन म्हणाले.
‘हो, ना! बाजारात फक्त माळाच नाही तर विजेवर चालणारी समई, निरांजनेही आता मिळू लागली आहेत. शिवाय विविध करामती करणाऱ्या नवनवीन गोष्टींकडे लोक आकर्षित होत आहेत. त्यामुळे आपले महत्त्व कमी होऊन अडगळीमधे आपली रवानगी होणार की काय?’ समईने भीती व्यक्त केली.
‘किंवा लवकरच आपल्याला मोडीतही काढतील,’ निरांजनाने निराशा व्यक्त केली.
‘काळानुसार बदल हा होणारच. एक निरांजन लावायचं तर किती तयारी लागते. आधी वाती बनवा. त्या तेलात/तुपात भिजवा. शिवाय एका फटक्यात पेटेल याची खात्री देता येत नाहीच.’ माळ जरा आढय़तेने म्हणाली.
समईने ‘नको लक्ष देऊस हिच्या बोलण्याकडे’ असे बोलून निरांजनाची समजूत काढली.
एवढय़ात ‘तुझीही केवढी बडदास्त ठेवायला लागते. तुला लख्ख करण्यासाठी केवढे सोपस्कार करायला लागतात. सध्याची गृहिणी कामात किती व्यस्त असते माहितीय ना तुला?’ माळेने समईलाही कुत्सितपणे ठणकावले.
‘माझे मात्र तसे नाही. बटण लावले की मी सर्व काही उजळून टाकते.’ माळ पुढे म्हणाली.
यावर समई आणि निरांजन हिरमुसले. थोडा वेळ सर्वच नि:शब्द झाले. कोणाला काहीच सुचले नाही.
‘बघा हं, तुमच्या कुटुंबातील कंदिलाची जागा आता काळानुरूप बल्ब, टय़ुबने घेतली ना, तसंच आहे हे.’ माळ म्हणाली.
‘खरंय तुझं म्हणणं. हे मात्र मान्य करायलाच हवं.’ समई म्हणाली.
‘मी तुमच्या कुटुंबातली नाही. तुमची एकमेकांशी चाललेली धुसफुस मला बरी वाटेना म्हणून मी मधे बोलते आहे. काही दिवसांपूर्वी अक्षताच्या बाबांनी आजीसाठी इलेक्ट्रिकवर चालणारी उदबत्ती आणली. देवपूजेनंतर ही उदबत्ती लावली जाऊ लागली तेव्हा मलाही खूप वाईट वाटले.’ आता या संभाषणात तिथे असलेली एक उदबत्ती सहभागी झाली.
‘अक्षता, सणाच्या निमित्ताने पाहुणे मंडळी जेवायला बसली की मंद सुगंधी उदबत्ती लाव. घरात सुगंध दरवळू दे. वातावरण मंगल आणि प्रसन्न होऊ दे’ आजीने सांगितले.
‘तेव्हा मला माझे महत्त्व समजले. कोणीही कोणाची जागा घेऊ शकत नाही हे खरे ना?’ उदबत्तीने विचारले.
‘तुला नक्की काय सुचवायचे आहे ते आम्हाला कळले नाही.’ समई म्हणाली.
‘औक्षण करताना, आरतीसाठी तबकात निरांजन हे हवेच, तर कुठल्याही समारंभाच्या उद्घाटनाला दीपप्रज्वलनासाठी समई हवीच. तुमचे महत्त्व काय आहे ते कळले?’ उदबत्ती म्हणाली.
दोघांनीही खूश होऊन तिचे आभार मानले.
माळ माफी मागत म्हणाली, ‘माझं चुकलं. मी तुम्हाला दुखवायला नको होतं. उदबत्तीमुळे तुमची महती मला कळली आणि माझ्यातील कमतरता जाणवली.’
सर्वानीच तिच्याकडे आश्चर्याने पाहिले.
‘माझा तोरा, दिमाख सर्व काही वीज असेपर्यंतच. शिवाय माझ्यातील एखादा दिवा किंवा सर्वच दिवे कधीही बंद पडण्याची शक्यता असते. शिवाय आजकाल ते दुरुस्तही होत नसल्याने मला कचरापेटीच्या हवाली केले जाते. ‘यूज अँड थ्रो’चा जमाना आहे ना! पण तुमचे तसे नाही. दिवे गेल्यावर गृहिणी तत्परतेने मेणबत्ती, तेल-वात घालून निरांजन लावते.’ माळेने आपले दु:ख व्यक्त केले.
श्रेष्ठ-कनिष्ठ असा वाद संपून त्यांच्यात समजुतीचे वातावरण निर्माण झालेले पाहून अक्षता त्यांना म्हणाली, ‘तुमच्या संभाषणामुळे मलाही आज काही गोष्टींचा उलगडा झाला.’
‘पणतीताई, तू का बोलत नाहीस?’ अक्षताच्या हातातील पणतीला माळेने विचारले.
‘तुमच्या भांडणात कोणाची बाजू बरोबर यापेक्षा अक्षता कोणाची बाजू घेणार याचा मी विचार करत होते. तिने जर तुझी बाजू घेतली असती तर मला रंगवायचे सोडून विजेच्या पणत्या आणायचा आग्रह धरेल या विचाराने माझ्या पोटात गोळा आला होता.’ पणती म्हणाली.
हिने आपल्या मनातील बरोबर ओळखले हे जाणून अक्षताला हसू आले. ‘त्या मी आणणारच आहे. पण सडा घालून रांगोळी काढेन तेव्हा त्याच्याभोवती मी तुझीच सजावट करणार. कारण तुझ्यामुळे रांगोळीची शोभा वाढणार आहे. तेव्हा तू अजिबात काळजी करू नकोस,’ अक्षता म्हणाली.
‘दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. तो सर्वाना बरोबर घेऊन साजरा करायचा असतो. तुम्हाला सर्वाना आमच्या आनंदात सहभागी करून घेऊ.’ अक्षताने त्यांना आश्वासन दिले.
‘प्रकाश देणे हे आमचे काम आहे. ते अखंड करत राहू,’ असे वचन पणती, निरांजन, समई आणि माळेने अक्षताला दिले.
दीपावली असे सण दिव्यांचा
पणती, समया, निरांजने अन् माळांचा
नसे काही जुने वा नवे
रोषणाईसाठी आम्हां सर्वच हवे
संग्रहित लेख, दिनांक 12th Oct 2014 रोजी प्रकाशित
दिलजमाई
दिवाळीला काहीच दिवस बाकी राहिले होते. पणत्या छानपैकी रंगवून सजवण्यात अक्षता मग्न असताना तिला कुजबूज ऐकू आली. आवाज काही ओळखीचे वाटेनात, पण आवाज देवघरातून येत असल्यामुळे कोण बोलतंय, हे जाणून घेण्यासाठी रंगवत असलेली पणती घेऊनच ती त्या खोलीत डोकावली.

First published on: 12-10-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali coming soon