हिंदीभाषकबहुल परिसरांत सर्वच पक्षांचे अमराठी उमेदवार
कधी काळी दक्षिण भारतीयांविरोधातील आंदोलन पाहिलेल्या मुंबईतील उत्तर भारतीयांची वाढती संख्या या वेळच्या निवडणुकांमध्ये अधोरेखित होत आहे. या वेळच्या निवडणुकीत किमान १५ ठिकाणी उत्तर भारतीय उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. हिंदीबहुल असलेल्या या मतदारसंघांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपनेही हिंदी उमेदवार दिले आहेत. युतीमध्ये असताना हे भाग भाजपकडे असल्याने सेनेचा या भागांमध्ये फारसा प्रभाव नाही. मात्र तरीही सेनेने यातील पाच मतदारसंघांत हिंदीभाषक उमेदवार दिले आहेत.
मतदान करणाऱ्यांमध्ये हिंदीभाषकांची नेमकी संख्या किती याबाबत प्रत्येक राजकीय पक्षात मतमतांतरे असली तरी या मतदारांचा वाढता टक्का राजकीय पक्षांनी हेरला आहे. त्यामुळेच काँग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी सुमारे ४०, तर भाजपनेही ३५ हिंदीभाषक उमेदवार दिले आहेत. शिवसेनेच्या यादीत मोजून पाच हिंदीभाषक असले तरीही सेनेला या उमेदवारांकडे दुर्लक्ष करता आलेले नाही.
उत्तर मुंबईत दहिसर ते अंधेरी पट्टय़ात हिंदूीभाषकांची संख्या वाढली आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये कांदिवली आणि मालाड या पट्टय़ात सात हिंदीभाषक, तर संपूर्ण शहरात १४ हिंदीभाषक नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळेच दहिसर ते मालाड या पट्टय़ात भाजपने १२, तर काँग्रेसकडून तब्बल २३ हिंदीभाषक उमेदवारांना तिकीटवाटप करण्यात आले. शिवसेनेचे तीन हिंदूीभाषक उमेदवारही याच पट्टय़ात आहेत. त्यामुळे या ठिकाणी उत्तर भारतीय उमेदवारांमध्येच थेट लढती होतील. कांदिवली पश्चिम येथील एकता नगर, निळकंठ नगर या प्रभाग क्रमांक ३१ मध्ये सेनेचे कमलेश यादव, भाजपचे कल्पेश यादव, तर काँग्रेसच्या गीता यादव यांच्यात लढत होईल. याआधी या प्रभागातून गीता यादव विजयी झाल्या होत्या. मालाड येथील प्रभाग क्रमांक ४३ मधून काँग्रेसमधून सेनेत आलेले विद्यमान नगरसेवक भोमसिंग राठोड, काँग्रेसचे संदीप सिंग, तर भाजपकडून विनोद मिश्रा रिंगणात आहेत. दहिसर ते मालाड या पट्टय़ात आणखी सहा प्रभागांमध्ये हिंदी उमेदवारांमध्ये लढत होत आहे.
* सर्वाधिक हिंदीभाषक उमेदवार दहिसर ते अंधेरी पट्टय़ात
* सध्याच्या नगरसेवकांमध्ये १४ नगरसेवक हिंदूीभाषक
* काँग्रेस-राष्ट्रवादीकडून प्रत्येकी ४०, भाजपकडून ३५, तर सेनेकडून ५ हिंदीभाषक उमेदवार
