-महेश टिळेकर, निर्माता-दिग्दर्शक

“महेशा ,काय रे कसा आहेस बेटा तू” असं प्रेमाने चौकशी करणाऱ्या आशालता यांचा फोन आला की माझा तो दिवसच नाही तर पुढचे काही दिवसही मस्त आनंदात जायचे. नेहमी फोनवर आणि भेटल्यावर ही भरभरून बोलून पोटभर गप्पा झाल्याशिवाय माझी ही मैत्रीण समाधानी होत नसे. 2005 मध्ये माझ्या एका टिव्ही सिरीयलमध्ये आशालता यांनी काम केले होते. तेव्हापासूनची आमची मैत्री आणि त्यातला स्नेह कधी कमी झाला नाही. वयाने ज्येष्ठ असूनही सतत नवनवीन शिकण्याची आणि पाहण्याची हौस असलेली ही माझी चिरतरुण मैत्रीण. वयानुसार कधी त्यांनी प्रकृतीची कुठलीच तक्रार केलेली मला तरी आठवत नाही.

खाऊन पिऊन सुखी आनंदी राहणारी. मी नेहमी त्यांना गमतीने विचारायचो, “आशाताई तुमची ही तरुणांनाही लाजवेल अशी तुकतुकीत कांती, गोरे गोबरे गाल याचं रहस्य काय?” माझा प्रश्न ऐकून त्या हसून उत्तर द्यायच्या की “काही नाही रे, मस्त आनंदात जगायचे आणि रोज चार मजले चढते उतरते. त्यामुळे फिट राहते मी.” त्या एकट्या राहत असूनही कधी कसली कुरकुर करताना मी त्यांना पाहिलं नाही. त्यांच्या आई वडिलांनी त्या काळी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे नावं प्रसिद्धीच्या झोतात होते म्हणून या दोन गायिकांचे नाव एकत्र करून ‘आशालता’ हे नाव ठेवले होते. त्याचा आशाताईंना नेहमी अभिमान असे.

माझ्या वन रूम किचन चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी भरत, भार्गवी, विजू दादा, किशोर प्रधान सर्वच कलाकारांनी मिळून खूप धमाल केली. आशाताई खाण्याच्या बाबतीत पण खूप शौकीन आणि विजू खोटे पण. त्यामुळे खाण्याचे त्यांचे लाड पुरवताना मलाही खूप आनंद व्हायचा.

सतत नवीन ठिकाणं आणि मोठ्या व्यक्तींना, कलाकारांना भेटायला त्यांना फार आवडायचं. एकदा त्यांना आणि विजू खोटे यांना मी बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला घेऊन गेलो तेव्हा तिथेही तासभर आमच्या गप्पा रंगल्या. काही वर्षांपूर्वी आम्ही एकत्र फॉरेन टूर केली. तिथे एका छोट्या क्रुजवर पॅरा ग्लायडिंगची व्यवस्था होती. अनेकजण ते करताना पाहून मीही त्याचा आनंद घेतला. तेव्हा समुद्राच्या वर उंचावर मला पॅराशुटमध्ये पाहून त्यांना आनंद झाला आणि मी खाली उतरल्यावर त्यांनी लहान मूल हट्ट धरते तसं मला सांगितलं “महेशा मला पण असं पॅराशुटमधून उंचावर जायचं आहे.” त्यांचे वय पाहता मी त्यांना आधी नाही सांगितल्यावर “काही होत नाही रे मला, तू नको काळजी करू, मेलं अर्ध आयुष्य तर गेलं, आता नाही एन्जॉय करायचं तर कधी?” त्यांचा तो उत्साह पाहून मी होकार दिला. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्याचा त्यांचा आणि माझा स्वभाव सारखाच असल्यामुळे कदाचित माझ्याहून वयाने त्या जास्त असूनही आमची मैत्री होती. देशातील किंवा परदेशातील एखाद्या नवीन शहराची माहिती मिळाली की मला लगेच फोन करून “महेशा आपण जाऊयात रे या ठिकाणी ” असं सुचवून मला लवकर प्लॅनिंग कर असंही सांगायच्या.

एकमेकांच्या घरी जेवायला आम्ही एकत्र भेटायचो तेव्हा जेवणाच्या आधी किमान दोन तास तरी गप्पा आणि मग जेवण हे ठरलेलं असायचं. एकदा त्यांच्या घरी मी विजू खोटे, लीलाधर कांबळी, किशोर प्रधान असे एकत्र जेवायला जमलो. तेव्हा मी गमतीने त्या सगळ्यांना म्हणालो तुम्हा ज्येष्ठांच्या मध्ये मीच तरुण आहे एकमेव. तेव्हा “महेशा, मी तर बाबा म्हातारी नाही हं, तू यांना बोल हवं तर” असं लाडाने बोलून त्यांनी गप्पांच्या मैफिलीत मत्स्यगंधा नाटकातील नाट्यगीत म्हणून दाखवलं. त्या गात असताना तिथे लावलेल्या उदबत्तीचा गंध आणि आशाताईंचा त्या वयातील तो खणखणीत आवाज माझ्यासाठी तर अविस्मरणीय आहे

मागच्या महिन्यात आमचे फोनवर बोलणे झाले तेव्हा “आशा पारेख यांना भेटून खूप वर्ष झाली त्यांच्या मालिकेत मी काम केले होते रे, पण मधल्या काळात काहीच संपर्क नाही राहिला, महेशा तुझी चांगली ओळख आहे त्यांच्याशी ,मलाही घेऊन चल एकदा” असं हक्काने आशाताईंनी मला सांगितल्यावर हे करोनाचे संकट जाऊ दे मग नक्कीच आपण भेटू एकत्र असं मी सांगितल्यावर त्या खुश झाल्या. पण हाच करोना त्यांच्या मृत्यूला कारण ठरला. आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!