फेसबुकचे संस्थापक आणि व्हॉट्स अॅपचे मानलेले मालक मार्कदादा झकरबर्ग यांना दसऱ्यानिमित्त खुलेपत्र….

स.न.वि.वि

विषय – व्हॉट्स अॅपवर आपट्याची पाने आणण्याबाबत…

प्रिय,
मार्कदादा झकरबर्ग…

शिरसाष्टांग नमस्कार,

सर्वात आधी तुम्हाला आणि प्रेसिला वहिनींना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा…

पत्रास कारण की आमची एक तक्रार आहे तुमच्याकडे. तुम्ही व्हॉट्स अॅप ही कंपनी स्वबळावर विकत घेऊन काळ उलटून गेला. तरी आम्हा मराठी माणसांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात तुम्ही सपशेल फेल ठरला आहात हे नमूद करताना खेद होतोय.

तुम्ही कंपनी ताब्यात घेतल्यानंतरचा हा चौथा दसरा तरी आपट्याची पानं तुम्ही व्हॉट्स अॅपवर आणलेली नाहीत. हे निंदा करण्यापलीकडचे आहे. याबद्दल आम्ही कधी आक्षेप नोंदवाला नाही. मराठी माणसाला सवय असते त्याप्रमाणे कोणीतरी करेल आणि मग आपण पण तो बदल झाल्यावर त्याचा फायदा उलचू या अपेक्षेने आम्ही सगळेच शांत आहोत. पण ज्यादिवशी आम्ही पेटून उठू दसऱ्याच्या रावणासारखे तेव्हा चार दिवस हल्लाबोल होईल. मग तू आश्वासने दे की आम्ही व्हॉट्स अॅपवर आपट्याची पाने आणू वगैरे प्रकारची किंवा आमच्या शिष्टमंडळाला ‘विशिष्ट’ वागणूक दे, मग आम्ही शांत होऊ. अशा पद्धतीने तू आमच्या तोंडाला तोंडाला पाने (आपट्याची नाही हा) पुसल्यानंतर विषय थंड होईल. हे सगळ्याच आंदोलनांबद्दल असं वागणं आमच्यासाठी रुटीन आहे पण आम्ही आऊट ‘ऑफ द बॉक्स’ वागल्यास खरचं तुला त्रास होईल. कारण आम्ही व्हॉट्स अॅप अनइन्सटॉल करण्याची मोहिम सुरु करु. आणि खरचं व्हॉट्स अॅपच अनइन्सटॉल करु. हो… हे होऊ शकत कारण तुमचं नाव वेगळं आहे. मागच्यावेळी स्नॅपचॅटच्या सीईओने आमच्याबद्दल आक्षेपार्ह कमेन्ट केलेली तेव्हा आम्ही चुकून स्नॅपडील इनइन्सटॉल केलं. पण ती चूक पुन्हा होणार नाही याची यंदा आम्ही काळजी घेऊ.

नाही म्हणजे कितीत सहन करायचं आम्ही आपट्याची सोडून लोकं सगळी पान पाठवतायत आज सकाळपासून व्हॉट्स अॅपवर. जेवढी एखाद्या झाडाखली पानं गळून पडत नसतील तेवढी आणि तेवढ्याच व्हरायटीची पानं आज व्हॉट्स अॅपवर पडलीयत माझ्या. तो कचरा मोदी साफ करणार का स्वच्छताही सेवा मोहिमेअंतर्गत? की तुम्ही टायअप करणार मोदी सरकारबरोबर या स्वच्छता मोहिमेसाठी? म्हणजे मला आलेली काही पानं दाखवायची झाल्यास ही बघ ती ही आहेत

< आता यात तुच आपट्याचं पान शोधून दाखवं मार्कदादा. (काहींना पान सापडली नाहीत म्हणून झाडं पण पाठवलीयत तरी नशीब अजूनक कोणी निवडुंग पाठवलं नाहीय)

बरं आता तुला आपट्याचं पान कसं असतं अशी आरडाओरड करून नकोस गुगल करुन बघं. नकोनको तसं नको करु तिथं पण लोचा आहे थोडा. हल्ली गुगलवर आपट्याची पानं सर्च केलं तरी आपट्यांची राधिका दिसते आधी मग आपट्याची पान दिसतात. नाही तिही मराठी आहे मान्य आहे तरी दसऱ्याला आपट्यांच्या पानांऐवजी तिचे फोटो प्रिंट करुन आपट्यांची राधिका वाटणे आम्हाला शोभून दिसणार नाही. म्हणूनच तुझे ते मित्र आणि आमचेच देशबंधू सुंदरदादा पिच्चाईंना पण सांग सुंदर शब्दात समजवून की जरा त्या गुगल सर्चच्या सेटींग बदला आणि खरंखुर आपट्याचं पान दाखवा. आपट्याच्या पानांच्या जागी आपट्यांची राधिका दिसते म्हणजे काय झालं? बरं सुंदरदादा त्या सेटींग बदलेपर्यंत सोबत फोटो जोडलाय तिथून उचल हवं तर आपट्याचं पान. घाबरू नको कॉपीराइटचा इश्यू नाही येणार. हा भारत आहे अमेरिका नाही. त्यामुळे आम्ही काय राइट काय राँग याचा विचार करत बसत नाही ढापताना. ढापायचं बिनधास्त त्याला काय होतयं. कोणी काय बोललं तर बघून घेऊन नंतर. काय कळलं का?. पन काहीही झालं तरी आपट्याचं पान व्हॉट्स अॅपवर आलचं पाहिजे. अरे चार वर्षे झाली तू व्हॉट्स अॅप विकत घेऊन तरी काहीच बदल नाही. म्हणजे सहन करण्यालाही हद्द असते एक. लिमीटलेस सहन करणं शक्य होणार नाही कारण सगळे मुंबईकर नाहीत ज्यांच्याकडे लिमीटलेस स्पीरीट आहे. परिस्थिती आत्ताच हाताबाहेर गेली आहे वेळीच त्याला लगाम घातलं. बाकी तुम्ही सुज्ञ आहात हे सांगायला आमची गरज नाही.

वरील उपरोक्त विषयाची त्वरीत दखल घेऊन पुढच्या दसऱ्यापर्यंत तरी आम्हाला व्हॉट्स अॅपवरून खरं सोनं (नाही सोनं द गोल्ड नाही आपट्याचीच पानं) फॉर्वड करता येईल अशी अपेक्षा व्यक्त करुन इथे थांबतो.

ति. प्रेसिला वहिनींना शि.सा. नमस्कार, चि. मॅक्सिमा आणि चि. ऑगस्टला गोडगोड पापा आणि शुभाशिर्वाद…

आणि दिलेल्या तसदीबद्दल क्षमस्व तरी तेवढा आपट्याच्या पानांचा विषय मार्गी लावणे पुढच्या विजयादशमीपर्यंत…

कळावे आपला

कृपाभिलाषी
– दसऱ्याला खोटी खोटी पानं फॉवर्ड आणि रिसिव्ह करुन थकलेला एक मराठी माणूस

– स्वप्निल घंगाळे
swapnil.ghangale@loksatta.com