सत्ता आणि सगेसोयरे हे तसे समानार्थी शब्द. सगेसोयऱ्यांच्या मदतीने सत्ता राखता येते आणि सत्तेच्या मदतीने सोयरीकही जुळवता येते. त्यामुळे राजकारणामध्ये अनेकदा नेते आपल्या नातेवाईकांसोबत रिंगणात उतरतात. यंदाच्या मुंबई महापालिकांच्या निवडणुकांमध्येही तेच झालं. पण यंदा हे नेते आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी ही निवडणूक ‘काही खुशी काही गम’ अशी ठरली.
अश्रफ आणि त्यांची पत्नी दिलशाद आझमी हे गेल्या दोन निवडणुकांमध्ये विजयी ठरणारं जोडपं राहिलं आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. यंदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या या जोडप्याने विजय आपल्याकडे खेचून आणला.
शिवसेनेने उमेदवारी न दिल्यामुळे दिनेश (बबलू) पांचाळ व त्यांच्या पत्नी अनिता यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करुन भाजपमध्ये प्रवेश केला. पण तरीही या निवडणुकीत दिनेश पांचाळांना पराभव पत्करावा लागला. त्यांची पत्नी मात्र या निवडणुकीत जिंकली. पांचाळ पराजित झाले मात्र पत्नीने विजय खेचून आणला.
[jwplayer LqjlhRTV]
कुलाब्याचे अपक्ष नगरसेवक अॅड. मकरंद नार्वेकर यांनी यंदा भाजपमध्ये प्रवेश केला. ते आणि त्यांची भावजय हर्षदा नार्वेकर या दोघांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढत विजय मिळवला. अॅड. नार्वेकर वाॅर्ड क्रमांक २२७ मधून निवडून आले तर हर्षदा नार्वेकरांनी वा२र्ड क्रमांक २२६ मधून विजय नोंदवला.
डाॅन अरूण गवळी याची मुलगी आणि अखिल भारतीय सेनेच्या नेत्या गीता गवळींनी मुंबई महापालिकेत स्थान मिळवलं पण त्यांच्या काकू आणि विद्यमान नगरसेविका वंदना गवळींना पराभव पत्करावा लागला.
अनेक बड्या नेत्यांच्या मुलांनी यंदा चांगले ‘रिझल्ट’ आणले. यामध्ये भाजप खासदार किरीट सोमैयांचा मुलगा नील, आमदार राज पुरोहित यांचा मुलगा आकाश तर सेना आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान यांचा समावेश आहे.
मुंबई महानहरपालिकेच्या मतमोजणीला सुरूवात झाली त्यावेळी एक निकालाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते मुंबई भाडपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांच्या पराभवाने. त्यावेळी मतांचा कौल शिवसेनेच्या बाजूने होता. याशिवाय भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर हेसुध्दा पराभूत झाले.
भाजप आमदार पराग अळवणी यांच्या पत्नी ज्योती अळवणी यंदा पुन्हा निवडून आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यंदा पहिल्यांदाच निवडीन तर त्यांची बहीण डाॅ. सईदा खान यांनी सलग दुसऱ्यांदा महापालिका निवडणुकांमध्ये विजय मिळवला.
कोणीही कोणाचाही नातेवाईक असो शेवटी जनतेची कधी कोणावर खप्पामर्जी होईल हे सांगता येत नाही. आपल्या वाट्याला येणाऱ्या सत्तेला गृहित धरत यापुढे गणितं मांडणार्या या सगळ्या सत्ताधीशांनी एवढं मनात ठेवलं तरी पुरे!
[jwplayer ktuAgG4n]