News Flash

स्वत्वाची जाणीव

माझ्यातला मी माझ्याही नकळत, उगाचच तुलना करत राहतो प्रत्येकाशी..

वळणावळणाच्या वाटांवरून जाताना प्रत्येकाच्या आयुष्यात असं एखादे वळण येतंच, जिथे आपला आत्मविश्वास डळमळतो, वाटतं राहतं सतत, आपण घेतलेली वाट योग्य की अयोग्य.. माझ्यातल्या क्षमता मीच एखाद्या क्षणी नजरेआड करून टाकतो. कोलमडून जातो. जगण्याच्या या चक्रव्यूहात..बरोबर असतात असंख्य जण रस्ता ओलांडून पुढे जाण्यासाठी. माझ्यातला मी माझ्याही नकळत, उगाचच तुलना करत राहतो प्रत्येकाशी.. अन् कासवासारखं मिटून घेतो आपलं एक एक अंग.. पुन:पुन्हा धडपडत राहतो, त्या असंख्यातील एक बनण्यासाठी.. माझ्यातल्या संवेदना गोठून टाकत..प्रयत्न करतो. समाजमान्य साचेबंध आयुष्य जगण्याचा. कारण नसताना खरं तर बरोबर चालणाऱ्या कोणाचंच लक्ष नसतं तुमच्याकडे. प्रत्येक जण जगत असतो, आपल्याच धुंदीत..अन् तुम्ही मात्र आपल्या स्वत:तल्या क्षमता न ओळखता उन्मळून पडता. स्वत्व न ओळखता तुलना करत राहता आजूबाजूच्या जिवांशी आणि मग सुरू होतो खेळ सुख- दु:खाचा, आशा- निराशेचा..

परंतु..प्रत्येकाने लक्षात ठेवलंच पाहिजे. प्रत्येकाकडेच स्वत:चं असं काही तरी खास असतं. अगदी कस्तुरीमृगाच्या कस्तुरीगंधासारखंच..खोल कुठे तरी बंद कुपीत दडलेलं असतं. मनीच्या आरशात स्वत:लाच त्रयस्थपणे बघून, बंद कुपीचं दार उघडून, तेच काही तरी खास अलवार ओंजळीत घ्यायचं असतं. अन् याच क्षणी आपलंच आयुष्य आपल्याला नव्याने सापडतं. उलगडत जाते आपसूकच जगण्याची लय. आपण स्वत:च स्वत:च्या प्रेमात पडतो. स्वत:च्याच नजरेत विराजमान होतो एका वेगळय़ाच स्थानावर, उंचीवर.. हा अहंभाव नसतो, हा असतो आत्मविश्वास..स्वत्वाचा, स्वक्षमतांवरचा.. अन् तो जेव्हा. जागृत होतो नं, तेव्हा जगणं नुसतं ‘जगणं’ न राहता..होतो एक सुरेल, सुंदर प्रवास.. मग कोण कोठल्या वाटेने जातोय हे बघायलाही सवड राहत नाही.. नव्याने उघडलेल्या बंद खिडकीबाहेर खुणावत असतं स्वच्छंद आकाश..भरारी घेणाऱ्या पंखात ताकद असते ती स्वत्वाची, स्वजाणिवांची.. आणि मग उन्मळून न जाता, चालत राहतो आपण तीच वाट. शीळ घालत. गात गात..

बागेत असंख्य फुलं फुललेली असतात. रातराणी, मोगरा, गुलाब, जाई-जुई, चाफा, केवडा अशी किती तरी परंतु रातराणीचा गंध ना मोगऱ्याला येतो ना मोगऱ्याचा चाफ्याला.. प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं, प्रत्येकाचं सौंदर्य निराळं.. तसंच काही तरी आपलंही असतं..प्रत्येकाचा रंग, रूप, स्वभाव निराळा..प्रत्येकानेच आपल्यातल्या गंधाला ओळखावं अन् त्यावर भरभरून प्रेम करायला शिकावं.

मग मात्र तो अनामिक गंध तुमच्याबरोबरच इतरांच्या आयुष्याची फुलबागही सुगंधित करून जाईल.
प्रिया बापट – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 1:11 am

Web Title: know yourself
टॅग : Blogger Katta
Next Stories
1 आठवण
2 क्षितिज
3 काळ आला होता, पण..!
Just Now!
X