एकदा मी फुलपाखरू  झाले

पाना-फुलांवर फिरून आले

 

मला आवडे ते भिरभिरणे

फुलांमधील मकरंद चाखणे

 

झाडावेलींशी दोस्ती झाली

गप्पांची मैफल रंगली

 

गृहपाठाची कटकट नाही

पाठांतराची वटवट नाही

 

रागवत नाही येथे कुणावरी

बागडण्यात आहे मजाच न्यारी

 

हिरवे डोंगर, रान डोलते

आनंदाची बाग ही फुलते

 

खरंच मी फुलपाखरू झाले

हिरवा निसर्ग पाहून आले

– एकनाथ आव्हाड