BLOG :साठी बुद्धी नाठी !

अर्थाच परिस्थितीनुरूप मनाप्रमाणे आयुष्याचा शेवट होईलच असं नाही. पण जगणं मात्र शेवटपर्यंत मनमोकळं असावं

The-Kominsky-Method

खरंतर भारतामध्ये वयाची ६० वर्ष उलटून गेली की माणसं निवृत्तीसाठी बघितलेली स्वप्नं प्रत्यक्षात आणू पाहतात. मग कोण चारधार यात्रा करतं, कोणी केसरी टूर्सबरोबर युरोप सहलीला जातात, कोणी आपल्या फार्म हाऊसवर आयुष्य घालवायचं ठरवतात. हे सगळं करताना संसारातला आपला सहभाग कमी करायचा आणि परतीचा प्रवास सुरू करायचा असा एक दृष्टीकोन असतो. पण आज आपण ज्या आजी-आजोबांबद्दल बोलणार आहोत ते साठी काय सत्तरी उलटली तरी तरुणांच्या बरोबरीने धम्माल-मस्ती करणारे, बारमध्ये जाऊन नाचणारे, प्रेमात पडणारे आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आनंदी राहणारे आहेत.

गेल्या आठवड्यामध्ये हॉलिवूड अभिनेता मायकल डग्लस याने “द कॉमिन्स्की मेथड” या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सीझन येत असल्याचं जाहीर केलं. याच महिन्याच्या शेवटी हा सीझन येणार असून त्याबद्दल उत्सुकता नक्कीच आहे कारण पहिले दोन्ही सीझन हिट ठरले होते. डग्लस (सँडी कॉमिन्स्की) आणि अ‍ॅलन आर्किन (नॉर्मन) हे वयाची ७० वर्ष पार केलेले दोन मित्र. डग्लस हा अभिनेता असतो आणि आता उतारवयात तो अभिनयाचे धडे देतो. त्याची तीन लग्नं आणि घटस्फोट झाले आहेत व तो आपल्या मुलीबरोबर राहतो. अ‍ॅलन हा वकील आहे आणि पहिल्याच भागामध्ये त्याची बायको कॅन्सरने मरते. त्यामुळे या दोन मित्रांची भावनिक जवळीक अधिक होते. पण हे एवढं सरळ नाही. डग्लस हा मुक्तपणे वावरणारा, तरुणांप्रमाणेच डेटला जाणारा, इगो असलेला आणि आपल्याला झालेला आजार मान्य न करणारा बिनधास्त व्यक्तिमत्व असतं. दुसरीकडे अ‍ॅलन मात्र अजूनही त्याच्या बायकोच्या प्रेमात अडकलेला, मुलीच्या व्यसनाधीनतेमुळे थोडा चिंतेत असलेला आणि बायकोची कमी भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टीत मन गुंतवण्याचा प्रयत्न करणारा एक मध्यममार्गी मनुष्य असतो. पण हे दोघेही जेव्हा एकत्र येतात तेव्हा लहान मुलांप्रमाणे भांडतात, एकमेकांच्या इगोला धक्के देतात आणि सॉरी म्हणून पुन्हा गळ्यात गळे घालतात. या मालिकेतले काही प्रसंग तर अप्रतिम रंगीले आहेत. अ‍ॅलनची बायको मरते तेव्हा तिची शोकसभा ही रडारड, कंटाळवणी होऊ नये म्हणून ती आधीच आपल्या इच्छा लिहून ठेवते. त्यामध्ये कार्यक्रम हा अमेरिकेतला प्रसिद्ध निवदेक-मुलाखतकार जे लेनोकडून करवून घ्यायचा, बार्बरा स्ट्रेसँडचं गाणं आणि लेडी मार्मालेड हे प्रसिद्ध गाणं म्हणायचं, अशा इच्छा व्यक्त केलेल्या असतात. गंमत म्हणजे डग्लस या शोकसभेला आपल्या गर्लफ्रेंडला डेटला बोलवतो. आणि हा सांस्कृतिक सोहळा पाहून तीही खूष होते. आणखी एका भागामध्ये डग्लसची मुलगी आपण लग्नं करणार असल्याचं जाहीर करते. पण आपल्या बापाच्या वयाच्या माणसाशी. ते एकून बाप अर्थातच चिडतो. पण त्या माणसाला भेटल्यावर तो समवयस्क असल्याने ते दोघेही गप्पांमध्ये एवढे हरवून जातात की त्या मुलीला विसरतात. रोजच्या आयुष्यातल्या अशा अनेक धम्माल कथा यामध्ये येत राहतात, थोड्या आनंदी, थोड्या दुःखी.

अशीच काहीशी कथा आहे “ग्रेस अ‍ॅण्ड फ्रँकी” या मालिकेतील दोन प्रमुख पात्रांची. या दोघीही ७० पार केलेल्या आणि यांचे नवरे एकत्र व्यवसाय करत असतात. पहिल्याच भागामध्ये ते जाहीर करतात की आम्ही तुम्हांला दोघींना घटस्फोट देतोय एकमेकांशी लग्नं करायला. या वयात येऊन नवऱ्याने दुसऱ्या बाईशी लग्नं केलं असतं तरी चाललं असतं पण हे दोघं एकमेकांशी लग्नं करणार म्हणून त्या दोघींना एकदम धक्का बसतो आणि पुढे काय करायचं हे ठरवण्यासाठी त्या एकत्र राहू लागतात. पण ४० वर्षांच्या लग्नातून बाहेर येणं, समलिंगी माणसाबरोबर एवढा संसार करणं, मोठी झालेली मुलं, नातेवाईक अशा अनेक गोष्टी त्यांच्यासमोर येत राहतात. पण या सगळ्या कल्ला भावनिक न करता विनोदी पद्धतीने दाखवलं आहे. नवऱ्यांना या वयात लग्न करावंस वाटू शकतं तर आपल्यालाही पार्टनर मिळू शकतो, संसारात अडकलेलं मन सोडवून घेणं, आपले छंद शोधणं, एकमेकींबरोबरही भांडणं अशी मस्ती या दोघी जणी सर्व भागांमध्ये करतात. शेवटी त्या आपल्या नवऱ्यांना एकमेकांशी लग्नं करायलाही मदत करतात. कोणताही भावनोद्रेक न होता, नात्यांचा आव न आणता त्या हे नवीन आयुष्य हळूहळू जगायला शिकतात. अमेरिकन संस्कृतीचे चांगले-वाईट असे स्वतःचे गुणधर्म असतील. पण आयुष्यात होणाऱ्या बदलांना हसत खेळत स्वीकारणं हे या दोन्ही मालिकांमधून दिसतं.

 

तिसरी आजी मात्र एकदम इरसाल आहे. “द लॅडी इन द व्हॅन” ब्रिटीश चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. प्लेन बॅनेट या लेखकाने मिस शेफर्ड नावाच्या एका म्हाताऱ्या बाईवर लिहिलेली ही कथा मॅगी स्मिथ या गुणी अभिनेत्रीने अप्रतिम साकरली आहे. या लेखकाच्या घराबाहेर एकदा एक म्हातारी बाई आपली व्हॅन पार्क करते. ती व्हॅनमध्येच राहत असते आणि अत्यंत उपद्रवी असते. त्यामुळे बाकीचे लोक कायम तिला पिटाळून लावत असतात. पण लेखक तिला गाडी पार्क करायची मुभा देतो आणि तिचा इरसालपणा सुरू होतो. १५ वर्ष ती अशा पद्धतीने राहते आणि या काळामध्ये लेखक आणि तिच्यामध्ये एक भावनिक धागा निर्माण होतो. भूतकाळात तिच्याकडून एक अपघात झालेला असतो आणि त्यासाठी पोलीस आपल्याला पकडतील म्हणून ती व्हॅनमध्ये राहून पोलिसांपासून लपत असते. तिचं गलिच्छपणं राहणं, अख्ख्या गाडीमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गोष्टी गुंडाळून ठेवणं, लेखकाच्या सहानभूतीचा फायदा घेऊन त्याच्याकडून व्हॅनमध्ये टीव्ही बसवून घेणं, आजूबाजूच्या लोकांची मदत घेणं पण त्यांना विचित्र काहीतरी बोलणं, असं ही आजी खूप काही करत असते. पण लेखक मात्र कदाचित आपल्या लांब राहणाऱ्या आईच्या पोटी असलेल्या कर्तव्याच्या भावनेतून या आजीशी चांगलंच वागत राहतो. अगदी तिला आपल्या घरातलं शौचालय वापरायला देण्यापर्यंत सुविधा तो देतो. तिच्याबद्दल निर्माण झालेल्या कुतूहलामुळे तो तिचा शोध घेत जातो. तेव्हा त्याला कळतं की तिचा भाऊ त्याच शहरात राहत असतो. पण तिच्या विचित्र स्वभावामुळे ते एकत्र राहत नाहीत. आजी खरतरं सुंदर पियानो वादक असते. म्हातारपण, पोलिसांची भीती, एकटेपणा यामुळे तिच्यावर थोडाफार मानसिक परिणाम झालेला असतो आणि ती स्वार्थीपणे वागत राहते. उतारवयामध्ये स्वभावात झालेले बदल आणि एकट्याने जगताना संघर्ष पण त्याचवेळी समोरच्याला त्रास देतील अशी खोडी अशी ही आजी आहे. यातही भावनेता अतिरेक नाही उलट वस्तूस्थितीच दाखवली आहे. म्हातारपण कोणालाही चुकलेलं नाही. आयुष्याच्या अंताकडे जाताना तो हसत-खेळत, समाधानी जावं. अर्थाच परिस्थितीनुरूप मनाप्रमाणे आयुष्याचा शेवट होईलच असं नाही. पण जगणं मात्र शेवटपर्यंत मनमोकळं असावं असं काहीसं यातील प्रत्येक गोष्ट सांगून जाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Blog by shriti ganpatye on the kominsky method the lady in the van review kpw

Next Story
BLOG: आयपीएल समालोचकांची शब्दसंपदा आणि ‘ट्रोल’भैरव!
ताज्या बातम्या