समाज माध्यमांवर खिल्ली उडवण्याचा सामायिक कार्यक्रम जोरदार
राजाने साथ मागितली आणि लोकांनी राजाला सात जागा जिंकून दिल्या, याला काय अर्थ आहे राव, पारदर्शक मतदार, पेंग्विन पडले तोंडावर. महाराष्ट्र स्वार कमळावर, अदृष्य बोटं गुलगुल्या करतायत अश्या काहीशा खोडकर आणि खोचक प्रतिक्रियांचा गुरूवारी सोशल मिडियावर पाऊस पडलेला दिसला. अर्थात निमित्त होतं मुंबई महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुक निकालाचं.
शिवसेना आणि भाजपमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीवरून सोशल मिडियावर चांगलेच शाब्दिक युध्द रंगलेले पाहायला मिळाले. मुंबईमध्ये सुरूवातीला शिवसेनेच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती, त्यावरून येऊन येऊन येणार कोण? या सेनेच्या जुन्या घोषणेला पुन्हा उभारी मिळाली होती. मात्र, जसजसे निकाल लागत गेले तसा सेनेचा वाघ शांत होताना दिसला आणि कमळ चिखलातून डोकं वर काढायला लागलं. सुरूवातीच्या सत्रात निकालाचा ट्रेंड लक्षात घेऊन शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईत शाहिस्तेखानाची बोटं छाटली, अशी प्रतिक्रिया दिली होती. परंतु मतांच्या आघाडीचे निकाल स्पष्ट होऊ लागल्यावर सेनेला आधी महापौरांची खुर्ची वाचवा नंतर उपमा द्या असा सल्ला अनेकजण देत होते.
मुंबई महापालिकेचा निकालाचं प्रतििबब आज ट्विटर ट्रेंडमध्येही जोरदार पाहायला मिळालं. बीएमसीरिझल्ट, यासोबतच शिवसेना हा हॅशटॅग काही काळ पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होताना दिसला. महत्त्वाचं म्हणजे भाजपचे अब्जाधीश उमेदवार पराग शाह हे विजयी झाल्यानंतर त्यांनी तर इंडियाच्या ट्रेंडमध्ये येण्याचा मान पटकावला.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष संजय निरूपम यांनी राजीनामा दिल्यानंतर तेसुध्दा काही काळ ट्रेंडमध्ये होते. त्याशिवाय नमोमहारोर, बीजेपीनंवनइनमहा, महाराष्ट्रासिविकपोल, आघाडीवर, विजयी, मुंबईडिसाईड्स, निकाल हे हॅशटॅगदेखिल दिवसभर ट्रेंडिगमध्ये होते. मुंबईचा अंतिम निकाल हाती आल्यानंतर तर शिवसेनेला चांगलेच धारेवर धरण्यात आल्याचं पाहायला मिळालं. वाघाचे माकडचाळे, भाजपने करून दाखवलं, कोथळा काढलाच या प्रतिक्रियांना ऊत आला होता. सेनेला चिडवण्याची एकही संधी भाजप कार्यकत्रे सोडत नव्हते.
भाजपच्या पहिल्याच जाहीर प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाषणाच्या दरम्यान आवाज बसला होता आणि त्यावरून विरोधकांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली होती. परंतु गुरूवारच्या निवडणूक निकालानंतर डरकाळी फोडता फोडता वाघाचाच घसा बसला असा सणसणीत टोला सेनेला मारण्यात आला होता. पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेला टिव्हीवर दाखवण्यात आलेल्या रिकाम्या खुच्र्यावरूनही भाजपला डिचवलं गेलं होतं. त्यावरूनही खुच्र्या रिकाम्या असल्या तरी पुणेकरांची डोकी रिकामी नाहीत,१ ते ४ झोपत असलो तरी मतदानाच्या दिवशी आम्ही झोपत नाही, असा पलटवार करण्यात आला होता.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही समाचार
सेनेच्या आणि भाजपच्या लढाईमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी थोडे बाजूला पडलेले दिसत असले तरी गेल्या निवडणुकीपेक्षा त्यांची झालेली पिछेहाट पाहता त्यांचीही चांगलीच खिल्ली उडवली जात होती. उठा उठा पहाट झाली, घड्याळ पाहून गाजर खाण्याची वेळ झाली, काँग्रेसला त्यांच्या पक्षातील लोकांनीच हरवले, मी पण निवडून आलो. घरातले तांदूळ अशा शब्दात या दोन्ही पक्षांचा समाचार घेतला जात होता. निवडणूक निकाल टाकताना अनेकांनी पक्षांचं नव्याने नाकरण केल्याचंही पाहायला मिळालं. त्यामध्ये सेनेला वडापाव, भाजपला ढोकला, काँग्रेसला पास्ता, राष्ट्रावादीला ऊस, मनसेला खाली पाव, इतरांना भेळ असं बारसं केलं होतं.