राज्यात मुंबईसह तीन-चार मोठय़ा महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप-रिपब्लिकन पक्षाची युती झाल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी, बऱ्याच ठिकाणी जागावाटपाचा घोळ अजूनही सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाला सोडलेल्या काही जागांवर भाजपच्या उमेदारांनी अर्ज भरले आहेत. काही जागांवर भाजपने कमळ चिन्ह घेऊन रिपाइंच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. ठाणे महापालिकेत रिपाइं स्वबळावर निवडणूक लढत आहे तर, उल्हासनगरमध्ये भाजपशी फारकत घेत रिपाइंने शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-रिपाइं युतीची घोषणा करण्यात आली. मात्र, शेवटच्या दिवसापर्यंत जागावाटपाचा घोळ राहिला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पक्षाला अपेक्षित जागा मिळत नसतील, तसेच सन्मानपूर्वक युती होणार नसेल, तर स्वबळावर निवडणुका लढविण्याचा इशारा दिला. त्यानंतर भाजपकडून जागावाटपासाठी पुढाकार घेण्यात आला. त्यानुसार रिपाइंला २५ जागा व सत्ता मिळाल्यास उपमहापौर पद देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र आणखी सात-आठ जागा वाढवून द्याव्यात, असा आठवले यांचा आग्रह आहे. मात्र त्याबाबत अजून काही निर्णय झालेला नाही. मुंबईसह अन्य महापालिकांमध्येही भाजपबरोबर युती करण्याची रिपाइंने तयारी दर्शविली. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूरमध्ये भाजप-रिपाइं आघाडीची घोषणा करण्यात आली. परंतु मुंबईत रिपाइंला सोडलेल्या २५ पैकी ७ जागांवर भाजपच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्या जागांचा प्रश्न मिटविण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे.