वयाची साठी केव्हा उलटली ते माझ्या लक्षातच आलं नाही, इतरांनीही ही जाणीव कधीच करून दिली नाही. आयुष्य भरभरून जगण्याची उमेद अजिबात कमी झाली नाही उलट वाढतच गेली.

तीन मुलांची लग्नं होऊन ते तिघेही सांगली सोडून आपापल्या व्यवसायासाठी बाहेर पडले होते. सगळ्यात धाकटा परदेशी नोकरी करण्यास निघून गेला होता. माझ्या सगळ्या मैत्रिणींचा एकच प्रश्न होता, ‘‘कशी राहतेस दिवसभर एकटी? खूप त्रास होत असेल ना?’’ ‘एम्प्टी नेस्ट सिंड्रोम’ वगैरे शब्द कानावर पडत होते पण अनुभूती येत नव्हती. अजून आणखी एक प्रश्न परगांवच्या नातेवाईकांचा, मैत्रिणींचा, ‘‘कशी राहतेस गं सांगलीला, तिथे तर काहीच नाहीये?’’ पण खरं सांगू? मला हेही कधीच जाणवलं नाही.

in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
is it wrong to expect rich husband
‘श्रीमंत नवरा पाहिजे’, अशी अपेक्षा महिलांनी जोडीदाराकडून ठेवणे चुकीचे आहे का?
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

मूळ स्वभावाने मी अजून अगदी वऱ्हाडी आहे. कुणीही केव्हाही माझ्या घरी येऊ शकतं. त्यांना वेळेनुसार चहापाणी, छान खानापिना देण्याचे संस्कार कधीच बदलावेसे वाटले नाहीत. त्यामुळे मला खूप मैत्रिणी आहेत, घरी त्यांचं येणं-जाणं आहे. मला स्वत:ला स्वयंपाक, नवीन मेनू करून सगळ्यांना जेवायला घालायचा कधीच कंटाळा नव्हता, अजूनही नाहीये. आजपर्यंत माझ्या दोन भिशींपैकी एकही मी बाहेर हॉटेलात घेतली नाही. दोन वर्षांपूर्वी हे गावाला गेले होते तेव्हा तेरा जणी दोन दिवस राहायलाच घरी आल्या. आम्ही खूप गप्पा, खूप खाणे. खूप खूप मज्जा केली.

गेली पाच-सात वर्षे माझे दोन ग्रुप्स (जे माझ्या घरीच भेटतात) खूप आवडते आहेत. एक ‘मुक्त छंद’ लेखिकांचा क्लब. या क्लबमध्ये तेहतीस जणी सामील आहेत. त्यांचं कौतुक म्हणजे, सामील होताना ‘‘आम्ही केवळ ऐकायला येऊ शकतो’’, म्हणाल्या; त्यांच्या प्रगल्भ लेखिका केव्हा झाल्या ते त्यांचे त्यांनाच अजिबात कळले नाही. त्यातल्या तिघी-चौघींची नंतर पुस्तके प्रसिद्ध झाली, गौरव झाले, बक्षिसे मिळाली, राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आणि दोन-तीन आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्या.

माझा आवडता दुसरा ग्रुप आहे आमचा ‘सत्संग.’ थोडय़ाच जणी आहोत. सर्वजणी अतिउच्च शिक्षित पीएच. डी., डॉक्टर्स, वगैरे आहेत. पण हा आहे चौकस आध्यात्मिक व्यासंग, एका वेगळ्याच पातळीवर आध्यात्मिकतेची ओळख करून देणारा.

मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते, कारण हे सुंदर आयुष्य समाधानाने जगण्यास लागणारी आणखी एक गोष्ट माझ्या आई आणि प्रामुख्याने वडिलांकडून मला वारशात मिळाली, ‘कलासक्त सौंदर्यदृष्टी’! मला सगळं आनंद भरभरून घेता येईल इतपत येतं.

वयाबरोबर मला आणखी एक संधी आपोआप आली. समुपदेशनाची. माझा मानसशास्त्राचा अभ्यास, अनुभव, एक छोटा कोर्स या पुंजीवर सगळ्या वयाच्या खूप जणांना खूप मदत करता येते आहे. त्यांचा आनंद मलाही छान जगण्याचे समाधान देत आहे. सगळ्यांनाच जमेल तेवढी, थोडी थोडकी मदत करणं मला खूप आवडतं.

‘श्री निधी फॉर चॅरिटी’चे नववे प्रदर्शन आम्ही भरवले. २०१६ मध्ये जेव्हा माझ्या मुलाकडे लंडनला गेले तेव्हा तिथल्या सुसज्ज आणि गजबजलेल्या दोन-तीन दुकानांनी माझे लक्ष वेधून घेतले. ‘चॅरिटी शॉप’ ज्याचे उत्पन्न काही ठरावीक कारणांसाठीच खर्च होते उदाहरणार्थ कर्करोग संशोधन, सोमालियातील बालकांसाठी पोषण अन्न वगैरे. या दुकानातील सर्व साहित्य कुणीतरी दान केलेले असते. ते विकून जो पैसा येईल तो अशा विधायक कार्यासाठीच खर्च करायचा अशी ही संकल्पना. सांगलीला परत आल्यावर असा उपक्रम राबविता येईल का असा विचार करून स्वत:च्या घरातले छान सामान आणि मैत्रिणींच्या घरातले, त्यांना नको असलेले उत्तम सामान (मग ते काहीही असो) एकत्रित केले. सगळ्यांनी वेडय़ात काढले तरीही पाच-सहा महिन्यांनी भीत भीत एका शाळेत सेल केला आणि त्याच मूकबधिर शाळेला त्या दिवसाची कमाई २१ हजार रुपये तिथल्या तिथे बहाल केली. दर तीन / महिन्यांनी सेल आणि प्रदर्शने भरवली. या उपक्रमाची आई म्हणून जरी माझी ओळख असली तरी खूप जणी ‘मावश्या’ झाल्या. आता आमचा खूप छान ग्रुप आहे.

सगळी बोटे सारखी नसतात म्हणूनच मूठ वळू शकते, पण ही मूठ वळायला निग्रह लागतो, सर्वच बोटांना तडजोड करावी लागते, काही बोटांवर इतर बोटांपेक्षा जास्त भार येतो पण ताकत उत्पन्न व्हायची असेल तर याला पर्याय नाही. खूप वेगवेगळे छान सम आणि विरुद्ध अनुभव माझं आयुष्य आणखीनच परिपूर्ण करीत आहेत.

– सुनंदा कुलकर्णी, सांगली

 

मी वानप्रस्थ घेतला

वानप्रस्थ वाचून दचकलात का? ही कुठली पुराणकाळातील संकल्पना काढली? आज तिचा काही अर्थाअर्थी संबंध आहे का? हो, हो, ही संकल्पना जुनीपुराणी आहे हे खरं आहे. पण ती आजच्या काळाला जुळेलशी बदलून घेता येईल की! कारण माणूस तर तोच आहे, त्याचं जीवन बदललं असलं तरी जीवनाची मूलभूत तत्त्वे तर तीच आहेत ना! तर ही संकल्पना मला भावली आणि तिचा प्रयोग करून पाहायचं मी ठरवलं. नुसतं ठरवलंच नाही तर ती अमलात आणायला सुरुवातही केली.

आज माझं वय ७० आहे. भरपूर जगून झालंय. खूप काही शिकून झालंय. वयानुरूप झोकून देऊन काही काम करण्याची किंवा शिकण्याची उमेद व शक्ती फारशी राहिली नाही. पण मोकळीक आहे. तेव्हा कृतार्थ वाटावं असं आपल्या आवडीचं आणि जमेल असं काय करावं याचा विचार करताना मला माहीत असलेलीच ही कल्पना स्फुरली. एकटी आहे मी आता, पण या एकटेपणानं ग्रासून जायचं नसेल, एकाकी वाटून त्रासून जायचं नसेल तर वानप्रस्थ स्वीकारावा असं सुचलं. करून पाहायला काय हरकत आहे असं मनाला चाटून गेलं अन् छान वाटलं.

निवृत्ती साधायची म्हटल्यावर हे लक्षात आलं की, आतापर्यंत आपण खूप बाहेर धावलो, प्रपंचाचा मोठा पसारा मांडीत बसलो, पण आपल्याच अंतरंगात कधी वळून बघितलं नाही. खूप गुंते निर्माण केले अन् त्यातच रमलो. त्यांचा त्रासही झाला तरी सहन करीत गेलो. पण त्यातून पाय मोकळा करून अलिप्ततेचा अनुभव घेतला नाही. आता या पसाऱ्यातून बाजूला व्हायचं.  ही निवृत्ती साधली तर विजनवास काही कठीण नाही. विजनवास म्हणजे संबंध तोडण्याची गरज नाही. कामापुरते संबंध राहिले, फक्त मनाला काही लावून घेतलं नाही तर काही बिघडत नाही हाच विजनवास! म्हातारपणी चांगला एकांत मिळतो. या एकांताचा सदुपयोग करायचा. आजवरच्या धावपळीत ज्याकडे ढुंकूनही पाहता आलं नाही त्या अध्यात्माचा अभ्यास करायचा, जीवनाच्या मूलभूत प्रश्नांचा मागोवा घ्यायचा अन् या चिंतनात वेळ सत्कारणी लावयाचा. मग मी अध्यात्माचा अभ्यास सुरू केला अन् थक्क होऊन गेले. केवढं गहन चिंतन केलंय् आपल्या ऋषिमुनींनी आणि संतांनी आणि केवढा मोठा ठेवा आपल्या हाती सोपवलाय! आपल्या मुळाकडे घेऊन जाणारा प्रवास थक्क करणारा आहे.

अर्थात एवढय़ानं वानप्रस्थ साधला असं मला वाटेना. नुसता तात्त्विक काथ्याकूट काय कामाचा? त्यातून स्वत:त सुधारणा झाली पाहिजे. तर मी छोटी छोटी व्रतं घ्यावीत हे ठरवलं. परिनदा करायची नाही, मनानंसुद्धा नाही. वाणीत मार्दव, वृत्तीत आर्जव अन् वागणुकीत सौजन्य ठेवायचं. अपुऱ्या इच्छा सोडून द्यायच्या. ताण घ्यायचा नाही. मनाची प्रसन्नता ढळू द्यायची नाही, अन् सतत आत्मपरीक्षण करायचं. चुकलं तिथे सावरायचं यासारखी व्रतं! सकारात्मकता म्हणजे आणखी काय वेगळं असतं हो? तुम्हाला सांगते, पूर्वी कधीतरी निवांत क्षणी मिळायचा तो आनंद भरभरून मिळायला लागला – निखळ, निर्मळ, निव्र्याज आनंद! भरभरून जगायचं म्हणजे हाच आनंद मिळवायचा ना? अन् हे सगळं कुठेही न जातायेता, बसल्या जागीच, बरं का! तुकोबा म्हणतात ‘ठायीच बसोनि करा ते कीर्तन’ तसंच काहीसं!

– डॉ. सुरेखा बापट, नागपूर</strong>

 

समाधान आणि आनंदाचे जगणे

होय, होय! मी वयाच्या ८६ व्या वर्षी मोठय़ा समाधानाने-आनंदाने भरभरून जगतोय! जगतच आलोय! सतत घडणाऱ्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करून त्यामधून काहीतरी बोध घेण्याचा जणू नादच जडला. नोकरीतील स्वेच्छानिवृत्ती पूर्वीची काही वर्षे चिंतन केल्यावर समाजहितासाठी काहीतरी विधायक असे करण्याचा विचार पक्का झाला होता!

आई-वडिलांनी सामान्य आर्थिक परिस्थितीमध्ये संसार सांभाळून सहजपणे मोठा मनुष्यसंग्रह केल्यामुळे, माणसे जोडत राहण्याचे सहज संस्कार झाले होते. प्रत्यक्षात निवृत्तीपूर्वीपासूनच जाणीवपूर्वक वेगळ्या ढंगाने आयुष्य जगायला सुरुवात केली होती आणि समाधानच समाधान आणि त्यामधून आगळावेगळा आनंद सातत्याने मिळवत आहे. समाजहितासाठी काहीतरी करत राहण्यामधूनच धमाल आनंद मिळवत आहे.

१९७४ मध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सूचनेवरून डोंबिवलीतील सर्वात मोठय़ा (६ प्राथमिक, ४ माध्यमिक शाळा) ‘राष्ट्रीय शिक्षण संस्थे’मध्ये सभासद झालो. १९९४ मध्ये रौप्यमहोत्सव प्रसंगीही यथाशक्य काम केले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ‘रेल चाइल्ड’ संस्थेमध्ये सलग ९ वर्षे कार्यवाहपदाची धुरा सांभाळली. ‘नवीन मराठी शाळेच्या’ शालेय समितीचा प्रदीर्घ काळ अध्यक्ष होतो.

एम.ए. (हिंदी केल्यावर १९७६ मध्ये शासकीय योजनेअंतर्गत ठाणे) जिल्ह्य़ातील अनेक माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता १० वीतील मुलांच्या (हिंदी) मार्गदर्शनासाठी जात राहिलो आणि त्यानंतर जिल्ह्य़ातील तलासरी आणि अन्य अशी अनेक वनवासी वसतिगृहे आणि शाळांमध्ये विद्यार्थी मार्गदर्शनासाठी वर्षांनुवर्षे जात राहिलो. ‘चतुरंग प्रतिष्ठान’च्या कोकण अभ्यास वर्गासाठी गुहागर परिसरात चार वर्षे जाणे झाले. ‘लोकसत्ता’मध्येच इयत्ता १० वी हिंदी (संपूर्ण-संयुक्त) साठी लेखन केले. त्या ओघातच १९९०-९१ मध्ये परममित्र प्रा. राम कापसे लोकसभेवर प्रथमच निवडून गेल्यावर ‘हिंदी’ विषयासाठी मोठय़ा प्रेमा-हक्काने दिल्लीला मला घेऊन गेले. खूपच अनुभव गाठी जमा झाले. आजपर्यंत मराठी-हिंदी, हिंदी-मराठी, हजारो पृष्ठांचा अनुवाद केला आहे.

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठांमधून बाहेरून बसून पदवी मिळवू इच्छिणाऱ्या शेकडो विद्यार्थिनींना अनेक वर्षे अनेक विषय शिकवल्याचे समाधान मिळवले. महाविद्यालय सुरू झाल्यामुळे वर्ग बंद होऊनही विद्यार्थिनी येतच राहिल्या आणि पाठय़पुस्तके, नोट्स, प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देऊन हर प्रकारे त्यांना मार्गदर्शन केले. डोंबिवलीच्या ‘श्रीगणेश मंदिर संस्थान’ संचालित ‘भारतीय संस्कृती पीठ’ अभ्यासक्रमामध्ये अनके वर्षे काही विषय मांडण्याचे सौभाग्य लाभले, ज्या वर्गात पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थीही होते.

डोंबिवलीच्या ‘दधीचि देहदान मंडळा’च्या वतीने पश्चिम रेल्वे क्षेत्रामध्ये गेली १५ वर्षे देहदान-अवयवदान प्रचाराचे काम करताना ५०० इच्छुकांनी इच्छापत्र भरले आहे. काहींचे देहदान झालेही आहे. जोडलेले नातेसंबंध राखण्यासाठी रायगड जिल्हा – गोरेगावच्या ‘भागवत’ घराण्यातील सर्वाना एकत्र करून चार संमेलने घडवली. २० हून अधिक सेवासंस्थांसाठी निरपेक्ष वृत्तीने निधिसंकलन करताना वरचेवर मी ‘लखपती’ होत असतो. समाजातील दानशूरांकडून यासाठी व्यक्त होणारा विश्वास पाहून धन्य वाटते.

– बाळकृष्ण भागवत, डोंबिवली

 

लिखाणाचा आनंद

मी२०११ मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर आम्ही बदलापूरला, मॅरॅथॉन नगरी येथे राहायला आलो. सुरुवातीचे २-३ महिने फार अस्वस्थतेत गेले. आम्ही तिथे गेलो तेव्हा अजून बांधकाम पूर्ण होऊन सगळे राहायला आले नव्हते. मी मीच ठरवले की आपणच खाली जाऊन ओळख करून घ्यायची सगळ्यांची. हळूहळू ओळख वाढू लागली आणि आमचा लहान-थोरांचा ३० जणींचा गट तयार झाला. आम्ही सगळे मिळून छोटे-मोठे कार्यक्रम आयोजित करू लागलो. कार्यक्रमांना एकत्र जाऊ लागलो. आमची वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते. आम्ही एकत्र येऊन वर्षभराच्या सहलीचे कार्यक्रम ठरवतो. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, चर्चासत्र,विविध मेळावे, प्रदर्शन आदी ठिकाणी आमचा ग्रुप भेटी देत असतो.

ग्रुप सोडून माझे स्वत:चे एक स्वतंत्र वेळापत्रक आहे. सकाळी घरातली कामं आटोपली की मी ११ वाजता बाहेर पडते. वाचनालयात पुस्तक द्यायला किंवा घ्यायला जाते. मंदिरांत जाते. दुपारच्या मोकळ्या वेळात वर्तमानपत्र, आवडीचं पुस्तक वाचते, कधी लिखाण करते. निवृत्तीनंतर मी रेसिपीचे पुस्तक लिहून प्रकाशित केले आहे. सध्या नुकताच स्वर, व्यंजन, बाराखडी यावरील जोडशब्द नसलेले ५ हजार शब्द लिहिण्याचा प्रकल्प पूर्ण केला आहे. तसेच लिंग, वचन, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द असे इतर ५ हजार शब्द मी लिहिले आहेत. माझा लिखाणाचा छंद मी जोपासला आहे. आणि त्याचा मोठा आनंद मी लुटत आहे.

– लतिका देशमुख, बदलापूर