डॉ. नंदा संतोष हरम

‘‘आकाश, तू काय करतोयस इथे बाल्कनीमध्ये? कसलं निरीक्षण चालू आहे?’’

आईचे प्रश्न कानावर पडताच आकाश म्हणाला, ‘‘आई, तू कढीपत्ता तोडलेस ना? पानं नीट धुऊन घे…’’

‘‘घेते हं आजोबा.’’, आई हसत म्हणाली.

आकाश म्हणाला, ‘‘आई, साधारण १२-१५ दिवसांनी परत तू कढीपत्ता तोडायला येशील ना, तेव्हा नीट लक्ष दे.’’

आई म्हणाली, ‘‘आकाश, काय घडणार आहे तेव्हा?’’

आकाश म्हणाला, ‘‘ते नाही मी तुला आता सांगत. गंमत आहे ती…’’

आई म्हणाली, ‘‘बरं, नको सांगू. तुझी ही नुसती ‘आकाश’वाणी म्हणायची तर!’’

आकाशला थोडं वाईट वाटलं की आई आपलं बोलणं गांभीर्यानं घेत नाहीए. आई स्वयंपाकघरात गेल्यावर त्याचं आपलं हातात भिंग घेऊन पानांचं निरीक्षण चालूच होतं. एका क्षणी तो आनंदानं चित्कारलाच. त्याला अपेक्षित असलेली गोष्ट शेवटी त्याला पानांवर दिसली. तो खूश झाला. मनातल्या मनात म्हणाला, ‘‘आता येणार आहे आईची गंमत!’’

साधारण वरच्या घटनेला १०-१२ दिवस झाले असतील. आकाश अभ्यास करत बसला होता. त्या खोलीला लागूनच बाल्कनी होती. त्याची आई नेहमीप्रमाणे कढीपत्ता आणायला बाल्कनीत गेली. एवढ्यात आकाशच्या कानावर आईचे उद्गार पडले. ‘‘शी, केवढी ही अळी! नशीब मी नीट पाहिलं नाहीतर हातावरच चढली असती!’’ हे ऐकताच आकाश धावत तिकडे गेला.

‘‘आई, तुला अळी दिसली का? बघू… दाखव, दाखव मला.’’

आईला अचानक मागचा प्रसंग आठवला.

ती म्हणाली, ‘‘आकाश, तुला हेच अपेक्षित होतं का?’’

आकाश म्हणाला, ‘‘हो आई! हीच माझी ‘आकाश’वाणी!’’

आई थोडी गोंधळली. ती म्हणाली, ‘‘बाळा, बागेत अळी असण्याची शक्यता खूप असते. पण तू एवढं ठामपणे कसं सांगितलंस? आकाश या प्रश्नाचीच वाट पाहात होता.

तो म्हणाला, ‘‘गेल्यावेळी बागेत मी भिंग घेऊन निरीक्षण करत होतो तेव्हा मला पानांवर छोटी – छोटी अंडी दिसली. म्हणून मी तुला पाने धुऊन घ्यायला सांगितली.’’

आईला काहीच कळेना. ‘‘अरे, पण ती अंडी कोणाची? तुला कसं कळलं ते?’’

आकाशला अगदी मनातल्या मनात गुदगुल्या होत होत्या. त्याचा अंदाज आणि अर्थात त्यामागचा अभ्यास शंभर टक्के बरोबर होता.

तो आईला म्हणाला, ‘‘अगं आई, तुला माहिती आहे ना, मी सारखा या बाल्कनीतल्या झाडांजवळ फिरत असतो किंवा बाल्कनीत येऊन अभ्यास करतो. गेल्या वेळच्या प्रसंगाआधी चार – सहा दिवस मी आपल्या बागेत फुलपाखरं पाहिली. बरं, तेव्हा बागेत एकही फूल नव्हतं.’’

त्याचं बोलणं मधेच थांबवत आई म्हणाली, ‘‘म्हणजे ही अळी फुलपाखराची आहे? आपण सुरवंट म्हणतो तो हाच ना?’’

आकाश म्हणाला, ‘‘हो आई! फुलपाखरांनी पानांवर अंडी घातली. त्यातून अळी निघाली. या अळीने कढीलिंबाची पानं बघ कशी कुरतडली आहेत… ये इकडे, बघ!

आईनं बारकाईनं बघितलं आणि म्हणाली, ‘‘खरंच की! माझं कढीलिंबाचं झाड चांगलंच फस्त केलं.’’

‘‘आई, या अळीचे फोटो काढ ना. त्यावरून मला फुलपाखराची जात ओळखता येईल.’’

‘‘काय सांगतोस?’’ आईचा विश्वासच बसेना.

आकाशने गुगलवरून शोधून काढलं की त्या फुलपाखराचं नाव होतं ‘स्वालोटेल’. त्या अळीचं बाह्यरूप बघून आकाशची आई चांगलीच प्रभावित झाली. तिचा रंग हुबेहूब पानासारखा होता. त्यामुळे ती पटकन लक्षातही येत नव्हती.

आई म्हणाली, ‘‘कुठे रे शिकलास तू हे, आकाश?’’

आकाश म्हणाला, ‘‘गेल्यावर्षी मी फुलपाखराचं जीवनचक्र शिकलो होतो. आज आपल्या बागेमुळे प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेऊ शिकलो.’’

आई म्हणाली, ‘‘मलाही! शिकून विसरून नाही गेलास तू. निरीक्षण करून त्याचा आनंद घेऊ शकलास आणि हो… ‘आकाश’ वाणी करू शकलास… आईनं कौतुकानं त्याला जवळ घेतलं आणि थोपटलं. आता आईच्या हसण्यामध्ये आकाशही सामील झाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

nandaharam2012@gmail.com