प्रजासत्ताक दिनाची सुटी असल्यानं गजाभाऊ निवांत पेपर वाचत बसले होते. तेवढय़ात बन्या आणि टिन्या हातात तिरंगा उंचावून ‘भारत माता की जय’ अशी घोषणा देत घरात आले.
‘‘झालं का ध्वजवंदन?’’ गजाभाऊंनी विचारलं.
‘‘हो काका. प्रजासत्ताक दिनाचे आम्हाला पेढेही वाटले शाळेत.’’  टिन्यानं उत्साहात माहिती पुरवली.
‘‘कोण होते प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं?’’
‘‘बाबा, आमच्या शाळेचे मालक परिमलशेठ.’’ बन्यानं सांगितलं.
‘‘मालक नाही रे बन्या, विश्वस्त म्हणजे ट्रस्टी म्हणावं त्यांना. शाळेला जरी त्यांनी पसा पुरवला असला तरी समाजातल्या मुलांना शिक्षण देण्याचं समाजकार्य करणारे विश्वस्त असतात ते.’’ गजाभाऊंनी समजावलं.
‘‘पण त्यांच्यापुढे आमचे हेडसर किती वाकून वाकून बोलत होते. ते गाडीतून उतरताना ड्रायव्हरनं उतरून गाडीचं दार उघडलं तेव्हाच ते उतरले गाडीतून.’’ बन्यानं त्याच्या म्हणण्याला पुष्टी दिली. तेवढय़ात टिन्यानं बोलण्याची गाडी आणखी एका रुळावर नेली. तो म्हणाला, ‘‘काका, प्रजासत्ताक म्हणजे प्रजा हीच राजा नं? पण राष्ट्रपती, पंतप्रधान हेच दिल्लीत बसून भारताचं राज्य चालवत असतात ना? म्हणजे ते मालक का या देशाचे?’’
टिन्याच्या या भाबडय़ा कल्पनांवर गजाभाऊंना हसावं की रडावं तेच कळेना. ते त्याला समजावत म्हणाले, ‘‘अरे, सारी जनता हीच खरी मालक आणि जनतेनं निवडून दिलेलं सरकार पंतप्रधान, राष्ट्रपती हे जनतेच्या कल्याणासाठी काम करणारे विश्वस्त म्हणजे तुमच्या परिमलशेठसारखे ट्रस्टी. समाजशास्त्र विषय असेल ना तुम्हाला? त्यात आहे का मालक आणि नोकर असा उल्लेख? मग मालक कोण आणि नोकर कोण हा वादच कशाला? आता हेच बघ, आपण आपल्या रिक्षावाल्याकाकांना, स्वयंपाकीणकाकूंना नोकर म्हणतो का? नाही ना?’’  गजाभाऊ थांबून मुलांचे चेहरे न्याहाळू लागले. त्यांचे गोंधळलेले चेहरे पाहून आणि जरुरीपेक्षा जास्तच गंभीर झालेले पाहून हसून ते म्हणाले, ‘‘जाऊ दे, मी तुम्हाला एक आफ्रिकेतली जुनी गोष्ट सांगतो, म्हणजे हा तुमचा गोंधळ जरा कमी होईल.’’
गोष्ट म्हटल्यावर मुलांनी गजाभाऊंसमोर बठक मारली.
‘‘फार पूर्वी आफ्रिकेतल्या एका आदिवासी जमातीच्या राज्याचा एक स्वयंघोषित राजा होता. मुमुंबा त्याचं नाव. आपल्या राज्यात ‘ऑल इज वेल’ असं त्यानं जाहीर करून टाकलं होतं. आपली प्रजा आपल्यामुळे सुखासमाधानात राहते आहे अशी त्याची ठाम समजूत होती. त्या गर्वष्ठि राजानं सगळ्या प्रजेला ‘हम करे सो कायदा’ असं करून आपल्या धाकाखाली ठेवलं होतं. एकदा तर त्यानं आपल्या झोपडीसारख्या दिसणाऱ्या ‘राजवाडय़ा’च्या पुढच्या भल्या मोठय़ा आवारात जनता दरबारच भरवला. राज्याच्या निरनिराळया गावांतून नागरिक आपल्या राजाला भेटण्यासाठी, त्याची खुशामत करण्यासाठी आले होते. घमेंडखोर मुमुंबानं एवढे लोक आपल्याला भेटायला आलेले पाहून जाहीरच करून टाकलं की, माझा राज्यकारभार पाहून आणि माझी हुकूमत पाहून तुम्हीही मान्य कराल की माझ्या कर्तृत्वानं मी सगळ्यांचा मालक आहे आणि माझ्यापुढे हाजी हाजी करणारे तुम्ही सारे लोक माझे नोकर आहात.
‘‘चुकताहात महाराज तुम्ही..’’ एक घोगरा वयस्कर आवाज गर्दीतून आला तसं साऱ्या लोकांच्या मनात धस्स झालं. ‘‘..या जगात सारे लोक एकमेकांचे नोकर आहेत महाराज.’’ बापरे.. मुमुंबापुढे ब्र काढण्याची कोणाची छाती नसताना हे साहस कोणी केलं म्हणून जो तो इकडं तिकडं पाहू लागला. मुमुंबाचा चेहरा तर रागानं आणखी काळा झाला आणि त्याच्या दगडी सिंहासनावरून तो उठलाच.
‘‘कोण बोललं हे? कोणी धाडस दाखवलं हे सांगण्याचं की मी सुद्धा एक नोकरच आहे म्हणून..?’’
‘‘मी, महाराज.’’ असं बोलत एक म्हातारबाबा गर्दीतून वाट काढत पुढे आले. कमरेला झावळ्या गुंडाळलेल्या, पांढरी वाढलेली दाढी अशा अवतारातला तो माणूस पाहून मुमुंबा ओरडलाच, ‘‘कोण रे तू?’’
‘‘माझं नाव बुवा.. माझं गाव उबगा.. आपल्या राज्याच्या दक्षिण टोकाला आहे. तिथं पाण्याची फार टंचाई आहे हो, म्हणून आमच्या गावात एक तरी विहीर खोदून द्यावी ही विनंती करायला आलो होतो.’’ बुवा थांबला. ‘‘म्हणजे तू तर माझ्यापुढं भीक मागतो आहेस आणि वर म्हणतोस जगातले सगळे लोक एकमेकांचे नोकर आहेत.’’
‘‘हो महाराज, तेच खरं आहे. हवं तर  मी तुम्हाला ते सिद्ध करून दाखवेन आज रात्रीपर्यंत.’’ बुवा न घाबरता बोलला.
‘‘ठीक आहे.’’  मुमुंबा घमेंडीतच उद्गारला.. ‘‘मला तुझ्या म्हणण्याप्रमाणं वागावं लागलं.. काही करावं लागलं तर मी तुझं म्हणणं मान्य करेन, एवढंच नव्हे तर एक का मी तुमच्या गावात तीन-तीन विहिरी बांधून देईन. पण जर तू तुझं म्हणणं सिद्ध केलं नाहीस तर तुझं मुंडकं छाटण्यात येईल, एवढं लक्षात ठेव.’’
‘‘महाराज, आमच्या गावाची एक प्रथा आहे. आम्ही जेव्हा दुसऱ्यानं दिलेलं आव्हान स्वीकारतो तेव्हा नम्रपणे प्रतिस्पध्र्याच्या पायांना हात लावून त्याचा आदर करतो. तुम्ही तर महाराज आहात आणि मी तुमचं हे आव्हान स्वीकारलेलं आहेच. तेव्हा मला तुम्हाला वाकून नमस्कार केलाच पाहिजे.’’ असं म्हणून बुवा राजाच्या पायांना हात लावण्यासाठी वाकू लागला तेवढय़ात तो मुमुंबाला म्हणाला, ‘‘महाराज, माझी ही काठी धरता का जरा.’’ मुमुंबानंही लगेच म्हातारबुवांची काठी हातात घेतली आणि मग बुवानं मुमुंबाच्या पायांना दोन्ही हातांनी स्पर्श केला.
मुमुंबानं हे झाल्यावर काठी बुवाच्या हवाली केली. तसं बुवा म्हणाला, ‘‘महाराज, मिळाला नं तुम्हाला माझ्या म्हणण्याचा पुरावा?’’
‘‘पुरावा..?’’ मुमुंबानं गोंधळून बुवाला विचारलं.
‘‘हं.. माझं म्हणणं मी सिद्ध केलं महाराज. मी तुम्हाला माझी काठी धरायला सांगितली. तुम्ही धरली आणि परत मला दिलीतसुद्धा! म्हणून मी म्हणतो, तुमच्यासारखे सारे चांगले लोक एकमेकांचे नोकर. नोकर म्हणण्यापेक्षाही चांगले सहकारी असतात.’’
‘‘वा.. वा.. काय हुशार होता हा बुवा, बाबा!’’ बन्यानं दाद दिली तसे गजाभाऊ म्हणाले, ‘‘म्हणून तर मुमुंबाही एवढा खूश झाला की त्यानं बुवाच्या उबगा गावात कबूल केल्याप्रमाणं तीन विहिरी तर बांधून दिल्याच शिवाय बुवाला आपला मुख्य सल्लागार म्हणून नेमून टाकला.’’