कालच वर्गात नोटीस आली होती. पुढच्या आठवड्यात हस्ताक्षर स्पर्धा होती. ही स्पर्धा पूर्ण शाळेसाठी होती, पण शाळेतील सगळ्या मुलांना स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नव्हता. प्रत्येक वर्गातून काही मुलं निवडली जाणार होती आणि त्या मुलांमध्ये स्पर्धा होणार होती. किशोरने आज शाळेत आल्या आल्या रोहनकडे जाहीर केलं, ‘‘रोहन, आपल्या वर्गातून मी जाणार बरं का हस्ताक्षर स्पर्धेसाठी!’’ यावर रोहनने झर्रकन् मान वळवून किशोरकडे पाहिलं. ‘‘तू आणि हस्ताक्षर स्पर्धेला?’’ आणि रोहन थांबला. त्याला म्हणायचं होतं, किशोरचं अक्षर काही एवढं चांगलं नाहीये की तो वर्गामधून स्पर्धेसाठी निवडला जाईल. यावर किशोर म्हणाला, ‘‘अरे रोहन, तुला काय म्हणायचंय ते समजतंय मला. माझं अक्षर चांगलं नाहीये, पण मी चार दिवस ुअहोरात्र मेहनत करून अक्षर सुधारेन. स्पर्धेपुरतं सुंदर अक्षरात लिहितो, त्यानंतरचं कोणी पाहिलंय.’’ यावर रोहन किशोरकडे पाहत जोरदार हसला इतक्यात शाळा सुरू होण्याची घंटा वाजली. विषय तिथंच थांबला.

हेही वाचा : प्रचारक… संघाचा कणा!

दुपारी डबा खाताना रोहनने आपला डबा किशोरसमोर धरत त्यातली भाजी आणि चपाती दोन्हीही खाण्याचा आग्रह केला. किशोरला समजेना भाजी खाण्याचा आग्रह ठीक होता, पण चपातीचं काय? मित्राच्या आग्रहाखातर त्याने चपातीही घेतली आणि पहिला तुकडा मोडताच म्हणाला, ‘‘किती मऊसूत आहे रे चपाती! कोणी केली?’’ त्यावर रोहन म्हणाला, ‘‘मी आणि आमच्या ताईने केल्या चपात्या आणि आता आमच्या चपात्या कायमच अशा मऊसूत होतात. कारण आजीने गेले सहा महिने पहिल्यांदा रोज एक, मग काही दिवस रोज दोन, मग काही दिवसांनी रोज चार-पाच आणि आता रोज सगळ्या चपात्या करण्याचा सराव आमच्याकडून करून घेतला.’’

रोहनला काय म्हणायचं आहे हे किशोरच्या चटकन लक्षात आलं. तो म्हणाला, ‘‘मी पुढच्या वर्षी हस्ताक्षर स्पर्धेत पूर्ण सरावानिशी भाग घेईन आणि सावकाशीने का असेना पारितोषिक हमखास मलाच मिळेल.’’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

joshimeghana.23 @gmail.com