News Flash

…तर मुख्यमंत्र्यांचा सुरा भाजप नेत्यांच्याच रक्ताने माखेल-शिवसेना

मुख्यमंत्री बेफाम झाले आहेत.

BMC election 2017 : भाजपच्या मंत्र्यांनो, आपापले कोथळे सांभाळाच. कारण मुख्यमंत्री थेट भ्रष्टाचाऱ्यांचे कोथळे बाहेर काढणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असताना शिवसेनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेची धार आणखीनच तीव्र केली आहे. फडणवीस यांनी मुंबईतील शेवटच्या प्रचारसभेत पालिकेतील भ्रष्टाचाऱ्यांचे कोथळे बाहेर काढू, अशी गर्जना केली होती. मात्र, असे झाले तर मुख्यमंत्र्यांचा सुरा सहकाऱ्यांच्याच रक्ताने माखेल, असा खणखणीत टोला ‘सामना’तील अग्रलेखातून लगाविण्यात आला आहे.

भाजपच्या मंत्र्यांनो, आपापले कोथळे सांभाळाच. कारण मुख्यमंत्री थेट भ्रष्टाचाऱ्यांचे कोथळे बाहेर काढणार आहेत. मुख्यमंत्री बेफाम झाले आहेत. उद्याच्या पराभवानंतर ते पुरते वेडेपिसे होतील. कारण ढोंग व खोटेपणाचा कोथळा मुंबईसह महाराष्ट्राची जनता काढणार याविषयी आमच्या मनात शंका नाही. तुम्ही कितीही आपटा; विजय शिवसेनेचाच होणार आहे. शिवसेनेच्या विजयासाठी मुंबई सज्ज आहे, असा ठाम विश्वासही या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यातील दहा महानगरपालिका, दहा जिल्हा परिषदा व ११८ पंचायत समित्यांसाठीच्या प्रचार काल संपला. प्रचाराच्या संपूर्ण काळात शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांकडून एकमेकांवर तुफान टीका होताना दिसली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील परस्परांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मतदार उद्या कोणाच्या पारड्यात कौल टाकणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी काल ठाण्यातील सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस शिवसेना स्वार्थी लोकांचा पक्ष झाल्याची टीका केली होती. आनंद दिघेंची शिवसेना आता स्वार्थी लोकांची झाली आहे. ठाण्यात शिवसेनेच्या नेत्यांनी घरातच तिकीट वाटप केले. उद्धव ठाकरेंच्या सभा कोणत्या नातेवाईकांकडे होतील, यावरुनही भांडणे झाली. एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांच्यासह अनेकांनी स्वत:च्या घरातच तिकीटे दिली. त्यांच्यासाठी महापालिका म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. तर आमच्यासाठी सत्ता हे साधन नाही, तर साध्य आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्त्वावर तोफ डागलीहोती.

दरम्यान, शिवसेना-भाजपमधील या कलहाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढणार का, याबद्दलही उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होतच असतात, पण शिवसेना सरकारचा पाठिंबा काढणार नाही, असा ठाम विश्वास भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. यासाठी  शिवसेनेला ‘थंड’ करून सरकार वाचविण्यासाठी भाजपकडून तहाच्या वाटाघाटी सुरू झाल्याचीही चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 8:05 am

Web Title: bmc election 2017 shivsena criticise devendra fadnavis 2
Next Stories
1 उत्तर भारतीयांच्या मतांसाठी भाजपचे प्रयत्न
2 निवडणूक प्रचारासाठी ऑनलाइन फलकबाजी
3 प्रचारफेऱ्या, भेटीगाठींनी रविवार सार्थकी
Just Now!
X