स्मितकबीर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑक्टोबर महिन्यात मी सायलेंट कारपेंटरी वर्कशॉपमध्ये गेलो होतो. तिथे आम्हाला आवाज न करता लाकडात चमचे करायला शिकवले. दोन दिवस आम्ही चमचे करत होतो. त्या वर्कशॉपमध्ये माझं आणि लाकडाचं काय नातं जुळलं कोण जाणे, पण माझ्या मनात फक्त लाकडाचेच विचार येत असत. मला वर्कशॉप संपल्यावर विवेककाकाने (विवेक महाजन, तो आर्किटेक्ट आहे. त्याची आमराई देखील आहे आणि तो तिथेपण काम करतो, आणि उरलेल्या वेळात सायलेंट कारपेंटरी करतो किंवा त्याचे वर्कशॉप्स घेतो) एक टूलबॉक्स दिला. त्यात कोरायचे टूल्स होते. पण त्यात चाकू नव्हता, तर चाकूसारखं काम करणारं एक टूल त्यात होतं. मम्मा, डॅडानी मला सराव करण्यासाठी लाकडं आणून दिली आणि मग माझा खरा प्रवास सुरू झाला. मी एक भांडं कोरायला घेतलं, पण त्याचा अभ्यास थोडीच होता की, केवढा जोर दिल्यावर तुम्हाला हवं तेवढं लाकूड निघतं आणि केवढा जास्त जोर दिल्यावर टूल तुटायची भीती असते, त्यामुळे ते भांडं करताना खट्कन् तुटलंच. म्हणजे त्याची उजवीकडची कडच तुटली आणि थोडय़ा वेळानं डावीकडचीपण. मग मला असं वाटलं की, मी हे भांडं सध्या बाजूला ठेवावं आणि चमचा कोरायला घ्यावा. मनात थोडी धाकधूक होतीच, की होईल ना? मी जरा विचार करून तो चमचा कोरायला घेतला, पण उत्साहात काम करताना त्या चमच्याचा पुढचा भाग तुटला. आता मी भयानक चिडलो. मी दुसरा चमचा कोरायला घेतला. त्या चमच्याचा पुढचा भाग मी उघडा ठेवला आणि मोठी मूठ कोरली, त्यामुळे मी तो यशस्वीपणे कोरला.

चमचा कोरून झाल्यावर अजून एक महत्त्वाचं काम असतं- ते म्हणजे चमचा घासणं आणि ते काम फक्त खरकागदानंच (Sand Paper) करता येतं. आधी मला वाटायचं की, फक्त एकाच पोताचा खरकागद असतो, पण नंतर कळलं की ते एक नाही अनेक वेगवेगळय़ा पोतांचे असतात. ८० नंबरचा जो खरकागद असतो तो नावाप्रमाणेच खरखरीत असतो. त्यावरून हळुवारपणे बोट फिरवलं तरीदेखील बोटावरती रेषा उठतात (जोरात फिरवलं तर काही विचारायलाच नको) आणि तेच ४०० नंबरचा जो खरकागद असतो त्यावरून बोट फिरवताना आपण रांगोळीवरून बोट फिरवतोय असं वाटतं. मग असं ८० ते ४०० पर्यंतचे मधले सगळे खरकागद लाकूड घासताना वापरावे लागतात. मी असे चांगले सात चमचे तयार केले. चमचा कोरताना लाकडाचा कुर्र कुर्र करून मस्त आवाज येतो. आधी मला वाटायचं, जी पांढरट लाकडं असतात ती मऊ असतात, कोरायलापण तसं काही नसतं, म्हणजे काही काही पांढरी लाकडं मऊ, पण सगळीच नाहीत. चॉकलेटी रंगाची लाकडं जास्त मऊ असतात. कधी कधी जर लाकडातलं तेल कमी असेल तर चॉकलेटी लाकूड कोरताना आपण कोळसाच कोरतोय असं वाटतं.

मी माझी लाकडं भवानी पेठेतल्या एका लाकडाच्या वखारीतून (Saw Milss) आणतो. पहिल्यांदा जेव्हा लाकडं आणली तेव्हा मी ती आणायला गेलो नव्हतो, त्यामुळे वखार म्हणजे काय याचा मी फक्त अंदाजच लावू शकत होतो. पण दुसऱ्यांदा मी त्या वखारीत गेलो.. बापरे!!! अल्लादीनच्या सिनेमातल्या गुहेसारखीच होती ती. सगळीकडे लाकडाचा गळय़ापाशी गुदगुल्या करणारा वास आणि नजर जाईपर्यंत सगळीकडे लाकडच लाकडं. काही लाकडं एक फुटाची तर काही लाकडं दहा फुटाची. काही काही तर ओंडकेच होते. चालताना मध्येच धडपडलो. आणि खाली बघितलं तर लक्षात आलं की मी लाकडांच्याच छोटय़ा छोटय़ा तुकडय़ांवर मी चालतोय. तिथून निघावंसच नाही वाटत. आता आम्ही लाकूड कोरायचा चाकू घ्यायचा ठरवलं, पण तो कोणत्याच दुकानात मिळेना. मग आम्ही तो अ‍ॅमेझॉनवरून मागवला. तो चांगला ४० दिवसांनी आला. आता परत चमचेच काय करायचे? असं करून मी एका विमानाचं चित्रं काढलं. मग त्याला लाकडात कोरायला सुरुवात केली. अख्खं विमान एकाच लाकडात कोरणं शक्य नव्हतं, मग मी ठरवलं की विमानाचा प्रत्येक भाग वेगवेगळा कोरायचा आणि मग नंतर ते सगळे भाग एकत्र जोडायचे. मी एक एक करून भाग कोरायला सुरुवात केली, मध्येच वाटत होतं की हे विमान होणारच नाही, तर मध्येच वाटायचं की होईल रे!! ‘एवढा काय घाबरतोस’ असं स्वत:लाच समजावत मी ते विमान साठ दिवसांत तयार झालं. मग घासाघाशी सुरू.. मग त्याला तेल लावलं. तेल लावलं जात असतानाची ती प्रक्रिया बघायला खूप मजा येते. आधी घासलेलं असल्यामुळे सगळं लाकूड पांढरट दिसत असतं, मग जसजसं आपण तेल लावत जातो, तसतसं पांढरा भाग सोनेरी रंगाचा होतो आणि चॉकलेटी भाग अजून गडद होत जातो. चला आता पुन्हा कधीतरी.. एक मासा कोरून ठेवलाय त्याला घासून मग तेल लावायचंय, उशीर होईल.

lokrang@expressindia.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Innovation in wood silent carpentry workshop by vivek mahajan silent carpentry works zws
First published on: 21-05-2023 at 01:03 IST