पूर्णाक जोशी
एका जंगलात होता विसराळू सिंह. जंगलात सभा बोलावली की सिंह जायचा शिकारीला. शिकारीला जायचं ठरलं तर झोपूनच राहायचा. सिंहीण अगदी मेटाकुटीला आली होती. त्यांना अमर, अकबर आणि अँथनी असे तीन गोंडस, पण दंगेखोर बछडे होते. एक दिवस दंगा सुरू असताना सिंहानं सिंहिणीला विचारलं, ‘‘ही कोणाची बछडी आहेत आणि इकडे का दंगा करतायत?’’ सिंहिणीनं डोक्याला हात लावला.
‘‘अहो, पुन्हा विसरलात? हे आपलेच अमर, अकबर आणि अँथनी आहेत.’’
‘‘कधी-कधी मी विसरतोच नाही!’’ सिंह निघून गेला. क्षणभरासाठी तिन्ही बछडे आणि सिंहीण बघतच राहिली.
एक दिवस सिंहीण विचार करत बसली होती की सिंहाच्या विसराळूपणावर उपाय काय? पण उपायच सापडेना. मग हरिणताईंकडून डॉ. अस्वलेंबद्दल कळलं. डॉ. अस्वले कधी या जंगलात तर कधी दुसऱ्या जंगलात जात. बरेच दिवस वाट पाहून सिंहिणीला त्यांची अपॉईंटमेंट मिळाली. सिंहिणीनं सगळी कहाणी सांगितली. डॉ. अस्वले विचार करत म्हणाले, ‘‘पेशंटला शॉक द्यायची गरज आहे.’’
‘‘काय? अहो, हे जंगलचे राजे आहेत. यांना शॉक?’’ सिंहिणीनं चिंता व्यक्त केली.
‘‘होय. तोच एकमेव उपाय आहे. पण शॉक म्हणजे माणसांच्या जगात दिले जातात तसे नाही.’’
‘‘म्हणजे? डॉक्टर नक्की काय म्हणायचंय ते सांगा!’’
डॉ. अस्वलेंनी आपल्या चष्म्यातून पाहत मान डोलावली.
०
एका सकाळी सिंहिणीनं बछडय़ांना शाळेसाठी तयार केलं आणि सिंहाला सांगितलं, ‘‘अहो, ऐकलंत का, तिघांना शाळेत सोडून या.’’
‘‘चला रे पोरांनो,’’ असं म्हणून सिंह आणि तिन्ही बछडे शाळेत जायला निघाले. वाटेत जाता-जाता सिंहाला विसर पडला की आपल्यासोबत आपले बछडे आहेत. सिंह तसाच पुढे निघून गेला. इकडे बछडे रस्ता चुकले आणि बाबांना शोधू लागले. इकडे सिंहाला समोर हरिण दिसलं तशी त्याची भूक चाळवली. सिंहानं हरणाची शिकार केली आणि जेवण जेवून झाडाखाली झोपला. क्षणात सिंह लागला घोरायला.
दरम्यान, इकडे उंदीरराव जंगलातून दवंडी पिटत फिरत होते की, माणसांच्या जगातून शिकारी आलेत. त्यांच्या हातात बंदूक आणि मोठा पिंजरादेखील आहे. प्राण्यांची नुसती पळापळ. शाळेच्या मुख्याध्यापिका कोल्हीणबाईंनी शाळा अर्ध्या दिवसांनी सोडली. इकडे सिंहिणीला बछडय़ांची काळजी वाटू लागली. ती अस्वस्थपणे घराबाहेर फेऱ्या घालू लागली.
इथे सिंह गाढ झोपला होता. उंदीररावांना सिंह झोपलेला दिसला. मोठय़ा चेहऱ्यासमोर उंदीर मुंगीएवढा दिसत होता, त्याने सिंहाच्या मिश्या ओढल्या, पण सिंह गाढ झोपलेला. मग उंदरानं त्याच्या कानापाशी दवंडीचा ढोल जोरात वाजवला. सिंह खडबडून जागा झाला. समोर पाहतो तर उंदीर. झोपमोड झाल्यानं तो उंदरावर पंजा मारणार इतक्यात उंदीर म्हणाला, ‘‘महाराज, शिकारी लोकांची टोळी आलीय.. चौघे जण बंदूक आणि पिंजरा घेऊन आलेत!’’
‘‘तुला मारायला मला बंदूक काय कामाची?’’
‘‘अहो, मला नाही, ते जंगलातून कुणालाही उचलून नेतील. तुम्ही घरी जा. आमचा राजाच नाहीसा झाला तर आम्ही काय करणार?’’
‘‘छे.. मला काही होणार नाही.’’
‘‘ते ठीक आहे, पण फक्त मी सांगितलेलं विसरू नका आणि तुमच्या बछडय़ांचीही काळजी घ्या. आज ती शाळेत गेली नव्हती का?’’ सिंह मान उडवून निवांतपणे निघून गेला.
०
सिंहिणीचा जीव बछडय़ांसाठी झाला कासावीस. सिंहाला एकटय़ालाच परत येताना पाहून ती गोंधळली.
‘‘अहो, अमर, अकबर, अँथनी कुठे आहेत?’’
‘‘कुठे आहेत म्हणजे? गेले असतील खेळायला?’’
‘‘खेळायला नाही, शाळेत सोडायला-आणायला तुम्हालाच सांगितलं होतं. जंगलात शिकारी आलेत, उंदीररावांची दवंडी ऐकलीत ना?’’
‘‘उंदीरराव? मला भेटले, पण ते काहीच बोलले नाहीत? थांब मी बघून येतो.’’
सिंह आणि सिंहीण धावत बछडय़ांना पाहायला गेले, पण जंगलात ती कुठेच दिसेनात. सगळीकडे शोधाशोध. जंगलात बछडे हरवल्याची बातमी पसरली. शेवटी दोघंही निराश होऊन घरी परतली आणि पाहतात तर तिन्ही बछडे डॉ. अस्वलेंसोबत खेळत होती. त्यांना गुदगुल्या करत होती. डॉ. अस्वले हसून बेजार झाले.
सिंहिणीच्या जिवात जीव आला. डॉ. अस्वलेंनी सिंहिणीला आपणच खोटी दवंडी पिटवल्याचं सांगितलं; पण त्याचाही सिंहावर काहीच फरक पडला नाही. किमान शिकारी आलेत हे एकूण तरी त्याला बछडे आठवतील असं वाटलं, पण कसलं काय!
सिंहानं बछडय़ांकडे पाहिलं आणि म्हणाला, ‘‘शिकारी कुठे सापडलेच नाहीत? बछडे मात्र सापडले.’’
‘‘अहो, आपण बछडय़ांनाच शोधायला गेलो होतो, शिकाऱ्यांना नाही!’’
‘‘पण शिकारी कधी आले कुणी कळवलंच नाही.’’
डॉ. अस्वलेंनाही हसू आवरेना. बछडेही हसायला लागले. सिंहाच्या विसराळूपणावर काही उपाय नाही हे लक्षात येऊन सिंहिणीनं डोक्यावर हात मारला आणि पिलांना घेऊन गुहेत गेली.
purnankjoshi6@gmail.com