शंखध्वनी, फटाक्यांच्या माळा आणि ढोल-ताशांचा गजर..!
‘पसे पसरले, इंजिन घसरले’, ‘मराठी माणूस भडकला भगवा झेंडा फडकला’ अशा घोषणा, विजयी उमेदवारांचे शंखध्वनीने स्वागत, फटाक्यांच्या माळा आणि ढोल-ताशाचा गजर असे चित्र गुरुवारी शिवसेना भवनावर होते..
दादर-माहीम मध्ये ‘मनसे’च्या बालेकिल्याला भगदाड पाडल्यानंतर शिवसनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला. शिवसेना भवनासमोर शिवसनिकांची गर्दी वाढू लागली. विजयोत्सवाच्या भगव्या गुलालाने शिवसैनिक माखून गेले.
विजयोत्सव साजरा करण्यासाठी विजेच्या दिव्यांच्या माळा, हॅलोजन दिवे दुपारीच सेनाभवनात आणले गेले. फटाक्यांचा पुरेसा साठाही शिवसनिकांनी शिवसेना भवनात दुपारीच करुन ठेवला होता. विजयाचे भाकित करून शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी जमलेल्या शिवसनिकांना लाडू वाटले. शिवसेनेचेजिंकलेले उमेदवार जल्लोषात सेनाभवनाकडे येऊ लागले. शिवसेना पक्षाच्या गाण्यासह ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याच्या सुरावटीवर विजयी मिरवणूका शिवसेना भवनावर येत होत्या. विशाखा राऊत, समाधान सरवणकर, अमेय घोले, प्रीती पाटणकर यांच्यासह अनेक विजयी उमेदवारांनी शिवसेनाभवनावर आपली हजेरी लावली. कुर्ला येथून आलेले बाळकृष्ण नाईक हे शिवसनिक शंखध्वनी करून विजयी उमेदवारांचे स्वागत करत होते.
संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत सेना भवनात आले. तेव्हा जमलेल्या शिवसनिकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले..