मैत्रेयी केळकर
सकाळी सकाळी गुब्बी चिमणी रागारागातच औदुंबराच्या फांदीवर येऊन बसली. काळू वटवाघळाने फक्त तिच्याकडे एकदा बघितलं आणि पुन्हा तो आपल्या कामात गढून गेला. काळू पिकलेली उंबराची फळं खात होता. रात्रभर केलेल्या जागरणाने तो थकला होता. सकाळचा हा फ्रुट ब्रेकफास्ट घेतल्यावर तो अगदी निवांत ताणून देणार होता. गुब्बी मात्र अजूनही रागातच होती. फणकारत तिने एकदा ‘चिवचिव’ असा आवाज काढला तशी बुलबुल मावशी गुब्बीजवळ आली आणि विचारलं, ‘‘का गं, आज सकाळी सकाळी अशी रागावलीस ती. काय झालं?’’ गुब्बीला आता अगदी कंठ फुटला. ‘‘रागावू नको तर काय करू? आभाळच फाटलं तर ठिगळ तरी कुठे कुठे लावणार?’’
‘‘वॉऽऽऽव, कसलं भारी बोलतेस गं गुब्बीताई. आमच्या शाळेत तूच ये नं शिकवायला.’’ तांबटाचं छोटं पिल्लू मध्येच बोललं. तांबटआईने डोळे वटारल्यावर मात्र ते लगेच निमूट बसून राहिलं. तेवढय़ात कर्कश ओरडत मिस्टर हिरवे म्हणजे पोपटराव फांदीवर येऊन बसले. ‘‘कसले हे लोक स्वार्थी नुसते.’’ तेही रागातच होते. काहीतरी नक्कीच झालंय याचा सुभगभाऊंना अंदाज आला आणि त्यांनी तसं पोपटरावांना विचारलंच, ‘‘पोपटजी, मला सांगाल एवढं झालं तरी काय? ही गुब्बीसुद्धा रागाने असंच काहीतरी बडबडतेय.’’
सुभगभाऊंचं वाक्य पुरं होतंय न होतं तोच शिंजीर तिथे येऊन पोहोचला आणि आपली चोच उडवत त्याने सांगून टाकलं, ‘‘व्हायचंय काय? झालंच म्हणा, आपलं हे झाड आता तुटणार हे नक्की!’’
‘‘काऽऽय, गुब्बी आणि पोपटराव सोडून बाकी सगळे एका दमात ओरडले. झाड तुटणार? आणि ते का?’’
‘‘इथे नवीन बिल्डिंग होतेय म्हणून.’’ सगळेच विचारात पडले. खारू मावशीही तुरुतुरुचालत तिथे पोहोचल्या. त्यांना ही बातमी केव्हाच कळली होती. प्रश्न तर सगळ्यांनाच पडला होता. कारण उंबराचं झाड हाच तर सगळ्यांचा मोठा निवारा होता. बाराही महिने त्यावर भरपूर फळं लागलेली असत. मुंगीपासून सापसुरळीपर्यंत आणि फुलटोच्यापासून वटवाघळापर्यंत सगळ्यांचाच तो आसरा होता.
काय करावं या विचारात सगळे गढून गेले, उपाय मात्र सापडत नव्हता. एवढय़ात पांढऱ्या पोटाचा नवरंगी खंडय़ा एका फांदीवर येऊन बसला, तोही उद्विग्न होता. खाजणात मोठय़ा प्रमाणावर भराव टाकायला सुरुवात झाली होती. केवळ त्या दलदलीच्या प्रदेशातच राहू शकणाऱ्या या खंडय़ाचं घर उद्ध्वस्त झालं होतं. हळूहळू एकामागोमाग एक करत अनेक पक्षी तिथे गोळा झाले. शेरटी, गायबगळे असे कितीतरी खारफुटीच्या जंगलात राहणारे पक्षी तर त्यात होतेच, पण खारफुटीच्या जंगलाभोवतालच्या झाडांवर राहणारे नाचण, कोतवाल, फुलचुक्या असे अनेक लहान-मोठे पक्षीसुद्धा त्यात होते. सगळ्यांचीच घरं उद्ध्वस्त झाली होती. केंजळीतील अनेक डेरेदार झाडं भराभर तुटत होती. मातीचा भराव पडून खाडी बुजत होती. शहराला लागून असलेलं खारफुटीचं उपयुक्त जंगल नाहीसं होऊ घातलं होतं.
पक्षी हताश होऊन पाहत होते. एवढय़ात लांबून उडत उडत कावळेदादा आले. हलकेच पंख मिटत ते औदुंबराच्या फांदीवर येऊन टेकले. गुब्बी, पोपटराव यांचे रागावलेले चेहरे आणि इतरांची नाराजी त्यांच्या अनुभवी नजरेतून सुटली नाही. कावळेदादा आता वृद्ध झाले होते, पण जुनेजाणते म्हणून औदुंबरावर त्यांना मान होता. ‘‘मला समजतोय तुमचा संताप, तुमचा त्रागा. आपल्या हव्यासापोटी सगळा निसर्गच गिळंकृत करायला निघालेत हे लोक. आधी वन, जंगलं ताडून झाली, समुद्र हटवून झाला; तरीही यांची जागेची हाव संपत नाही. आता एका मोठय़ा इमारती संकुलासाठी ही खारफुटी तोडायला निघालेत.’’
‘‘तर काय!’’ मनाताई मधेच नाक उडवत बोलल्या.
‘‘पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे स्वत:चाच ऱ्हास हे कसं समजत नाही या हुशार म्हणवणाऱ्या माणसाला.’’ कावळेदादांचा व्यथित स्वर सगळ्यांनाच हलवून गेला. एवढय़ात शिंजिराचं छोटं पिल्लू ओरडलं, ‘‘ते बघा कोण येतंय.’’
‘‘कांदळवन वाचवा, पर्यावरण रोखा. प्रवाळांच्या रक्षणासाठी, माशांच्या वाढीसाठी, पक्ष्यांच्या जागीसाठी, वाचवूया खाडी, वाचवूया झाडी..’’ अशा घोषणा देत सूचना फलक घेऊन माणसांचा एक मोठा जथा नेमका औदुंबराखाली येऊन थांबला. सगळेच पक्षी कान टवकारून ऐकू लागले.
‘‘हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. खारफुटीची वनं ही सर्वात जास्त कार्बन शोषून घेतात. खरं तर ही शहराची फुप्फुसंच म्हटली पाहिजेत.’’
एकजण म्हणाला. ‘‘खरं आहे.’’
‘‘आम्ही आता यासाठीच लढू. भरावाचं काम खात्रीने थांबवू.’’ घोळक्यातील एक मुलगी म्हणाली.
जिवाचा कान करून सगळे पक्षी ऐकत होते. आजचं मरण उद्यावर गेलं होतं, पण टळलं मात्र नव्हतं. मुलांनो, ‘‘पाहा बरं, तुमच्या आजूबाजूला नाहीत ना असे उदास पक्षी, तुटणारी जंगलं आणि बुजणारी खाडी.. अंदाज घ्या आणि असेल तर ते थांबवा. साठी लढा. कारण- वाहती नदी, आनंदी पक्षी सुदृढ पर्यावरणाचे साक्षी.
mythreye.kjkelkar@gmail.com