आपण काही करायचं नाही, दुसरा कुणी काही करू पाहत असेल तर त्याच्या अकलेचा पंचनामा करायचा;   ‘स्वत:ला मोठा शहाणा समजतो’ अशी त्याची खिल्ली उडवायची, हे कोकणी स्वभावाचं कधीकाळी वैशिष्टय़ होतं. पण परिस्थिती माणसाला बदलायला भाग पाडते.  आता कोकण बदललंय. पूर्वी कोकणातला घरटी एक माणूस मुंबईकडे धाव घ्यायचा आणि त्याच्या कमाईतून गावी येणाऱ्या मनिऑर्डरवर घर चालायचं. आता कोकणातून मुलं शिकायला मुंबईत येतात आणि खर्चासाठी गावाकडून ‘ऑनलाइन मनी ट्रान्स्फर’ होते. शिकण्याबरोबरच ती जिवाची माफक मुंबईही करतात. ‘माफक’ अशासाठी, की गावातून ‘मुंबयक’ आला, तरी ‘झिलाच्या चालचलणुकी’वर उभ्या गावाची आणि मुंबईकर गाववाल्याची बारीक नजर असतेच..

या बदलाला केवळ मुंबईचा शेजार एवढंच कारण नाही. मुंबई-गोवा महामार्गावरून वेंगुल्र्याकडे जाताना वाटेवर झाराप नावाचं गाव लागतं. सिंधुदुर्गाच्या प्रगतीची एक पाऊलखुण इथं उमटली आहे. ‘माणूस’ हा केंद्रबिंदू ठेवून परिवर्तनाचा एक आराखडा इथे आकाराला आला आहे. झाराप पंचक्रोशीत कुणालाही विचारलंत तर प्रत्येकजण याच्याशी सहमत होतो. डॉ. प्रसाद देवधर आणि त्यांची पत्नी डॉ. हर्षदा यांनी एक स्वप्न उराशी बाळगून गावात परतण्याचा निर्णय घेतला. ज्या दिवशी गावात डॉक्टरकी सुरू झाली, त्या दिवसापासूनच परिवर्तनाचा हा आराखडा आकाराला यायला लागला. कारण केवळ माणसाची प्रकृती तपासून औषधं देत पैसे कमावणं हे मुळी त्यांच्या डॉक्टरी पेशाचं सूत्रच नव्हतं. या पेशामुळे माणसांच्यात जाता येतं, माणसं जोडता येतात आणि ती वाचता येतात, हे त्यांना ठाऊक होतं. म्हणूनच माणसांना तपासताना माणसं वाचायच्या प्रयोगाला त्यांनी महत्त्व दिलं आणि समाजजीवनाच्या पुस्तकाचं एकेक पान त्यांच्यासमोर उलगडत गेलं.. त्यातून समोर येणाऱ्या वास्तवानं हे जोडपं अस्वस्थ झालं आणि डॉक्टरी हा चरितार्थाचा व्यवसाय न करता आसपास जगणाऱ्यांचं आरोग्य सुधारण्याचं व्रत म्हणून त्यांनी ते स्वीकारलं.

डॉ. प्रसाद देवधर यांच्या खांद्याला खांदा लावून.. कोकणी भाषेत सांगायचं तर ‘पदर खोचून’ उभ्या राहिलेल्या डॉ. हर्षदा देवधर यांची ही कहाणी! गेल्या जवळपास २० वर्षांत या सेवाभावी महिलेनं आपल्या पतीच्या साथीने सिंधुदुर्गातल्या स्वयंपाकघरात राबणाऱ्या स्त्रीच्या जगण्याला एक नवी दिशा दिली. नवा आत्मविश्वास दिला. त्यातून आरोग्याचा, अर्थसंपन्नतेचा नवा मंत्र सिंधुदुर्गात घुमू लागला..

झारापवरून पुढे सरकताना उजवीकडे एक टुमदार, हिरव्यागार बगीचाने वेढलेलं घर दिसतं. या घराच्या अंगणात बसून एका शांत संध्याकाळी मी देवधर दाम्पत्याच्या तोंडून या परिवर्तनाची कहाणी ऐकली. आपण काहीएक घडवतोय असा अहं त्यांच्या सुरात नव्हता. एका संथ लयीत, समोरच्या रस्त्यावरून वाहणाऱ्या वाहनांच्या वर्दळीकडे त्रयस्थपणे पाहत डॉ. हर्षदा देवधर त्यांच्या प्रयत्नांची गाथा उलगडत होत्या.

‘माणसं वाचणं’ हे काम तसं सोपं नाही. त्यासाठी चिकाटी हवी. विद्यार्थी परिषदेच्या कामातून मिळालेला श्रमानुभव, त्याच कामातून झालेली माणसांची ओळख आणि समाजातील समस्यांची जाण जोडीला घेऊन हर्षदा देवधरांनी डॉ. प्रसाद देवधरांच्या या कामात स्वत:लाही झोकून दिलं. साधारणपणे कुटुंबातील एकजण सामाजिक काम करत असेल तर दुसरी व्यक्ती (बहुधा पत्नीच!) कुटुंबाची आघाडी सांभाळण्याचे काम शिरावर घेते. इथे कुटुंबाच्या जबाबदारीबरोबरच प्रसाद देवधरांच्या समाजकार्याची समान जबाबदारीही हर्षदा देवधर यांनी उचलली. लातूरच्या विवेकानंद हॉस्पिटलात काम करताना किल्लारीच्या भूकंपामुळे वाताहत झालेल्या कुटुंबांना पुन्हा माणसात आणण्याच्या प्रयत्नांत स्वत:ला झोकून दिल्याने माणसाच्या मनात शिरण्याचा मंत्र हर्षदा यांना गवसला होता. पुढे गोव्यातही प्रॅक्टिस करताना माणसं जोडणं हाच त्यांच्या व्यवसायाचा मंत्र होता. आणि गावात जायचं ठरलं तेव्हाही हाच मंत्र सोबत होता. याकरता स्थानिक हातांची साथ हवी हे ओळखून देवधरांनी पंचक्रोशीतल्या तरुणांची फौज उभी केली. केवळ चार महिन्यांच्या पावसाळी भातशेतीवर विसंबून कधीच आर्थिक स्थैर्य येणार नाही, शेतकरी असल्याचा अभिमानही बाळगता येणार नाही आणि आत्मविश्वास हरवलेला माणूस समाजातही स्वाभिमानाने वावरू शकणार नाही. म्हणून शेतीतील परिवर्तनातून स्वत:चे परिवर्तन घडवावे लागेल, हे लक्षात घेत ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली. कुटुंबांशी संवाद साधण्यासाठी महिलांच्या मनात शिरणे गरजेचे असते. डॉ. हर्षदा यांनी ही जबाबदारी उचलली.

इथे केवळ औषधोपचार पुरेसे नाहीत, तर त्याही पलीकडच्या प्रश्नांची मालिका आ वासून उभी आहे हे त्यांच्या लक्षात आले. विद्यार्थीदशेतील कामातून एक गोष्ट शिकायला मिळाली होती. प्रश्नांना बगल द्यायची नाही. उत्तर शोधायचं. ते सापडलं की नव्या प्रश्नाकडे वळायचं. त्याचं उत्तर शोधायला लागायचं. आर्थिक चणचण ही इथल्या सर्वसामान्य कुटुंबांची मोठी समस्या आहे हे त्यांच्या लक्षात आलं. औषधोपचार करणे गरजेचे आहे असं सांगितल्यावरही ‘आंबा, काजूचा हंगाम संपल्यावर औषधं सुरू करू,’ असं सांगणाऱ्या रुग्णांमुळे इथली गरिबी समोर आली. लोकांना रोजगाराची गरज आहे, शेतीपलीकडच्या व्यवसायांची गरज आहे, हे ध्यानी आलं. पावसावर आधारित शेतीपलीकडे इंधनावर आधारित शेतीही करता येते, याची जाणीव इथवर पोहोचली नव्हती. म्हणून पावसाळ्यातच- तेही फक्त भाताचंच पीक घेतलं जायचं. उरलेल्या वर्षभराच्या काळात काजू, जांभळं, आंब्याच्या बागांमध्ये मजुरी अशी छोटी-मोठी कामं करणं एवढंच त्यांना माहीत होतं. त्यामुळे तुटपुंज्या उत्पन्नात जेमतेम जगणं होईल एवढीच कुटुंबाची कमाई. पावसाळ्यानंतर पाण्याची कमतरता असल्याने परसातल्या कृषीउत्पन्नाचे स्रोतही संपले होते. कधीकाळी एखादा शेतकरी भूतकाळात रमायचा. आज्या-पणज्यांच्या काळात गावातला ओढा कसा भरभरून बारमाही वाहायचा, याचा पट त्याच्या नजरेसमोर लख्ख तरळताना दिसायचा. ‘पुढे मग असं का झालं?’ या प्रश्नाचं उत्तर मात्र त्याला माहीत नसायचं. म्हणून उत्तरं शोधण्याची सवय इथल्या लोकांना लागावी यासाठी प्रश्नांच्या सामूहिक पाठपुराव्याचे प्रयत्न सुरू झाले. ओढय़ावर बंधारा घालून पाणी अडवलं तर गावाच्या टोकाला असलेल्या विहिरीतले झरेही जिवंत होतील हे पटवून द्यावं लागायचं. काहीजणांना हे लगेच पटायचं नाही. मग ज्यांना पटतं, त्यांना सोबत घेऊन बंधारे घालण्याचं काम सुरू झालं. बंधारा बांधून झाल्यावर पाण्याची पातळी वाढते हे हळूहळू पटू लागलं. मग श्रमदानातून बंधारे घालण्यासाठी माणसं गोळा होऊ  लागली. विहिरीला पाणी वाढू लागल्याचा आनंद माणसांच्या डोळ्यांत दिसू लागला.

या पाण्याचा वापर लोकांनी कृषिउत्पन्नासाठी करावा यासाठी प्रयत्न सुरू झाले. सिंधुदुर्गात कधी सूर्यफुलाची शेती करता येईल, हे चतकोर तुकडय़ावर शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या स्वप्नातही नव्हतं. पण या प्रयोगाची कल्पना हर्षदाताईंनी महिलांच्या डोक्यात रुजवली. कारण परिस्थितीच्या माऱ्यामुळे महिला अधिक त्रस्त झालेल्या असतात. त्यांना त्यातून बाहेर पडायचं असतं. त्यामुळे बदल स्वीकारण्यासाठी त्या लवकर तयार होतात, हे हर्षदाताईंना माहीत होतं. शेतकरी कुटुंबातला पुरुष मात्र ‘हयसर असला काय होवचा नाय..’ असंच पहिलं वाक्य उच्चारायचा, हेही. तरीही सूर्यफुलाच्या शेतीचे प्रयोग सुरू झाले. त्यासाठी शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्या. एक गुंठा जमिनीत सूर्यफूल लावा, त्याचा खर्च ‘भगीरथ’ करेल, असं सांगितलं. प्रयोग म्हणून सुरुवातीला अगदी छोटय़ाशा वाफ्यात सुरू झालेली सूर्यफुलाची शेती यशस्वी होते, हे शेतकऱ्यांना पटू लागलं. आज बऱ्याच गावांतील शेतकरी सूर्यफुलाची शेती करून स्वयंपाकघरातील तेलाची वर्षांची गरज घरच्या घरी भागवू लागले आहेत.

हा प्रयोग रुजल्यावर हळद, सुधारित जातींच्या भाजीपाल्याची लागवड सुरू केली. भातशेतीपलीकडच्या शेतीतून उत्पन्नात भर घालता येते, या जाणिवेने शेतकरी सुखावला होता. या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे श्रम कमी केले तर त्याचा वाचणारा वेळ आणखी काही उत्पादक कामांत गुंतवता येईल, हा पुढचा टप्पा होता. गावातील प्रत्येक घराचा एक मोठा कोपरा हा जळाऊ लाकडांचे गोदाम म्हणून वापरात असे. प्रत्येक घर दिवसाला दहा ते बारा किलो लाकूड जळणासाठी वापरतं. ही लाकडं गोळा करण्यासाठी लागणारा रोजचा वेळ, चूल पेटवण्यापासून प्रत्यक्ष स्वयंपाकासाठी योग्य ऊर्जा उत्पन्न होण्यासाठी लागणारा वेळ, त्या वेळात घरात साचणाऱ्या धुरापासून होणारे प्रदूषण आणि या साऱ्या प्रक्रियेत स्वयंपाकघरातच अडकून राहणारी महिला ही आणखी एक समस्या हाती घेण्यात आली. महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी त्यांना स्वयंपाकघरातून बाहेर काढून समाजात मिसळण्याची सवय लावणे, त्यासाठी त्यांचा आत्मविश्वास जागा करणे, हा आराखडय़ाचा दुसरा टप्पा होता. त्यातून सुरू झाली ‘बायोगॅस’ उभारणीची चळवळ! गॅसची चूल घरात पेटली की ऊर्जा उत्पन्न होईपर्यंतचा वेळ आपण नियंत्रित करू शकतो आणि वेळ वाचवता येतो, हे शेतकऱ्याला पटले. घराशेजारच्या गोठय़ातील गुरे, शेळ्या आणि अगदी कोंबडय़ांच्याही विष्ठेतून ऊर्जा निर्माण करता येते, हे शाळकरी मुलांना माहीत असते. हा एक राष्ट्रीय कार्यक्रम असल्याची माहिती सरकारी कार्यालयांतील पोस्टरबाजीतून लोकांपर्यंत पोहोचलेली असते. परंतु तो आपल्या स्वयंपाकघरापर्यंत येईल याची त्यांनी कल्पनाही केलेली नसते. ‘भगीरथ’च्या माध्यमातून महिलांना बायोगॅसचा प्रयोग पटवून देण्यासाठी हर्षदाताईंनी गावोगावी जाऊन घराघरांतील महिलांशी संवाद साधला. आपली समस्या कुणीतरी जाणून घेतली आहे आणि ती सोडवण्याचा उपाय घेऊन कुणीतरी आपल्या दारात आले आहे, ही जाणीव खूप सुखावणारी असते. हा अनुभव हर्षदाताईंना आला आणि बायोगॅसची चळवळ सुरू झाली. मग बायोगॅसचे संयंत्र अधिक पर्यावरणस्नेही करण्याचे प्रयोग सुरू झाले. लोखंडी सळ्या, जाळ्यांचा वापर कमी करून बांबूंच्या साह्यने संयंत्र उभे करण्याचा प्रयोग यशस्वी झाला. गावा-गावांतील अनेक घरांच्या स्वयंपाकघरांतील चुलीचा धूर अदृश्य झाला. ‘निळ्या ज्योतीं’नी स्वयंपाकघरे उजळून गेली. आणि विशेष म्हणजे कधी स्वयंपाकघरात लुडबूडही न करणारा घरधनी बायकोला मदतही करताना दिसू लागला. घरांतील संवाद वाढला. कुटुंबांतील जिव्हाळा वाढला. एका निळ्या ज्योतीतील परिवर्तनाची ही ताकद समाजाला पटली. आज पंचक्रोशीत साडेपाच हजार घरांत बायोगॅसवर स्वयंपाक शिजतोय. इतकंच नव्हे, तर बायोगॅस उभारणीतील नव्या प्रयोगांमुळे या तंत्राची प्रयोगशाळाच भगीरथने निर्माण केली. पारंपरिक संयंत्रांतील त्रुटी दूर करण्याचे प्रयोग केले. आता बायोगॅस उभारणीतील तज्ज्ञ गवंडय़ांची टीम भगीरथकडे तयार झाली आहे. केवळ सिंधुदुर्गातच नव्हे, तर शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात, तसेच गोव्यातही काही ठिकाणी या गवंडय़ांनी नव्या तंत्राची बायोगॅस संयंत्रे उभारून दिली आहेत.

अशा तऱ्हेने स्वयंपाकघरातील वेळ वाचल्यामुळे महिलांचा फावला वेळ अन्य कामांत गुंतवण्याचा तिसरा टप्पा सुरू झाला. कुक्कुटपालन व शेळीपालनासाठी जिल्हा बँक, नाबार्ड व अन्य संस्थांच्या साह्यने अनेक कुटुंबांना अल्प दरात अर्थसाह्य़ देऊन घराघरांत जोड-व्यवसायांची मालिका सुरू झाली. महिलांचे बचत गट सुरू झाले. स्वयंपाकघराच्या कोंदट धुरात वावरून अनारोग्याशी सामना करणाऱ्या महिला मोकळा श्वास घेऊ  लागल्या. साहजिकच आरोग्याच्या समस्यांनी ग्रासलेली पंचक्रोशी आता काहीशी आनंदी दिसू लागली. मुलांनी शाळेत जावे, अभ्यास करून मोठे व्हावे, हे स्वप्न घराघरांत तरळू लागलं. मुलींना शिक्षणासाठी पायपीट करावी लागू नये म्हणून भगीरथच्या साह्यने त्यांना सायकली दिल्या गेल्या. आज अनेक दुर्गम खेडय़ांमधल्या मुली सायकलवरून शाळेत जाऊ लागल्या आहेत. पालं ठोकून राहणाऱ्या काही जमातींना अस्थायी बांधकामांमुळे वीज मिळणे दुरापास्त असे. या कुटुंबांच्या छपरात उजेड आणण्याचा प्रयोग सुरू झाला. आणि समाजमाध्यमावरील ‘मायबोली’ या गटातील सुपंथी समुदायाच्या साह्यने सौरऊर्जेचे दिवे ही घरे उजळून निघाली.

‘आता सिंधुदुर्ग जिल्ह्यतील मुले शाळेत पावसाची गाणी गाताना आनंदाने हरखून जाताना दिसतात. पावसाळा संपला तरी या गाण्यांत तोच टवटवीतपणा असतो,’ हे सांगताना हर्षदाताईंच्या दूर कुठंतरी स्थिरावलेल्या नजरेत बहुधा त्या शाळेतील आनंदाची कारंजी उसळत असावी असा भास होतो..

दिनेश गुणे – dinesh.gune@expressindia.com