‘हा माझा शब्द आहे..’तून मतदारांना साद; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला

कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेकडून महापालिकेतील सत्ता हिसकावून घेऊन भाजपचा झेंडा रोवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतला पणाला लावले आहे. ‘हा माझा शब्द आहे.’ अशी ग्वाही मुंबईकरांना देत शहरात परिवर्तन घडविण्याचे अभिवचन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. शिवसेनेच्या ‘डिड यू नो’ , ‘करून दाखविलं, पुन्हा’ या राबविलेल्या प्रचार मोहिमांना तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. मुंबईवर गेली वर्षांनुवर्षे सत्ता गाजविणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पारडय़ात भरभरून मते पडणार की, नागपूरकर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अभिवचनावर मुंबईकर विश्वास ठेवणार, यावर अनेक राजकीय गणिते अवलंबून आहेत.

मराठीचा गजर करणाऱ्या शिवसेनेने ‘डिड यू नो’ या मोहिमेद्वारे सुरुवातीच्या काळात इंग्रजीतून प्रचार करण्यास सुरुवात केली. शिवसेनेच्या महापालिकेतील प्रदीर्घ सत्ताकाळात मुंबईत कोणती कामे केली, प्रकल्प राबविले, याची माहिती अमराठी मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी तिचा काही प्रमाणात उपयोग झाला. इंग्रजीतून प्रचार केल्याबद्दल टीकाही झाली. मात्र शिवसेनेची ‘मराठी’ची व्याख्या आता अधिक व्यापक झाल्याने त्यांनी अमराठी मतदारांसाठी ही मोहीम राबविली. गेल्या निवडणुकीच्या वेळी ‘करून दाखविलं’ ही प्रचार मोहीम राबविल्यावर या वेळी ‘करून दाखविलं.. पुन्हा’ असे फलक शहरभर झळकले आहेत. उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र त्यावर ठळकपणे आहे.

या प्रचाराला तोंड देण्यासाठी आणि मुंबईकरांना भरभरून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जाईल, याची खात्री पटविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मुंबईत ‘परिवर्तन तर होणारच, वाहतूक वेगवान होईल, शहर सुंदर करणार, ’ .. अशा विविध आश्वासनांची खैरात फडणवीस यांनी केली आहे. भाजपच्या जाहीरनाम्यातही अनेक वचने देण्यात आली आहेत. राज्यात ज्या पद्धतीने गतिमानतेने निर्णय घेण्यात आले आणि मेट्रो, शिवस्मारक, शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू आदी प्रदीर्घ काळ रेंगाळलेले प्रकल्प मार्गी लावले गेले, त्याच पद्धतीने महापालिकेचा कारभार पारदर्शीपणे व गतिमानतेने केला जाईल, असे आश्वासन भाजपने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत लोकसभा निवडणूकजिंकल्यावर काही महिन्यांमध्येच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचा व त्यांच्या प्रतिमेचा वापर करून भाजपने यश संपादित केले. त्याच धर्तीवर केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीवर आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिमेचा वापर करून ही महापालिका निवडणूकजिंकण्याची रणनीती भाजपने आखली आहे. मुंबईकर आता कोणावर व किती भरवसा ठेवतात आणि महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकतो, यावर राज्यातील सत्ताकारणही अवलंबून आहे.