डॉ. राधिका विंझे

ईशा आजोबांबरोबर सोसायटीच्या बागेत खेळायला गेली. गेल्या गेल्या स्वारी आवडत्या झोपाळ्यावर बसली. पायाने धक्का देताच ईशाचा झोका हवेत उंच उडाला. ईशा झोपाळ्याच्या हालचालीचं निरीक्षण करत होती. झोपाळ्याची सातत्याने होणारी विशिष्ट हालचाल पाहून ईशाने आजोबांना विचारलं, ‘‘आजोबा, हा झोपाळा एका टोकाला जातो, तिथून दुसऱ्या टोकाला आणि त्यानंतर पुन्हा पहिल्या टोकाला… असं पुन्हा पुन्हा होतं. आणि गंमत म्हणजे, या हालचालीसाठी झोपाळ्याला पहिल्यांदा जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ दुसऱ्यांदा लागतो. हे काहीतरी वेगळं आहे का?’’

आजोबा म्हणाले, ‘‘अगदी बरोबर ओळखलं आहेस तू. विशिष्ट हालचाल समान वेळेत पुन्हा पुन्हा होते. या हालचालीला नियतकालिक हालचाल (periodic motion) म्हणतात. आपण घरी बाउन्सिंग बॉल खेळतो. त्यात चेंडू जमिनीकडे टाकला की वर येतो. समान वेळेत हे पुन्हा पुन्हा घडतं. आजीची डोलणारी आरामखुर्ची बघ. तिची पुढेमागे होणारी हालचालसुद्धा समान वेळेत पुन्हा पुन्हा होते, याचं निरीक्षण केलं आहेस का?’’ ईशाला ही उदाहरणं हळूहळू समजू लागली.

ती म्हणाली, ‘‘मग आजोबा, दिवस-रात्रीचं चक्र हेदेखील या नियतकालिक हालचालीमुळे होतं का?’’

आजोबा म्हणाले, ‘‘एकदम बरोबर! ज्यामुळे दिवस-रात्र होतात ते पृथ्वीचं परिवलन व ज्यामुळे वर्षांमागून वर्षे येतात ते पृथ्वीचं परिभ्रमण ही दोन्हीसुद्धा नियत-कालिक हालचालींची उदाहरणं आहेत.’’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईशाचे डोळे एकदम चमकले. ‘‘म्हणजे दरवर्षी जून महिन्यात शाळा सुरू होणं हीसुद्धा नियतकालिक हालचाल होय का?’’ ईशाचं हे वाक्य ऐकून आजोबांना हसू आलं आणि ते म्हणाले, ‘‘चला, उद्यापासून शाळा सुरू होणार, नवीन दप्तर भरायचंय ना!’’ radhikavinze94@gmail.com