दिवाळीचा सण
उत्सवाचे संमेलन
पेटवून पणती
धरा झाली पावन
दिवाळीचा सण
लक्ष्मीचे पूजन
नववर्षांचे स्वागत
करू प्रेम सिंचन
दिवाळीचा सण
तम सो मा ज्योतिर्गमय
राग, द्वेश जाळून
होवो कृतार्थ जीवन
दिवाळीचा सण
बंधुत्वाची शिकवण
करून आरती
मन गाभारा प्रसन्न
दिवाळीचा सण
चैतन्याची उधळण
नको दु:खी कोणी
हेच दे दान – रा. कों. खेडेकर
नवी दिवाळी
अजूनही काळोखात
उभे जे आहेत
दिवाळीचे दीप त्यांच्या
लावू या वाटेत
अंधाराचे भय त्यांचे
पुसून टाकू या
प्रकाशाची बीजे त्यांच्या
हृदयी पेरू या
विज्ञानाची जोड त्यांच्या
आयुष्याला देऊ
ज्ञानाच्या मंदिरी सारे
सोबतीने जाऊ
विषमतेचे तोडू पाश
हिच मनी आस
दिवाळीच सांगे जोडू
मनाला मनास
नको ते फटाके
नको दिव्य रोषणाई
चैन, विलासात दिवाळी
कोमेजून जाई
सत्य, सुंदर मंगलाने
दिवाळी सजावी
स्नेहमय आपुलकीने
मनी उजळवी
घरोघरी दिसेल मग
हसरी दिवाळी
दारापुढे सजेल मग
सुखाची रांगोळी
दिवाळीचा हा प्रकाश
जेव्हा सारीकडे दाटेल
तेव्हा खरी दिवाळीची
पहाट उजाडेल – एकनाथ आव्हाड