मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या २२७ नगरसेवकांमध्ये तब्बल १५५ नवे चेहरे असून यापैकी बहुसंख्य नगरसेवकांना पालिकेच्या कारभाराविषयी फारसा अनुभव नाही. त्यामुळे पालिका निवडणुकीत निवडून आलेल्या आजी-माजी ७२ नगरसेवकांवर पालिकेचा कारभार चालविण्याची भिस्त असणार आहे. त्यामुळे भविष्यात पालिका प्रशासन आणि नगरसेवक यांच्यात कोणाचे पारडे जड राहणार हे भविष्यातच समजू शकेल.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत २२७ पैकी १५५ नवीन चेहरे निवडून आले असून त्यात तेजस्वी घोसाळकर, संजय घाडी, श्वेता कोरगावकर, संगीता शर्मा, दीपक ठाकूर, पराग शाह, अमेय घोले, श्रीकला पिल्ले, समाधान सरवणकर, अल्पा जाधव, मनीषा रहाटे, नील सोमय्या, निधी शिंदे, अंजली नाईक, नादीया शेख, वैशाली शेवाळे, सन्वी तांडेल, सुप्रिया मोरे, सुफियान वणू, सोनम जामसुतकर, हर्षिता नार्वेकर आदींचा समावेश आहे. ही मंडळी पालिकेच्या कारभाराविषयी नवखी आहेत. पालिकेचे कामकाज कसे चालते, कोणत्या नियमांचा आधार घेऊन नागरी प्रश्न मांडायचे, विविध कामे कशा पद्धतीने करून घ्यावयाची, छोटय़ा-मोठय़ा कामांचे प्रस्ताव कशा पद्धतीने मांडायचे आदींबाबत हे नगरसेवक अनभिज्ञ आहेत.
पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्यांपैकी ७२ आजी-माजी नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यामुळे पुन्हा पालिका सभागृहात जाण्याची त्यांना संधी मिळाली आहे. विद्यमान नगरसेवकांपैकी महापौर स्नेहल आंबेकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, भाजपचे गटनेते मनोज कोटक, सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे, सुधार समितीच्या माजी अध्यक्षा उज्ज्वला मोडक, ज्योती अळवणी, शीतल म्हात्रे विजयी झाले असून सलग दुसऱ्या वेळी पालिका सभागृहात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या तब्बल ६० माजी नगरसेवकांना त्यांच्या पक्षांनी उमेदवारी देऊन रिंगणात उतरविले होते. पालिका निवडणुकीच्या आखाडय़ात शिवसेनेचे २६, काँग्रेसचे २०, भाजपचे ५, मनसेचे ३, राष्ट्रवादीचे २, तर समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेवकाचा समावेश होता. त्यापैकी २० नगरसेवकांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे.