• दिग्विजय जिरगे

हा तोच संघ आहे का ज्याने एकेकाळी आपल्या धारदार गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजीच्या जोरावर जगातील सर्व संघांवर वर्चस्व गाजवले होते..हा प्रश्न सध्याच्या वेस्ट इंडिज संघाकडे पाहिल्यानंतर क्रिकेट रसिकांना पडला असेल. गॅरी सोबर्स, क्लाइव लॉइड, गार्डन ग्रिनिज, व्हिव्ह रिचर्डस, माल्कम मार्शल, मायकल होल्डिंग, कर्टली अम्ब्रोज, कर्टनी वॉल्श, ब्रायन लारा, चंदरपॉल असे एकशे एक उत्तम दर्जाचे आणि आपल्या कामगिरीने प्रतिस्पर्धींच्या मनात धडकी भरवणारे खेळाडू होते. या परंपरेत मोडत नसला तरी आणखी एक खेळाडु होता, ज्याची कामगिरी इतर संघांबरोबर बऱ्यापैकी होती. पण भारताविरोधात मात्र एक्स्ट्रा ऑर्डनरीच होती. तो या महान खेळाडुंच्या पंक्तीत मोडत नसला तरी १९९४ मध्ये भारतीय संघाला घाम फोडणारा तो हाच फलंदाज.. त्याचे नाव जिमी अॅडम्स..

राजकोटमध्ये अवघ्या ३ दिवसांत टीम इंडियाने विंडीजला चारीमुंड्या चित केले. एक डाव आणि २७२ धावांनी भारताने हा सामना जिंकला. तेव्हा राहून राहून हा जमैकन जिमी अॅडम्स आठवला. १९९४ च्या सुमारास कदाचित विंडीजच्या तळपत्या सुर्याचा अस्त होत होता. तरीही या संघाची बऱ्यापैकी दहशत होती. मी शाळेत होतो. क्रिकेटचे प्रचंड वेड.. म्हणजे कसोटी सामनेही संपूर्ण दिवसभर पहिल्या चेंडूपासून टीव्हीवर पाहण्याचा तो आमचा काळ होता. कधीतरीच २-३ षटकानंतर एखादी धाव निघायची. पण त्याचाही मनमुराद आनंद आम्ही मित्रमंडळी घेत. ३ सामन्यांची ही कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. ही मालिका या डावखु्ऱ्या फलंदाजामुळे बरोबरीत सुटली. याने भारतीय गोलंदाजांना अक्षरश: हैराण करुन सोडले होते. हा धड बाद होत नव्हता..अन् धावाही पटापट काढत नसत (म्हणजे मंदगती गोलंदाजीप्रमाणे मंदगती फलंदाजी करत). त्यामुळे टीव्हीवर सामना पाहणाऱ्याला तर वैताग यायचा. भारताचे खेळाडू आणि प्रत्यक्ष मैदानात सामने पाहायला गेलेल्यांची अवस्था काय झाली असेल याचे वर्णन करणेही अशक्य आहे.

हा बॅटने कमी आणि पॅडनेच जास्त फलंदाजी करतो, असे आम्ही त्यावेळी विनोदाने म्हणत. त्यामुळे त्याला जिमी अॅडम्स नव्हे तर जिमी पॅडम्स असेही म्हटले जात.

तर जिमी अॅडम्सची आठवण येण्यामागचे कारण म्हणजे हा पठ्ठ्या एकटा २-२ दिवस फलंदाजी करत (भारत दौऱ्यावर असलेला विंडीजचा संघ पहिल्या कसोटीत २ दिवसांत २ वेळा बाद झाला). दिग्गज फलंदाज बाद होत असतानाही तो अत्यंत धैर्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या नाकावर टिच्चून फलंदाजी करत. त्याकाळी भारताकडेही दिग्गज गोलंदाज होते. त्यांना हा चांगलाच पुरुन उरला होता. तो फलंदाजीस आल्यानंतर आम्ही टीव्हीसमोरुन उठून जायचो. हा काही आता २ दिवस क्रीजवरुन जात नाही, अशी मनाची तयारी करुनच आम्ही घराबाहेर पडायचो.

केवळ जिमीमुळे भारताच्या हातातोंडाशी आलेली ती कसोटी मालिका बरोबरीत राहिली. माझ्यासारख्या अनेकांनी त्यावेळी त्याला शिव्याशाप दिल्या असतील. या ३ कसोटीत जिमीने खोऱ्याने धावा कुटल्या. ३ कसोटीत १७३.३३ च्या सरासरीने त्याने तब्बल ५२० धावा केल्या. यामध्ये २ शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. सामनावीराचा पुरस्कारही त्याने मिळवला. जिमी अॅडम्सने ५४ कसोटीत ३०१२ धावा (४१.२६ सरासरी) केल्या आहेत. तो डावखुरा फिरकीपटू तसेच गलीतला एका चांगला क्षेत्ररक्षकही होता. त्याने विंडीज संघाचे नेतृत्वही केले. पण त्यात त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. मध्यंतरी त्याची विंडीज क्रिकेट मंडळावरही निवड झाली होती. प्रशिक्षकाची भूमिकाही त्याने निभावली. इतर संघांपेक्षा भारताविरोधातील कामगिरी त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम ठरली. सध्याच्या विंडीज संघात अशा एका जिमी अॅडम्सची गरज आहे.. जो विंडीजला तारेल (भलेही भारताला नको असला तरी क्रिकेटला त्याची गरज आहे).

एकेकाळी क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणारा हा संघ अवघ्या २ दिवसांत ढेपाळतो, ही न पचणारी गोष्ट आहे. गेल्या काही वर्षांतील वेस्ट इंडिज संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंमधील वादाचा हा परिणाम असल्याचे बोलले जाते. आणखी २ कसोटी बाकी आहेत. त्यात हा संघ काय कामगिरी करतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

  • दिग्विजय जिरगे
  • divijay.jirage@gmail.com