हॅनाची सुटकेस
मुलांनो, हिटलरने लाखो ज्यूंना गॅसचेंबरमध्ये मारले, हे तुम्ही पाठय़पुस्तकात  वाचले असेलच. या नुसत्या आकडय़ांपेक्षाही तुमच्यासारख्या एका लहान मुलीची युद्धातली होरपळ, त्यातली दाहकता अधिक तीव्रपणे पोहोचविते. ‘हॅनाची सूटकेस’ हे पुस्तक तुमच्यासारख्या लहान मुलीला गॅस चेंबरमध्ये जाळून मारण्याची कहाणी सांगते. तिच्या पर्सवरून जपानमधील मुले अनेक वर्षांनी तिच्या भावाला शोधून काढतात. तिचा आज वृद्ध झालेला भाऊ तिच्या संपूर्ण कुटुंबाची दु:खद कहाणी सांगतो. तिचे आई-वडिलांचे गॅस चेंबरमध्ये जाणे. तिथले भयाण वातावरण, बहीण-भावांची ताटातूट हे सारं हेलावून टाकतं.
पुस्तकात हॅनाने काढलेली चित्रे, तिचे आईसोबतचे फोटो मन हेलावून टाकतात. एकाच वेळी मानवी क्रूरता व मानवी भावना यांचे दर्शन होत राहते. जपानमधली मुले ज्या तडफेने व चिकाटीने हॅनाच्या वृद्ध भावाला शोधून काढतात, ते वाचून मुलांचे कौतुक वाटते. पोलंडमधील मुलांच्या भावनेने हेलावणारी जपानची मुले आणि ती वाचताना डोळ्यांत पाणी येणारी जगातल्या अनेक देशांतली मुले बघितली की जगातली सारी मुले एकच आहेत ही रूपेरी किनार हॅनाच्या शोकांतिकेला आहे. माधुरी पुरंदरेंनी याचा मराठी अनुवाद केलाय.
हॅनाची सूटकेस, ज्योत्स्ना प्रकाशन.

बहुरूप गांधी
बौद्धिक कष्ट श्रेष्ठ व शारीरिक काम कनिष्ठ अशी आपली समजूत आहे. पण महात्मा गांधींचे जीवन असे होते की, त्यांनी शारीरिक श्रमाला कमी लेखले नाही. ते स्वत: पीठ दळत. शौचालय साफ करीत. कपडे धूत, रुग्णांच्या जखमा धूत, चप्पल शिवत. गांधींच्या या आपल्याला माहीत नसलेल्या गांधींचा परिचय ‘बहुरूप गांधी’ या पुस्तकात अनु बंडोपाध्याय यांनी करून दिलाय. या पुस्तकाला पंडित नेहरू यांची प्रस्तावना आहे. शोभा भागवत यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. एकूण २७ छोटय़ा प्रकरणांतून गांधींचे विविध पैलू दाखविले आहेत. पुस्तकातील प्रकरणांची शीर्षकं शिंपी, धोबी, न्हावी, भंगी, चांभार, नोकर, स्वयंपाकी, डॉक्टर, वीणकर, लेखक,  पत्रकार, मुद्रक, गारुडी अशी आहेत. गांधीजी ती भूमिका कशी जगले, हे गोष्टीरूपाने दिले आहे. ‘महात्मा’ असलेला हा माणूस छोटय़ा छोटय़ा कष्टाची कामे समरसून करत होता. आपण शरीरिक श्रमांना किंवा ती करणाऱ्या माणसांना कमी लेखू नये, हे सांगत श्रमाची प्रतिष्ठा उंचावणारं हे पुस्तक आहे. आर. के. लक्ष्मण यांची गांधींजींची वेगवेगळी अर्कचित्रे, हे पुस्तकाचे खास वैशिष्टय़ आहे.
बहुरूप गांधी, कजा कजा मरू प्रकाशन, गरवारे बालभवन, पुणे व मनोविकास प्रकाशन