योगी आदित्यनाथ यांच्या उद्या मुंबईत सभा
मनसेला गेल्या निवडणुकीत मिळालेली मराठी मते शिवसेनेकडे वळण्याची चिन्हे असल्याने आणि शिवसेना-मनसे यांनी ‘मराठी कार्ड’ न खेळल्याने भाजपची पंचाईत झाली असून उत्तर भारतीयांची मते कशी मिळविता येतील, याची चिंता वाटत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील नेते गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांना प्रचारासाठी मुंबईत पाचारण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आदित्यनाथ यांची आक्रमक हिंदुत्ववादी नेते अशी ओळख आहे.
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्माण झालेल्या लाटेमुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला मुंबईत चांगले यश मिळाले व शिवसेनेपेक्षा एक अधिक म्हणजे १५ आमदार निवडून आले. मात्र गेल्या अडीच वर्षांत मोदी यांची लाट ओसरलेली असून नोटाबंदी व अन्य मुद्दय़ांवरून भाजपबाबत जनतेमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसाठी अनेक निर्णय जाहीर केले असले तरी भाजप नेहमीच भूलथापा देते व प्रत्यक्षात काहीच करीत नाही, असे टीकास्त्र विरोधकांनी सोडले आणि अजून तरी जनतेच्या दृष्टीस पडेल, अशी भरीव कामगिरी सरकारने केलेली नाही. शिवसेनेने अनेक वर्षे सत्ता उपभोगताना केलेल्या कारभारावरूनही काही प्रमाणात नाराजी आहे व मुंबईत अनेक प्रश्नही कायम आहेत. मात्र तरीही भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत युती तोडल्याने आणि भावनिक राजकारण करून वातावरणनिर्मिती करण्याचे शिवसेनेचे जोरदार प्रयत्न आहेत. मुंबईत शिवसेनेची पाळेमुळे घट्ट असून काम करीत असल्याने महापालिकेतील सत्ता हिसकावून घेणे भाजपला एवढे सोपे नाही.
मनसेची फारशी ताकद उरली नसल्याने मराठी मते शिवसेनेकडे वळण्याची शक्यता आहे. भाजपची मदार उत्तर भारतीय व गुजराती मतदारांवर अधिक आहे. शिवसेना-मनसेने ‘मराठी’ कार्ड खेळले असते, तर हा वर्ग नाराज होऊन त्याचा लाभ भाजपला उठविता आला असता. त्यासाठी ‘शिवसेनेमुळे मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला,’ अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री फडणवीस व आशीष शेलार यांनी करूनही शिवसेनेने त्यावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. या राजकीय खेळीत न अडकण्याचा धूर्तपणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखविला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मराठीचा मुद्दा फारसा काढला नाही.
भाजपने गुजराती मतदारांसाठी पुरुषोत्तम रुपालांच्या सभा घेतल्या. उत्तर भारतीय मतदारांसाठी खासदार मनोज तिवारी यांच्या सभा घेतल्या. उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्ये सर्व नेते गुंतले आहेत. पण तरीही मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांसाठी योगी आदित्यनाथ यांच्या सभांचे आयोजन कालिना, शीव-कोळीवाडा परिसरात रविवारी सकाळी करण्यात आले आहे.