31 October 2020

News Flash

BLOG : करोनाग्रस्त लंडन

इंग्लंडसुद्धा या विषाणूच्या तडाख्यातून वाचलेले नाही, इंग्लंडमधल्या स्थितीचा आँखो देखा हाल

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

– प्रशांत सावंत ,लंडन

And the vision that was planted in my brain,

Still remains

within the sound of silence

करोना विषाणूच्या जाळ्यात सापडलेल्या आपल्या सर्वांची अवस्था सायमन गारफुरकलच्या कवितेमधील वरील पंक्तीप्रमाणे झाली आहे. हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या चीनमधील वुहान शहरात करोना विषाणूचा उगम झाला आणि हॉलीवूडमधील थरारक चित्रपटाप्रमाणे या खलनायकाने साऱ्या जगाला जेरीस आणले. जेथे रेनेसॉंसचा जन्म झाला त्या इटलीमध्ये त्याने प्रचंड थैमान घातल्यामुळे तेथील बराच भाग लॉकडाऊन झाला आहे. फॅशनेबल पॅरिस आता ब्रँडेड फेसमास्क आणि सॅनिटायझरच्या शोधात आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी, स्वित्झर्लंड, स्पेन इत्यादी देशांनी सुरक्षिततेसाठी जनतेला घरात ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवासुविधा पुरविण्यासाठी चक्क लष्कराचं साहाय्य घेतलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच या देशांमध्ये जागोजागी लष्कर तैनात केलं गेलेलं आहे. बलाढ्य व प्रगत अमेरिकेने या संकटासमोर हात जोडून त्यातून होणारी प्रचंड हानी टाळण्यासाठी कोट्यवधी डॉलर्सचा निधी जनता आणि उद्योगांकरिता खुला केला आहे.
माझे ज्या राष्ट्रात व्यवसायाच्या निमित्ताने कायमस्वरूपी वास्तव्य आहे, ते इंग्लंडसुद्धा या विषाणूच्या तडाख्यातून वाचलेले नाही. करोनाची लागण आणि त्याच्या बळींची संख्या सतत वाढते आहे. परिस्थिती अद्यााप नियंत्रणाखाली आलेली नाही. ‘Keep Calm and Carry On’ ही ब्रिटिश वृत्ती आता बदलू लागली आहे.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या आवाहनानुसार, आता घरातच राहून काम करण्याचा निर्णय सर्वांनी घेतला आहे. मात्र, ट्रेन्स आणि बसेसमधील प्रवास सुरूच होता. शाळाही बंद झालेल्या नव्हत्या. उपाहारगृहे, बेकरी, दुकाने चालूच होती. पब्जमधील चीअर्सचे चीत्कार सुरूच होते. अखेर सरकारने कठोर पावले उचलली. या विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी सगळी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखली. सर्वांच्या सुसह्यतेसाठी वेगळ्या निधीची व्यवस्था केली.

आभासी बंद (Virtual Lockdown)

आता रस्त्यावरील रहदारी जवळपास बंदच झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा मात्र पुरवठा होत असतो. भीतीचे सावट जरूर आहे; परंतु जनजीवन बऱ्याच अंशी सुरळीत चालले आहे. अर्थात, प्रसिद्ध कलादालने, संग्रहालये, प्रेक्षणीय स्थळे बंद ठेवली गेली आहेत. इतर देशांमध्ये राहणाऱ्या माझ्या अनेक मित्रांनी मला विचारले, ‘‘सरकार लोकांना जबरदस्तीने घरी बसविण्यासाठी पोलिसांना पाचारण का करीत नाही?’’
दुसऱ्या महायुद्धानंतर आणि प्रामुख्याने गेल्या वीसएक वर्षांत इंग्लंडमध्ये पोलिसांना रस्त्यावर येऊ देण्याची फारशी वेळ लोकांनी येऊ दिलेली नाही. त्यांनी या संकटकाळी आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करावा आणि त्यायोगे कायदा आणि सुव्यवस्था पाळली जावी, ही अपेक्षा आहे. अर्थात, यास्तव टेक्नॉलॉजीचाही वापर केला गेला आहे. २००५ च्या लंडनमधील बॉम्बहल्ल्यानंतर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसवले गेले आहेत. लोकांनी वाहतुकीचे नियम पाळले नाही तर त्यांना व्यवस्थित पत्र येते आणि त्यात नमूद केलेला दंड भरावा लागतो. गेले काही वर्षं इंग्लंडमध्ये कधीमधी अतिरेकी हल्ले होत असले तरी काही महत्त्वाची स्थळे वगळता लोकांना सतत पोलीस संचार पाहायची सवय नाही. लोकांचा स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क येथे पायदळी तुडवला जात नाही. अर्थात सध्याच्या परिस्थितीत हा हक्कच जीवघेणा ठरला आहे.
सतत घरी बसणे सर्वांनाच शक्य नाही. डॉक्टर, पोलीस, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व्यवस्था करणारे आणि इतर सरकारी महत्त्वाची कामे बंद पडता कामा नयेत, यासाठी लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे सध्या महत्त्वाचे आहे. लोकांना घरातून एकदाच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किंवा जवळच्या पार्कमध्ये व्यायामाकरिता जाण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, लवकरच या स्वातंत्र्याचे योग्य ते पालन केले जात आहे की नाही, हे पाहण्यासाठी पोलीस तैनात केले जातील. कारण शेवटी लोकांचे वागणे सर्वत्र जवळपास सारखेच असते… फक्त त्यांची संख्या वेगवेगळी असते, इतकेच! तथापि सरकारच्या साम आणि दंडाच्या चेतावणीनंतर लोकांची वर्दळ कमी झाली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि विशेष व्यक्तींची काळजी घेतली जात आहे. सुपरमार्केटमध्ये त्यांना खास वेळ दिला जातो. विविध माध्यमांद्वारे, विशेषत: वृत्त तसेच व्यावसायिक वाहिन्यांद्वारे सुरक्षितता आणि खबरदारीचे संदेश दिले जात आहेत. नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास वारंवार बजावले जात आहे. साहाय्याचे आवाहन केले जात आहे. विशेषत: या काळात जनतेचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी विविध कार्यक्रमांची रेलचेल वृत्तवाहिन्या आणि रेडिओवर सुरू आहे. याकरता आधुनिक तंत्रज्ञान उपयोगी पडते आहे. घरातून कार्यालयीन कामे करणे सोपे जात आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर वरिष्ठांनाही करावा लागत असल्याने त्यांच्या आलिशान राहणीमानाचेही आपसूक दर्शन घडते आहे. येत्या काही महिन्यांत जेव्हा सर्व काही सुरळीत होईल तेव्हा आपणसुद्धा अशाच रंगांचे पडदे घ्यायचे ठरवले जात आहे.  मित्रमंडळी एकमेकांचे जेवणाचे बेत आणि पदार्थ व्हिडीओवरूनच दाखवतात. मीही माझ्या सहकाऱ्यांना कोकणी पद्धतीचे कोंबडी-वडे कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक दाखविले. ते पाहून त्यांच्या जिभेलाही पाणी सुटल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. (नशिबाने बाजारात ओले खोबरे मिळाले. टॉयलेट पेपर मात्र अजूनही गायब आहेत.)

आपल्या हातात काय आहे?

व्हिडीओमुळे आईवडिलांशी संपर्क ठेवून काळजीचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न सुरू असतो. भाच्याच्या करामती पाहून मन रिझवता येते. काहींनी ऑनलाइन नवे कोर्स सुरू केले आहेत; तर काही पुस्तकांमध्ये मग्न आहेत. नवीन जीवनशैली लोक हळूहळू अंगवळणी पाडून घेत आहेत.
करोना विषाणू जीवघेणा ठरला आहे यात शंकाच नाही. त्याच्यावर अद्याापि रामबाण उपाय सापडलेला नाही. त्यामुळे आरोग्य सेवा कोलमडून पडण्याच्या बेतात आहे. वैद्याकीय तसेच प्रशासन क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्था जिवाचे रान करत आहेत. जगापुढे  एक मोठे आव्हानच उभे ठाकले आहे. सरकारच्या आदेशांचे पालन करणे, शक्य तितके प्रशासन आणि आपण करत असलेल्या व्यवसाय-उद्योगांत (घरी बसून का होईना!) व्यग्र राहणे, विज्ञानात चमत्कार घडून करोना संपुष्टात येईल अशी आशा करणे आणि आल्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जाणे हेच आपल्या हातात आहे. काही काळासाठी लोकांना आपले प्रेम आणि माया प्रकट करायचे तंत्र बदलावे लागेल. त्यातही महत्त्वाचे हे की, या विषाणूचा माणुसकीवर परिणाम होऊ न देणे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 11:00 am

Web Title: blog corona impact on london
टॅग Coronavirus
Next Stories
1 BLOG : तबलीगी मरकजच्या निमित्तानं; मुस्लिम मनाची वैशिष्ट्ये
2 BLOG: मोदींचे ‘आरवणे’ अन् करोनाचे मावळणे!
3 BLOG : भाजी खाणे तुमच्या जिवापेक्षा महत्त्वाचे आहे का?
Just Now!
X