मनसेची कडवट टीका
राज्यात भाजपला महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये मिळालेला विजय हा गुंडशक्तीचा, काँग्रेस-राष्ट्रवादी व मनसेचे उमेदवार पळवून आणि शासकीय यंत्रणेचा वापर करून मिळाला आहे. ओमी पप्पू कलानीपासून कोणाशीही कशीही युती करू न भाजपने विजय मिळवला असला तरी तो संघविचारांचा पराभव असल्याची जळजळीत टीका मनसेने केली आहे. गुंडांना उमेदवारी देऊन विजय मिळवायचा आणि रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा मुजरा करायचा ही ‘पारदर्शकता’ मुख्यमंत्री फडणवीस यांनाच जमू शकते, असा टोला मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी लगावला.
नाशिक महापालिकेत सत्तेत असताना विकासाची कामे करूनही झालेला पराभव हा निश्चितपणे आम्हाला जिव्हारी लागला आहे. मुंबई, ठाणे, पुणे व नाशिकसह राज्यातील मनसेच्या पराभवाची चिंता व चिंतन आम्ही निश्चितपणे करू आणि पुन्हा राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे मनसे ताकदीने उभा राहिलेला दिसेल, असा विश्वास मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी काही निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यात महापालिका निवडणुकीत लागलेल्या निकालांवर चर्चा करण्यात आली. यानंतर बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, राम नाईक, राम कापसे, रामभाऊ म्हाळगी यांच्यापासून गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांनी संघविचारावर आधारित भाजपची बांधणी केली होती. या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या आजच्या भाजपने संघविचारांना तिलांजली देत गुंडशक्तीचा सहारा घेतला. जागोजागी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या गणंगांना घेतल्यामुळेच भाजपचा विजय झाला आहे. उल्हासनगरमध्ये ओमी पप्पू कलानीशी केलेली युती, ठाण्यात खंडणीखोर उमेदवारांना पक्षात घेणे, पिंपरी चिंचवड येथे अख्खी राष्ट्रवादीची बी टीम उभी करणे, पुण्याच्या विजयाशी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शून्य संबंध असून हा विजय एका बिल्डरचा विजय आहे. अशीच परिस्थिती राज्यातील अन्य महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. भाजपने या निवडणुकीत जे पेरले आहे तेच उद्या उगवणार असून जांभळाच्या झाडाला आंबे लागणार नाहीत, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे, असेही नांदगावकर म्हणाले. ज्या लोकांच्या जिवावर भाजपने विजय मिळवला आहे, उद्या तेच लोक आपली किंमत वसूल करतील तेव्हा भाजपची अवस्था ‘घी देखा था पर बडगा नही देखा’ अशी होणार असून संघविचाराचे महत्त्व त्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येईल, असाही टोला त्यांनी लगावला.