14 October 2019

News Flash

राज ठाकरे : एक अतिशय गोंधळलेलं व्यक्तिमत्व

मराठी मनाचा आवाज म्हणून ज्या नेत्याकडे खूप विश्वासाने पहिले होते त्याच्या पक्षाची अजून वाताहत होणार.. हे मात्र नक्की...

(संग्रहित छायाचित्र)

– चेतन दीक्षित

संविधानाचे अधिष्ठान लाभलेल्या लोकशाहीमध्ये शासन हे बहुमतानं बनत असतं. ह्या देशात एकंदरीतच लोकशाहीचा प्रवास पाहता खऱ्या अर्थाने बहुमताचे असे सरकार आलेच नाही. अगदी पहिली निवडणुक पाहिली तर नेहरूंना एकूण मतदानापैकी साधारण ४५ टक्के मते मिळाली होती आणि १९८४ साली राजीव गांधींना जे पाशवी म्हणतात तसं बहुमत मिळालं तेव्हाही ही टक्केवारी ४८ टक्के वगैरे होती. त्यामुळे तसे ५० टक्के कोणीही ओलांडले नाहीत.. राजीव गांधी असेपर्यंत तसे प्रादेशिक पक्षाचे तसे चालले नाही. तेवढा खंबीर विरोधक आला नाही. कारणे काहीही असो, वस्तुस्थिती ही साधारण अशीच होती. मात्र राजीव गांधींच्या दुर्दैवी हत्येनंतर मात्र ह्या प्रादेशिक पक्षांचे प्रस्थ वाढू लागले आणि अगदी एक आकडी खासदार संख्या असणाऱ्या पक्षाच्या अध्यक्षाला पंतप्रधानपदाचे स्वप्न पडू लागले, तो इतिहास आपल्या सर्वाना ठाऊक आहेच..

हे असं का झालं? तर माझ्याकडे, माझ्या पक्षाकडे जरी जास्त उमेदवार निवडून आणायची क्षमता नसली तरी मी इतरांचे उमेदवार पाडू शकतो, ह्यावर असलेला विलक्षण विश्वास. थोडक्यात असलेले आणि जाणवलेले उपद्रव मूल्यच. आणि हेच उपद्रव मूल्य लोकशाहीच्या मुलभूत संस्कारावर घाला घालते.

आता सध्याच्या महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर उपद्रव मूल्याच्या अनुषंगाने, एक नाव नक्कीच घोंघावतंय ते म्हणजे राज ठाकरे. पण ह्या राज ठाकरेंच्या उपद्रव मूल्याची परिमाणेच ही प्रचंड गोंधळलेली दिसतात. जी केवळ त्यांच्या व्यक्तिमत्वालाच नव्हे तर त्यांच्या एकंदरीत पक्षाला हानिकारक ठरली आहेत, येत्या काळात अजून ठरतील..

“माझा वाद विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी आहे” म्हणून एक रुबाबदार आणि तेवढंच धीरगंभीर व्यक्तिमत्व शिवसेनेतून बाहेर पडलं, राज्याचा दौरा केला, तरुणाई ह्या व्यक्तिमत्वाच्या मागे वेडी झाली, जागोजागी त्यांच्या भाषणाच्या क्लिप्स वाजू लागल्या, त्याचं पाठांतर सुरु झालं. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. तमाम तरुणाईचे आकर्षण म्हणजे राज ठाकरे असे काहीसे समीकरण बनले. पहिल्याच निवडणुकीत तब्बल तेरा आमदार निवडून आले. आणखी तेरा जागांवर क्रमांक दोनची मते मिळाली. एकोणतीस जागांवर मनसेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. ज्याठिकाणी मनसे निवडून येऊ शकत नव्हती तिथे भाजपा-शिवसेनेचे उमेदवार, मतविभाजनामुळे पडले. त्याच वर्षी, विधानसभेआधी झालेल्या लोकसभेत ह्या मनसेचा सगळ्यात जास्त फटका हा भाजपा शिवसेनेच्या उमेदवारांना पडला कारण युतीचा पारंपरिक मतदार ह्या नेत्याला भुलला. युतीचं प्रचंड नुकसान झालं जरी मनसेचा एकसुद्धा खासदार आला नसला तरी..

त्याचसुमारास पुणे मनपामध्ये मनसे मुख्य विरोधी पक्ष म्हणून पुढे आला, तर नाशिक मनपा खिशात घातली.. आणि २०१४ ची लोकसभा आली..

२०१४ पर्यंत मनसेने जे काही मिळवले होते. कदाचित त्याची हवा डोक्यात गेली असेल पण नंतर त्याला उतरती कळा लागली. राज ठाकरेंचे वक्तृत्व आणि त्यांचे ठाकरे हे आडनाव सोडले तर त्यांच्यामध्ये असं काय आहे कि पत्रकार त्यांना दूरदृष्टीचा नेता म्हणतात असा मला नेहमी प्रश्न पडतो.. कारण जे यश मनसेला मिळालं. ते राज ठाकरेंना टिकवता आलं नाही, निवडून आलेल्या उमेदवारांसोबतच..

राज ठाकरेंच्या गोंधळाची सुरुवात त्यांच्या पार्टटाइम राजकारणापासून होते. राज ठाकरे हे पूर्णवेळ राजकारणी नाहीत. ते सहा सहा महिने दिसत नाहीत. दिसले तरी कधी गायब होतील सांगता येत नाही. पण २०१४ पर्यंत राज ठाकरेंची जी मोहिनी मराठी मनावर घातली गेली होती त्यामुळे हे कोणाच्या फारसे लक्षात आले नाही. २००९ मध्ये मनसेने ११ उमेदवार उभे केले होते आणि मतविभाजनामुळे त्याचा जबर फटका युतीला बसला होता, हे सर्वांना माहीत आहेच. कदाचित राज ठाकरे त्याच २००९ च्या प्रभावाखाली असावेत आणि भाजपा-शिवसेना ही जाहीर युती असूनही त्यांनी २०१४मध्ये सेनेविरोधात ९ उमेदवार उभे केले होते, सोबत मोदीनामाचा जप होताच. २०१४ साली ते अशा प्रकारे मोदींच्या आहारी गेले कि कदाचित त्यांना त्यांच्याच पक्षाचा विसर पडला असावा. कारण सभांमधून मोदींना मत द्यायचा आग्रह ते करीत. ही गोष्ट पत्रकारांच्या नजरेमधून कशी सुटेल?? २०१४ च्या लोकसभेच्या सुमारास त्यांचे जेवढे काही इंटरव्युज झाले, त्यामधून जेंव्हा त्यांना विचारलं जायचं, कि जर मोदींच पंतप्रधान हवेत तर मग मनसेला लोकांनी का मत द्यावं? युतीला का नको? सरळ घास समोर असताना अवघडातला का बुवा? ह्या अश्या प्रश्नांवर ते प्रचंड चिडायचे. त्यांची ती चिडचिड युट्युबवर अजूनही उपलब्ध आहे. मतदारांनी जो काय द्यायचा तो निर्णय दिलाच. ह्या अश्या गोंधळामुळे मनसेला डिपॉझिटसुद्धा वाचवता आलं नाही आणि मनसेची जी अपेक्षित धूळधाण उडाली त्यानंतर राज ठाकरेंच्या गोंधळात अजून वाढ झाली..

नंतरच्या विधानसभेच्या वेळेस तर राज ठाकरेंच्या लहरी स्वभावाला कंटाळून मनसेला बऱ्याच जणांनी जय महाराष्ट्र केला होताच.. आधी मुंबई, पुणे नाशिक एवढ्याच तीन जिल्ह्यांमध्ये पसारा असणाऱ्या मनसेला खरंतर सावरणं एवढं अवघड नव्हतं. पण त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं गेलं नाही. विधानसभेचे पडघम वाजू लागले. पक्ष संघटन बऱ्यापैकी मोडकळीस आलं होतं. कदाचित ह्याचे भान ह्या दूरदृष्टीच्या नेत्याला आले नसेल. एका सभेत त्यांनी स्वतःच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून स्वतःला सादर केले. लगेच दोन चार दिवसात ती घोषणा मागे घेतली गेली.. अजून एक गोंधळ..

त्या निवडणुकीत ह्या पक्षाला केवळ आणि केवळ एक आमदार मिळाला, त्याकडेही ह्या पक्षाने लक्ष दिलं नाही. त्यानेही नंतर मनसेला जय महाराष्ट्र केला..

२०१७ मध्ये पुण्यातला हा सर्वात मोठा विरोधी पक्ष केवळ दोन जागेवर आला, सहाव्या स्थानावर फेकला गेला. नाशिक मनपा हातातून तर गेलीच आणि हा पक्ष पाचव्या स्थानावर फेकला गेला. निवडणुकीनंतर ह्यांचा पक्ष सोडणाऱ्यांवर एक प्रबंध होऊ शकतो.. प्रबंध..

हातात जे जे होतं, जे जे मिळवलं होतं.. ते ते सगळं स्वतःच्या गोंधळलेल्या मानसिकतेने या नेत्याने ते घालवलं. मधूनच हुक्की आली कि आंदोलनं करायची. लगेच गुंडाळली जायची. “ए दिल है मुश्किल”च्या बाबतीत एकदम जाग आली कि ह्या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार आहेत, उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर. पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले गेले. त्याची नंतर मांडवली कशी झाली हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. खरंतर ह्यानंतर रईस, मॉम, हिंदी मीडियम सारखे चित्रपट येऊन गेले कि ज्यामध्ये पाकिस्तानी कलाकार होते.. पण राज ठाकरेंनी सोयीस्कर मौन पाळलं. अजून एक गोंधळ..

मराठी पाट्यांचं आंदोलन केलं गेलं. का? तर मराठी भाषा म्हणून पण त्यानं इंग्रजीतल्या Restaurant चं मराठीत रेस्टॉरंट झालं त्याचं उपहारगृह झालंच नाही.. अजून एक गोंधळ..

खरंतर जनाधार सुटत चालल्यावर खरा आधार कार्यकर्त्यांचाच असतो.. कोणतेही भाषण काढून ऐका. जर कोणी कार्यकर्ता ह्यांच्या नावाने घोषणा देत असेल तर “हम्म.. बास करा आता” असं राज ठाकरे दरडावून सांगतात. हे असं एकतरी नेता आजच्या घडीला बोलतो? हा तर मला अजून एक मोठा गोंधळ वाटतो, जो त्यांना स्वतःच्याच कार्यकर्त्यावर ओरडायला भाग पाडतो.

आता हेच राज ठाकरे लोकसभा लढवत नसले, (अर्थात कोणाच्या जीवावर लढणार होते म्हणा) तरी बऱ्याच ठिकाणी सांगत आहेत कि कोणालाही मतदान करा पण मोदी-शहांना नको.. म्हणजे कोणाला तर पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीला. ज्यांच्या विरोधात रान पेटवून ह्यांनी यश मिळवलं होतं. काहीच महिन्यात, येत्या विधानसभेत महाराष्ट्रात ह्यांचा काय रोख असणारे? मतदार या सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष देऊन असतो. मोदींकडून ह्या राज ठाकरेंची वैयक्तिक जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही म्हणून हा जो काही आकांडतांडव मांडलाय, हा तर त्यांच्या आत्तापर्यंतच्या गोंधळाचा शिरोमणी ठरेल यात मला कसलीच शंका वाटत नाही. त्यांनी केलेले बरेच दावे पूर्णपणे एककल्ली म्हणून बाहेर येत आहेत..

स्वतःच्या अपयशावर हा नेता एक अवाक्षर काढायला तयार नाही.. आणि सगळी बोटं दुसरीकडे.. एका मनपाच्या विकासाची ब्ल्यूप्रिन्ट ह्या नेत्याने चेष्टेचा विषय बनवला आणि आज हा माणूस वेचून काढलेले सिलेक्टिव्ह विडिओ दाखवून सभा घेतोय?? ज्याची उत्तरे पब्लिक डोमेन मध्ये आधीच उपलब्ध आहेत, तेच प्रश्न शंभरदा विचारतोय??

एक मुलाखतीत यांनीच मनसेची तुलना भाजपाशी केली होती. पण त्यावेळेस ते एक विसरले कि भाजपाची सुरुवात दोन खासदारांपासून झाली होती. दोन खासदारांपर्यंत येऊन थांबली नव्हती. घरादाराचा त्याग करून संघाच्या माध्यमांतून जन्मलेली भाजपा आणि राज ठाकरे याच नावापुरती एकवटलेली मनसे.. कुठे तुलना होतीये? हा गोंधळ छोटाय?

सध्याच्या सभांमधून त्यांची जी काही वक्तव्ये सुरु आहेत तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्याबद्दल वेगळं असं लिहीनच. पण राज ठाकरे ज्यापद्धतीने सभा घेत आहेत, त्याचा फायदा काँग्रेस वा राष्ट्रवादीला कितपत होईल ते येणारा काळ ठरवेलंच. परंतु याचा नकारार्थी परिणाम मनसेच्या उरल्या सुरल्या अस्तित्वावर नक्कीच होणार आणि मराठी मनाचा आवाज म्हणून ज्या नेत्याकडे मराठी मनाने खूप विश्वासाने पहिले होते त्याच्या पक्षाची अजून वाताहत होणार.. हे मात्र नक्की..

First Published on April 26, 2019 5:12 pm

Web Title: raj thackeray is a confused personality