‘‘अर्णवला कालच भिरभिरे आणले होते, ते आजच त्याने मोडून टाकले आणि आता तो रडतोय.’’ अथर्व म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंडय़ा म्हणाला, ‘‘एवढंच ना? आपण त्याला दुसरे भिरभिरे बनवून देऊ.’’

बंडय़ाने तीन रंगीत कागद घेतले. त्याच्यातील तीन पट्टय़ा काढल्या. त्या एकात एक अडकवून दुसऱ्याच प्रकारे भिरभिरे बनवले. त्याचा पुढील आकार होता साधारण शंकूसारखा. त्याच्या टोकाकडे पेन्सिल ठेवली आणि ते पंख्याकडे नेले. ते जोरात गरगर फिरायला लागले. ते निरनिराळ्या रंगांतील भिरभिरे पाहून आर्णव जोरजोरात हसायला लागला.

‘‘हे भिरभिरे ओरिगामी पद्धतीने बनवलेले आहे.’’  बंडय़ा म्हणाला.

‘‘म्हणजे काय?’’ िपकीने विचारले.

‘‘ओरिगामी म्हणजे कागदाच्या निव्वळ घडय़ा घालून निरनिराळ्या वस्तू बनवणे. उदा. पक्षी, मासा, भिरभिरे, भूमितीच्या आकृत्या, इ. यामध्ये कागद कापले जात नाहीत. ही कला सर्वात प्रथम जपानी लोकांनी विकसित केली.’’ बंडय़ाने माहिती पुरवली.

तेवढय़ात शेजारचे जगताप काका आले. त्यांनी हे सर्व ऐकले. ‘‘तुम्हाला माहीत आहे का की, हे भिरभिरे खूप मोठे असले की त्याला पवनचक्की म्हणतात.’’

‘‘पवन म्हणजे वारा आणि म्हणूनच मारुतीला पवनपुत्र म्हणतात ना?’’  िपकी म्हणाली.

‘‘पवनचक्की म्हणजे वाऱ्यावर चालणारी चक्की, होय ना?’’ अथर्वने विचारले.

‘‘होय. पवनचक्कीत अशा भिरभिऱ्याला पूर्वी चार पाती असायची. अलीकडे ती दोन किंवा तीन असतात, वाऱ्यामुळे ती पाती फिरतात. या वाऱ्याच्या ऊर्जेपासून यांत्रिक ऊर्जेत रूपांतर केले जाते. त्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो किंवा या ऊर्जेची विद्युतशक्ती तयार केली जाते.’’

‘‘पण अशी ऊर्जा कुठे तयार केली जाते?’’  िपकीने विचारले.

‘‘जिथे जिथे वर्षभर वाऱ्याचा वेग जास्त असतो अशा ठिकाणी. डोंगरावर, समुद्रकिनारी, इ. तिथे वाऱ्याला अडथळा जसे की उंच डोंगर नसतात अशा ठिकाणी.’’ जगताप म्हणाले.

‘‘पण हे कसे शक्य आहे?’’ बंडय़ाने विचारले.

‘‘पवनचक्की चक्राच्या आसाभोवती फिरते. चक्र ज्या खांबावर असते तो स्थिर असला आणि वाऱ्याची दिशा बदलली की ऊर्जा पूर्ण क्षमतने मिळत नाही.’’

‘‘अरे, मागे आम्ही पुण्याची वेधशाळा पाहायला गेलो होतो. त्याच्या गच्चीवर एक कोंबडा होता.’’ अथर्व म्हणाला.

‘‘काय कोंबडा?’’ बंडय़ाने आश्चर्याने विचारले.

‘‘जिवंत होता का रे?’’ िपकीचा निरागस प्रश्न.

‘‘अगं, खरा जिवंत कोंबडा नव्हता, तर लोखंडी पत्र्याचा होता. त्याच्या एका टोकाला कोंबडय़ाचे तोंड होते आणि दुसऱ्या बाजूला शरीर. वाऱ्याची दिशा ज्या बाजूला असेल त्याप्रमाणे त्याचे तोंड त्या दिशेला वळायचे.’’ अथर्व म्हणाला.

‘‘ अगदी बरोबर.’’ जगताप काका म्हणाले.

‘‘बरं का बंडय़ा, काही वेळा ते एकाच जागी बराच वेळ अगदी पाच मिनिटेसुद्धा स्थिर असायचे तर काही वेळा सारखे हलत असायचे.’’

‘‘ फार पुर्वीच्या काळापासून पवनचक्कीचा उपयोग पíशयन आणि चिनी लोक करत होते. प्रामुख्याने ते शेतीसाठी त्याचा वापर करत असत. विहीर किंवा तलावातून पाणी वर खेचले जायचे आणि नंतर शेताला पाणी द्यायचे.’’ जगताप म्हणाले. बंडय़ाचे आजोबा ते सर्व ऐकत होते. ते म्हणाले, ‘‘अरे आमच्या लहानपणी सांगलीला चार-पाच पवनचक्क्या मी पाहिलेल्या आहेत.’’

‘‘आजोबा, त्या कशासाठी होत्या?’’ बंडय़ाने विचारले.

‘‘विहिरीतून पवनचक्कीच्या साहाय्याने पाणी वर खेचले जायचे आणि टाकीत साठवायचे. नंतर गरज पडेल त्याप्रमाणे ते शेताला वापरायचे.’’ -इति आजोबा.

‘‘पण ते किती मोठे असायचे?’’ िपकीने उत्सुकतेने विचारले.

‘‘त्याला माझ्या आठवणीप्रमाणे चार पाती होती आणि त्याची त्रिज्या अंदाजे तीन फूट असावी. भिरभिरे टॉवरवर बसवलेले असायचे आणि त्याची उंची अंदाजे शंभर फूट असावी. या भिरभिऱ्यामागे एक सुकाणू असते. वाऱ्याच्या दिशेप्रमाणे सुकाणू फिरायचे आणि भिरभिऱ्याची दिशा त्याप्रमाणे बदलते व त्याचा जास्तीतजास्त फायदा होतो. जास्त क्षमतेने ते वापरले जाते.’’ आजोबांनी सांगितले.

जगताप काका म्हणाले, ‘‘मुख्यत: नेदरलँड्स म्हणजे पूर्वीचे हॉलंड येथे मोठय़ा प्रमाणात पूर्वीपासून पवनचक्क्या वापरल्या जात आहेत.’’

‘‘म्हणूनच त्याला पवनचक्क्यांचा देश म्हणतात ना! ’’ अथर्वने लगेचच माहिती पुरवली.

‘‘होय, विजेची निर्मिती करण्यासाठी मोठय़ा पवनचक्क्या वापरतात. त्यांच्या पात्यांचा व्यास ५ मीटर, म्हणजे अंदाजे सोळा फूट असतो.’’

‘‘सोळा फूट म्हणजे एकावर एक अशी तीन माणसे उभी केली तर होईल जेवढी ना?’’ अथर्वने अचंबित होऊन विचारले.

‘‘अबब! इतकी लांबी.’’ िपकी तोंडाचा आ वासत म्हणाली.

‘‘ती पाती फायबर ग्लासची बनवलेली असतात. यापासून ४ किलो वॅट वीज बनू शकते. अर्थात पवनचक्कीच्या आकारावर हे अवलंबून असते. अशा बऱ्याच पवनचक्क्या एकाच परिसरात असतात. त्यापासून तयार होणारी ऊर्जा नेहमीच्या वीज पुरवणाऱ्या जाळ्यांना ( ग्रिडला) जोडलेली असते. यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. वाऱ्याचा वेग कमीतकमी ठरलेला असतो, तो नसला तर पवनचक्की फिरतच नाही. आणि दुसरे असे की, वाऱ्याची दिशा जशी बदलते, त्याप्रमाणे पवनचक्की फिरते आणि त्यासाठी पाठीमागे एक सुकाणू व यंत्रणा असते.’’ जगताप काकांनी मुलांना समजावून सांगितलं.

‘‘आम्ही एकदा पुण्याहून कोल्हापूरला गेलो होतो तर त्या वेळी बऱ्याच पवनचक्क्या फिरताना पहिल्या होत्या.’’ बंडय़ा म्हणाला.

‘‘अलीकडे भारतातही पवन ऊर्जा वापरून खूप ठिकाणी वीज निर्माण केली जाते. तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्रात काही ठिकाणी पवनचक्क्या उभारल्या असून त्यापासून वीज निर्माण केली जात आहे.’’ जगताप काकांनी मुलांना माहिती पुरवली.

‘‘आणि बरं का हॉस्पिटल, घरे, दुर्गम भागातील शाळा, इ. ठिकाणी संमिश्र पवनचक्की आणि सौर पॅनेल वापरून ऊर्जा तयार केली जाते. याचा फायदा म्हणजे ढगाळ वातावरणात, थोडक्यात जेव्हा सूर्यप्रकाश नसतो, तेव्हा वाऱ्यापासून उर्जा तयार केली जाते. सूर्यप्रकाश असताना सौर आणि वारा असल्यास वाऱ्यावर ऊर्जा तयार केली जाते. फरक इतकाच असतो की, पात्यांचा व्यासही लहान असतो आणि उंचीही ती खांबावर बसवली तर आठ मीटर व मनोऱ्यावर असले तर वीस मीटपर्यंत असते. सौर पॅनेलही छोटे असल्याने ऊर्जा कमी प्रमाणात बनवली जाते, पण ती घरासाठी पुरेशी असते. आता मला सांगा, पवन ऊर्जेचेफायदे काय आहेत?’’ जगताप काकांनी मुलांना प्रश्न विचारला.

अथर्व डोके खाजवत म्हणाला, ‘‘ती तयार करायला खर्च येत नाही, थोडक्यात फुकटच म्हणाना!’’

‘‘यापासून प्रदूषण होत नाही.’’ – इति िपकी.

‘‘अगदी बरोबर! सुरुवातीचा बांधकामाचा खर्च येईल तितकाच आणि देखभालीचा खर्चही फारसा येत नाही. इतर ऊर्जा साधनांवरील म्हणजे तेल, वायू, इत्यादींवरील भार तेवढाच कमी.’’ जगताप काका म्हणाले.

‘‘असं करा, रविवार सुट्टीचा आहे ना? मग तुम्ही एक छोटी पवनचक्की बनवा. त्यासाठी अल्युमिनियमचा किंवा लोखंडाचा पत्रा घेऊन त्याची पाती बनवता येतील. घरातील गच्चीवर ती एखाद्या लोखंडी खांबावर बसवून ऊर्जा बनवता येते का ते पाहा. अर्थात मोठय़ांच्या मदतीने.’’ आजोबा म्हणाले.

‘‘हो जरूर!’’  बंडय़ा, अथर्व, िपकीने एका स्वरात उत्तर दिले.

mmdin46@rediffmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wind power
First published on: 25-09-2016 at 00:53 IST