पाहा हं किती गंमत आहे. संगणक तुमच्या हाताच्या बोटांतच आहे खरा! तुम्ही म्हणाल की, ते कसे काय? संगणक, आणि तोही स्वत:च्या हाताच्या बोटातच आहे? आता हे पाहा, तुम्हाला कोणत्याही आकडय़ास नऊ या संख्येने पटकन गुणायचे असल्यास अशी गंमत करा- तुमचे दोन्ही तळहात टेबलावर ठेवा. हा झाला तुमचा घरगुती संगणक. आता ज्या आकडय़ाला नऊने गुणायचे असेल, त्या क्रमांकाचे बोट (डावीकडून उजवीकडे मोजू या.) किंचित वर उचला. ते बोट सोडून डावीकडून उरलेली बोटे मोजा व उजवीकडील बोटे मोजा. डावीकडील बोटे दशक दाखवतील, तर उजवीकडील बोटे एकक दाखवतात, हा आला तुमचा गुणाकार. उदा. तुम्हाला चार या आकडय़ास नऊने गुणायचे असल्यास डाव्या हाताचे चौथे बोट वर करा. म्हणजे आता डावीकडे राहतील फक्त तीनच बोटे, म्हणजे तीन दशक व उजवीकडील राहतील ‘सहा’ बोटे म्हणजे ‘सहा’ एकक गुणाकार आला. तीन व सहा म्हणजेच ‘बत्तीस’. अशा प्रकारे कोणत्याही आकडय़ाने (एक ते नऊपैकी) गुणाकार करून पाहा. आहे की नाही खरी गंमत! म्हणजेच, संगणक तुमच्या बोटातच लपलाय खरा!

जमिनीखालचा समुद्र!
पृथ्वीवर जमीन आणि समुद्र असे दोन स्पष्ट प्रदेश आखले गेलेले असतात. अशा परिस्थितीत जमिनीखाली समुद्र येईलच कसा, असा प्रश्न साहजिकच विचारला जाईल. पण शास्त्रज्ञांनी खरोखरच पूर्व आशियाई भूमीखाली शेकडो कि.मी. खोलीवर एक अफाट पाणपसारा शोधला आहे. तो जवळजवळ आक्र्टिक समुद्राच्या विस्ताराएवढा आहे. मग त्याला जमिनीखालचा महासागर म्हणायचे नाही तर काय? भूकंपाच्या लहरी पृथ्वीच्या अंतर्गोलातून कशा रीतीने प्रवास करतात, याचा अभ्यास शास्त्रज्ञांनी चालवला होता. तेव्हा बाष्पयुक्त खडकांच्या सातशे ते चौदाशे कि.मी. जमिनीखालून जाणारा पट्टा इंडोनेशियापासून उत्तर रशियापर्यंत पसरलेला लक्षात आला. येथील खडक नाजूक असल्याने तिथून जाताना भूकंपलहरी प्रभावहीन होतात. अर्थात, हा भूभाग म्हणजे विस्तीर्ण जलाशय नव्हे, तर या पट्टय़ातील खडकात एकदशांश टक्क्यापेक्षाही कमी पाणी असलेला भूभागच आहे.

शोध टेलिव्हिजनचा
आज आपला दिवसातील कमीत कमी एक ते दोन तास टेलिव्हिजनसमोर जातो. क्रिकेटची मॅच सुरू असताना मध्येच जर अडथळा आला तर चिडचिड होते, पण हे इतक्या लांबचे चित्र आपल्यापर्यंत येते आणि ते प्रत्यक्षात दिसते याच्यामागे मोठे कष्ट आहेत. अवघड प्रयोगातून, चिकाटीतून हे साध्य झाले आहे. ज्यांनी हे प्रयोग केले त्यांना त्यांच्या आयुष्यात या प्रयोगांपासून फारसा फायदा झाला नाही. एवढेच नाही, तर काही जणांना त्यांच्या कष्टाचे श्रेयसुद्धा मिळाले नाही.
टेलिव्हिजनचे तंत्र म्हणजे, थोडक्यात आपण डोळ्यांनी पुस्तक वाचण्यासारखे आहे. आपण आपली नजर सरसर वाक्याच्या प्रत्येक शब्दावरून फिरवतो. त्याप्रमाणे टेलिव्हिजनचे कार्यचालते, पण हे सोपे नव्हते. १९२५ मध्ये स्कॉटलंडच्या जॉन लॉगी बेअर्ड या शास्त्रज्ञाने एक यंत्र बनविले. त्याच्या आत कॅमेरा बसविला. हे कॅमेरा असलेले यंत्र तो डावीकडून उजवीकडे, नंतर खाली व पुन्हा आडवे फिरवत असे. साधारण दीड फूट खाली आला की पुन्हा वरच्या कोपऱ्यात पहिल्यासारखे करत राही. जेव्हा त्याचे हे यंत्र चालू झाले तेव्हा टेन्टन नावाचा एक ऑफिसबॉय रात्री एकटाच थांबला होता. जॉन बेअर्डने त्याला एका खोलीत त्या कॅमेऱ्यासमोर बसविले आणि त्याच्यावर झगझगीत प्रकाश टाकून ते यंत्र सुरू केले. दुसऱ्या खोलीत पडद्यावर त्याने रिसिव्हर चालू केला, पण तिथे काहीच दिसत नव्हते. थोडेसे हताश होऊन बेअर्ड यांनी त्या दिवशी काम थांबवायचे ठरवले.
हे सांगण्यासाठी ते टेन्टनकडे गेले, तेव्हा टेन्टन महाशय कॅमेऱ्यासमोरून गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. खूप प्रकाश आणि ते एकंदरीत यंत्र पाहून टेन्टनने थेट टॉयलेट गाठले होते. बेअर्डनी त्याला खूश करण्यासाठी पैसे दिले आणि त्याला तिथेच बसविले. दुसऱ्या खोलीत पडद्यावर टेन्टन महाशय धूसर दिसू लागले, पण १९२७ मध्ये रशियाच्या ब्लादिमिर झ्वोरिकिन या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कॅमेऱ्याची व्यवस्था केली. आज त्यात प्रचंड प्रगती झाली असली तरी मूळ तंत्र ब्लादिमिरचेच आहे.