विज्ञानाच्या कोणत्याही पुस्तकात टेलिफोनच्या शोधाचा जनक म्हणून अलेक्झांडर ग्रॅहम बेल याचा उल्लेख असतो. पण खरोखरच ग्रॅहम बेलचे हे श्रेय आहे, की त्याच्या शोधापूर्वीच एका जर्मन शिक्षकाने तो शोध लावला होता? हा वाद केव्हाच रंगला असता; पण असा वाद ५० वष्रे दडपून टाकला होता, असे इंग्लंडमधील सायन्स म्युझियमच्या कागदपत्रांवरून दिसते. जर्मन टेलिफोनचा पूर्व अवतार- जो ग्रॅहम बेलच्या फोनपूर्वी १३ वष्रे अगोदर तयार झाला होता, त्यावर दुसऱ्या महायुद्धानंतर चाचणी घेण्यात आली होती.
पण ही बाब एका प्रमुख उद्योगपतीने दडपून टाकली. त्याच्या दृष्टीने टेलिफोनचे जनकत्व या जर्मन माणसाकडे जाणे इष्ट नव्हते. यापूर्वी गुप्त राहिलेल्या कागदपत्रांतून १९४७ साली झालेल्या प्रयोगासंबंधीची हकिकत आता बाहेर आली आहे. फिलिप रीस (१८३४-१८७४) याने पूर्वी एका उपकरणावर केलेले प्रयोग यशस्वी झाले होते, असे सायन्स म्युझियमचे क्युरेटर जॉन लिफेन म्हणाले होते. स्टँडर्ड टेलिफोन्स अँड केबल्स या ब्रिटिश कंपनीला १८६३ मध्ये रीसने तयार केलेले टेलिफोनचे यंत्र आवाज पोहोचवते, पण तो आवाज अस्पष्ट आणि रीसिव्हर मात्र उत्तम आवाजाने, पण कमी कार्यक्षमतेने काम करतो असे दिसले होते. या चाचणीबद्दल गुप्तता राखण्याचे आदेश एसटीसीचे अध्यक्ष फ्रँक गिल यांनी दिला होता. त्यावेळी संस्थेची अमेरिकन टेलिफोन आणि टेलिग्राफ कंपनीची महत्त्वाची बोलणी चाललेली होती. ती कंपनी बेल कंपनीशी संबंधित होती. अशी बोलणी चालू असताना वर उल्लेखलेले निष्कर्ष बाहेर आल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम झाला असता. अध्यक्षांनी त्या फाइलवर कॉन्फिडेन्शियलचा शेरा मारून त्यावर पडदा टाकला होता. लिफेनचे पूर्वसुरी जेरिल्ड गॅसट यांच्याकडे हा अहवाल आला. तो पूर्व परवानगीशिवाय प्रकाशित किंवा संदर्भात आणू नये अशा सूचनेसह आला होता. त्यात पुढे असेही म्हटलेले होते की, एसटीसी आणि एटीटी यांची करारविषयक बोलणी ज्या वळणावर होती तिथे गॅ्रहम बेलच्या आधीच टेलिफोनचा शोध लागलेला होता, असे प्रकट होणे म्हणजे त्या संबंधांत बाधा येण्याची शक्यता होती. त्यानंतर काही काळाने गॅरट यांनी पत्र लिहून चाचणीबद्दलच्या सर्व फाइल्स परत कराव्यात, असे सांगितले होते. त्यात ते म्हणतात, ‘या प्रकरणातल्या गुप्ततेचा मला उबग आला आहे. बेलने टेलिफोनचा शोध खरेच लावला आहे का? हा वाद समोर असताना माझ्या हातात अप्रकाशित असे ४०० कागद आहेत- जे असं निश्चित सांगतात की, टेलिफोनचा शोध पहिल्याने बेलने लावलेला नाही.’ तरीही टेलिफोनचा जनक म्हणजे अलेक्झांडर ग्रॅहम बेल हे समीकरण जनमानसात दृढ झाले.
ग्रामोफोनचा शोध
पानगळीचे दिवस होते. सकाळची वेळ.. न्यूयॉर्क नगरात मशीन बनवणाऱ्या एका मेस्त्रीकडे एक तरुण मुलगा आला व त्याने त्या मेस्त्रीच्या हातात एक कागद दिला आणि विचारले, ‘‘आपण अशा प्रकारचे मशीन बनवू शकाल?’’ मेस्त्रीने तो कागद बारकाईने पाहिला. त्या कागदावर एक गुंतागुंतीच्या मशीनची आकृती काढलेली होती. मेस्त्री म्हणाला, ‘‘बनवून देईन. पण हे मशीन आहे कशाचे?’’ तो तरुण म्हणाला, ‘‘जर तुम्ही या आकृतीप्रमाणेच मशीन बनवून दिलेत तर ते गाणे गाईल.’’ तरुणाच्या या वाक्यावर त्या मेस्त्रीचा अजिबात विश्वास बसला नाही व तो आश्चर्याने त्या तरुणाकडे पाहत राहिला. तरुण हसून म्हणाला, ‘‘जर हे मशीन खरोखरीच गाऊ लागले तर तुम्ही मला काय द्याल?’’ ‘‘मी तुला दहा रुपये देईन.’’ मेस्त्री म्हणाला. ‘‘आणि मी तुम्हाला एक िपपभर मध देईन.’’ तो तरुण म्हणाला. कारण त्याच्याकडे पसे नव्हते. मेस्त्रीने ते मान्य केले व ते मशीन बनवायला सुरुवात केली. काही दिवसांतच मशीन बनून तयार झाले.  त्या तरुणाने चकित होऊन त्याचे निरीक्षण केले आणि त्याचे हँडल फिरविले तेव्हा त्यातून हळूच आवाज आला. मेस्त्रीने घाबरून त्या मशीनकडे पाहिले, नंतर त्या तरुणाकडे पाहिले आणि तो दरवाजाकडे धावला. त्या तरुणाने त्याला अडवले व तो हसून म्हणाला, ‘‘अहो! महाशय कुठे निघालात? ठरल्याप्रमाणे दहा रुपये तर द्या.’’ हा होता जगातील पहिला ग्रामोफोन व ज्या तरुणाने याचा शोध लावला होता त्याचे नाव होते थॉमस अल्वा एडिसन.
एडिसन हा जगातील सर्वात मोठा संशोधक होता. त्याने एक हजार एकशेपेक्षाही जास्त शोध लावले. त्यात ग्रामोफोन, विजेचा दिवा या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी होत्या.