निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्यांपैकी अनेकांच्या पदरी पराभव
आपल्या पक्षातील अंतर्गत कलह आणि गटबाजीमुळे तिकीट मिळणार नाही, अशी चिन्हे दिसताच ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्यांना यंदा मतदारांनी अव्हेरल्याचे दिसून आले. माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, वकारुन्निसा अन्सारी, संजय (नाना) आंबोले, भालचंद्र अंबुरे, चेतन कदम यांनी पक्षाला रामराम ठोकत अन्य पक्षात जाऊन उमेदवारी पदरात पाडून घेतली. परंतु नव्या पक्षातील कार्यकर्त्यांनी साथ न दिल्यामुळे या मंडळींना पराभव पत्करावा लागला आणि पालिका सभागृहात जाण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. पक्षबदलाचा प्रभाकर शिंदे यांना मात्र फायदा झाला आहे.
पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच काँग्रेसमध्ये गटबाजीने डोके वर काढले होते. पारंपरिक प्रभागाऐवजी भलत्याच प्रभागातून उमेदवारी देणे, उमेदवारी कापणे असे प्रकार संकेत अनेक नगरसेवकांना मिळू लागले होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत होता. माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी याच नाराजीतून काँग्रेसला ‘रामराम’ ठोकला आणि ते शिवसेनेत दाखल झाले. शिवसेनेने त्यांना प्रभाग क्रमांक ६८ मधून उमेदवारी दिली होती. शिवसेनेसाठी सुरक्षित वाटणाऱ्या या प्रभागात भाजप उमेदवार रोहन राठोड यांनी धडक दिली. देवेंद्र आंबेरकर यांना धूळ चारून रोहन राठोड विजयी झाले.
आपल्याला आणि पत्नीला उमेदवारी देण्याचा हट्ट शिवसेनेचे नगरसेवक संजय (नाना) आंबोले
यांनी धरला होता. मात्र शिवसेनेकडून दोघांना उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर बनल्यामुळे संजय आंबोले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने आंबोले यांच्या पत्नी तेजस्विनी आंबोले यांना प्रभाग क्रमांक २०३ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. या प्रकारामुळे संतापलेले परळ विभागातील शिवसैनिक आंबोले दाम्पत्याविरोधात एकवटले. त्यामुळे सेनेच्या सिंधु मसुरकर यांचा विजय झाला. शिवसैनिकांनी दगाबाजाला धडा शिकविला अशी जोरदार चर्चा परळ विभागातील नाक्यानाक्यावर गुरुवारी सुरू होती.
भेंडीबाजार परिसरातील प्रभाग क्रमांक २२३ मधून माजी विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांची कन्या निकिता निकम यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात येणार असल्याची कुणकुण लागल्यामुळे काँग्रेस नगरसेविका वकारुन्निसा अन्सारी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एएमआयएममध्ये प्रवेश केला आणि त्या या प्रभागातून रिंगणात उतरल्या. पूर्वी एकगठ्ठा मुस्लीम मते मिळवून विजयी होणाऱ्या वकारुन्निसा अन्सारी यांना पराभवाचा सामना करावा लागला. मुस्लीम मतदारांनी काँग्रेसला साथ दिल्याने निकिता निकम यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
मनसेला उतरण लागल्याचे दिसताच नगरसेवक भालचंद्र अंबुरे पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना प्रभाग क्रमांक ७३ मधून तिकीट दिले. मात्र शिवसेनेचे प्रवीण शिंदे यांचा विजय झाला आणि भालचंद्र अंबुरे यांचे पालिकेत जाण्याचे स्वप्न भंगले.
मनसेची पालिकेत धडाडणारी तोफ म्हणून नगरसेवक चेतन कदम यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने चेतन कदम यांच्या पत्नी भारती कदम यांना बोरिवलीतील प्रभाग क्रमांक १४ मध्ये उमेदवारी दिली. मात्र भाजपच्या नगरसेविका आसावरी पाटील यांनी त्यांचा पराभव केला.
प्रभाकर शिंदेंना मात्र साथ
शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने एकेकाळी पालिकेत सभागृह नेतेपद भूषविलेले प्रभाकर शिंदे यांनी शिवसेनेला ‘अखेरचा जयमहाराष्ट्र’ करीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना मुलुंडमधील प्रभाग क्रमांक १०६ मधून उमेदवारी दिली. शिवसेनेचे उमेदवार अभिजीत कदम यांना धूळ चारून प्रभाकर शिंदे विजयी झाले.
गुंडांना साथ नाही
महापालिकेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या सुमारे दोन हजार उमेदवारांपैकी २१५ उमेदवारांना गुन्हेगारी पाश्र्वभूमी होती. त्यातही १५४ उमेदवारांविरोधात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्य़ांची नोंद आहे. परंतु, त्यापैकी अनेकांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवल्याचे स्पष्ट झाले. मनसेत असताना आमदारकी उपभोगल्यानंतर भाजपकडून नगरसेवकपदाची निवडणूक लढवणारे मंगेश सांगळे यांच्या पदरी पराभव आला. सांगळे यांच्याविरोधात एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी सरकारी कामात अडथळा हा त्यांच्यावरील गंभीर गुन्हा आहे. शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्याने भाजपमध्ये गेलेल्या दिनेश पांचाळ यांनी प्रभाग १४१ मधून निवडणूक लढवली मात्र ते पराभूत झाले. त्यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न यासह एकूण तीन गुन्ह्य़ांची नोंद आहे.