-श्रुति गणपत्ये

आभासी दुनियेने आपल्या सर्वांवर कधीच कब्जा केला आहे. या दुनियेवर आपल काहीच नियंत्रणही नाही. या दुनियेतल्या चांगल्या, यशस्वी कथाच नेहमी सांगितल्या जातात. कोणी यूट्यूब स्टार असतं तर कोणाला फेसबुकवर प्रचंड मोठं फॅनफोलोइंग असतं तर काहींच्या ट्वीट आणि इन्स्टाग्रामला लाखांच्या घरात लाइक्स मिळतात. टिकटॉकसारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून अनेक जण एका रात्रीत प्रसिद्ध होतात. या दुनियेमध्ये सगळंच छान छान, उत्तम असतं. चांगलं दिसणं, चांगलं बोलणं, दिवस मजेत आणि आनंदी घालवणं, वास्तवातले प्रश्न फारच कमी येतात. पण त्यातच बहुतेक जण खूष असतात. ज्यांच्याकडे हे नसतं ते मात्र उदास किंवा स्वतःला कमी लेखून राहतात. ही आभासी दुनियाच अनेकांसाठी वास्तव बनते आणि इथूनच प्रश्न सुरू होतात. अशाच तरुणांची कथा “चुत्झ्पा” या मालिकेमध्ये आहे. भारतामध्ये तरुणांवर भाष्य करणाऱ्या मालिका या हॉस्टेल आणि कॉलेज जीवन एवढ्याच मर्यादीत असतात. त्यामुळे सोनी लिव्हवर डार्क नेट म्हणजे सोशल मिडियामध्ये अडकलेली तरुणाई असा विषय घेऊन सिमप्रित सिंग यांनी ही मालिका दिग्दर्शित केली आहे. त्याचं सादरीकरण, दृश्य प्रभाव खूप चांगला आहे. पण मांडणी मात्र फारशी वेगळ्या अंगाने जात नाही आणि काही ठिकाणी तोचतोचपणा येतो.

आजकाल अनेक तरुणांचं आयुष्य हे सोशल मिडियावर अवलंबून आहे. तिथले लाइक्स डिसलाइक्स त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरतात. मैत्री सोशल मिडियावर होते, प्रेमही होतं, भांडणंही होतं, फेमसही इथेच होता येतं आणि वर्च्युअल असलेलं हे जग खरं वाटायला लागतं. या कथेमध्ये केविन पॉल (गौतम मेहरा) हा सोशल मिडियावर व्हिडिओ आणि तत्सम माहिती बनवणारा आहे. त्याची सगळी दुनियाच त्याला किती लाइक्स मिळतात आणि काय प्रतिक्रिया येतात याभोवती फिरते. त्याला दिपाली शाह (अशीमा महाजन) नावाच्या आणखी एका सोशल मिडिया इन्ल्युएन्सरने जी प्रचंड लोकप्रिय आहे फॉलो करावं अशी इच्छा आहे कारण त्यामुळे त्याचे लाइक्स, फॅन वाढतील, असं त्याला वाटतं. त्याचा रुममेट प्रतिक चावला (क्षितिज चौहान) याला आपण कोणत्याही मुलीला पटवू शकतो आणि तिच्याबरोबर शारिरीक संबंध ठेवू असा भ्रम आहे. त्यासाठी तो सतत वेगवेगळ्या मुलींना आकर्षित करण्यासाठी सोशल मिडियावर चॅटमध्ये रमलेला असतो. आपण फारच कोणीतही ग्रेट आहोत अशी प्रतिमा तो उभी करत राहतो. यांचा तिसरा मित्र रिषी (मनजोत सिंग) हा मुलींशी बोलायला घाबरतो त्यामुळे आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पॉर्न वेबसाइटवरील मुलीशी चॅट करतो. विकास भल्ला (वरुण शर्मा) हा अमेरिकेमध्ये नोकरीसाठी गेला आहे पण त्याचं तिथे मन लागत नाही आणि आपल्या गर्लफ्रेंडशी तो लॉंग डिस्टंस रिलेशन ठेवतो. तो सिरीसारखं एक अ‍ॅप बनवण्याचं काम करतो.

यांच्या आयुष्यात येणाऱ्या मुलींच्याही स्वतःच्या कथा आहेत. दिपाली ही सोशल मिडियावर लोकप्रिय असली तरी खाजगी आयुष्यात आपण जाडं असल्याचा तिला प्रचंड न्यूनगंड आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी ती सोशल मिडियाचा आधार घेते. त्याच दुनियेमध्ये ती रमून जाते. पण प्रत्यक्ष आयुष्यात आलेला मुलाचा नकार मात्र ती पचवू शकत नाही. रिषीला पॉर्न साइटवर भेटलेली वाइल्ड बटरफ्लाय (एलनाझ नोरोझी) ही पारंपरिक कुटुंबातून आलेली असते आणि घरच्यांना तिच्या या कामाबद्दल कळतं तेव्हा तिला थेट जीवे मारण्याची धमकी दिली जाते. पण चित्रपट, मालिकांमध्ये काम करायच्या निश्चियाने ती घरच्यांच्या विरोधात जाऊन काम करत राहते. प्रतिक चावलाला त्याच्याच प्रेमाच्या जाळ्यात अडकवून दोन मुली चांगलीच अद्दल घडवतात. तो आतापर्यंत मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वापरणाऱ्या ट्रिक्स त्या त्याच्यावरच वापरतात आणि तो पॉर्न गुन्हेगार ठरतो.

खरंतर सोशल मिडियाचा वापर टाळणं तरुणांसाठी आणि इतरही अनेकांसाठी अशक्य आहे. पण त्यात किती वाहवत जायचं हे प्रत्येकाला ठरवायचं आहे. कारण या आभासी दुनियेतून निर्माण होणारे प्रश्न खूप विचित्र आहेत आणि अनेकदा त्या गुन्हेगाराला पकडणं कठीण असतं. आर्थिक फसवणूक, खाजगी फोटोंचा गैरवापर, बॉडी शेमिंग, ट्रोलिंग, स्टॉकिंग, मानसिकदृष्ट्या त्रास देणं हे सुद्धा नकळत समोर येतं. पण यातल्या बॉडी शेमिंग आणि स्टॉकिंगच्या प्रश्नावर या मालिकेमध्ये भाष्य केलं आहे. मात्र या सोशल मिडियाचा मानसिक परिणाम लोकांवर कसा होतो हे दाखवलं नाहीये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही वर्षांपूर्वी “ब्लॅक मिरर” नावाची प्रसिद्ध मालिका नेटफ्लिक्सवर आली होती. त्यामध्ये मात्र सोशल मिडिया, बदलते तंत्रज्ञान यामुळे भविष्यातला मानवी समाज कसा असेल याची खूपच सुंदर कथा होत्या. यांचा सामाजिक, मानसिक परिणाम माणसावर कसा होऊ शकतो, मानवी नाती कशी बदलू शकतात, आज दिसणारा समाज हा त्याच पद्धतीचा समाज राहील का? मशीनच्या मागे लागून माणूस एकटा तर पडणार नाही ना? मशीन जरी वर्च्युअल असलं किंवा आभासी दुनिया तरी त्यातूनही हिंसेला कशी चालना मिळू शकते, आपल्या केवळ भावना नाही तर कदाचित मानवी मेंदूवरही नियंत्रण मिळवण्याचं काम या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होऊ शकतं. बरं हे कोण करें हेसुद्धा आपल्याला नक्की माहित नसणार. कारण मशीनची किंवा सोशल मिडिया कंपन्यांची मालकी नक्की कोणाच्या हातात आहे सांगणं कठीण आहे. त्यामुळे माणसावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी तर या तंत्रज्ञानाचा वापर होणार नाही ना? आजकाल विविध क्षेत्रात लागलेले अनेक छोटेछोटे शोध आणि तांत्रिकदृष्ट्या सोपं झालेलं आयुष्य प्रत्येकाला हवं आहे. पण त्या हव्यासापायी आपण किती खोलवर या आभासी दुनियेवर आणि मशीनवर अवलंबून राहायला लागतो किंवा आपलं आयुष्यचं त्यांच्या ताब्यात देतो. आपल्या वैयक्तिक आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आभासी दुनियेत कुठेतरी साठवली जाते आणि कोण कधी त्याचा कशासाठी वापर करेल हे सांगता येणं मुश्किल असतं. आतापर्यंत माणसाच्या गुलामगिरीचा इतिहास आपण खूप पाहिला. त्यासाठी शेकडो वर्षे लोकांनी लढा दिला. अर्थात तो दुसऱ्या समूहाच्या माणसांविरोधात होता. पण माणसाला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुलाम करू पाहणाऱ्या आभासी दुनियेशी लढा कसा देणार? त्यासाठी जबाबदार नक्की कोणाला धरणार? भविष्यात खरोखरचं असा वाद होऊ शकतो का? असे जबरदस्त प्रश्न आणि एक नवीन विचार घेऊन ती मालिका आली होती.

shruti.sg@gmail.com