काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात

पदपथ किंवा मोक्याच्या जागा अडवून बसणाऱ्या सर्व फेरीवाल्यांना कायदेशीर परवाने आणि त्याचबरोबर मुंबईकरांना मोकळे पदपथही.. वास्तविक हा मोठा विरोधाभास, पण फेरीवाले आणि नागरिक या दोघांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याची ग्वाही मुंबई काँग्रेसने दिली आहे. आता हे कसे शक्य आहे, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. इच्छाशक्ती असल्यास हे शक्य आहे, असा त्यावर काँग्रेसचा युक्तिवाद.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वतीने ‘आपला संकल्प’ या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. २० रुपयांमध्ये पोटभर थाळी हे तामिळनाडूतील अम्मा कँटीनच्या धर्तीवर महापालिकेच्या वतीने उपक्रम राबविण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. पायाभूत सुविधा, पाणी, रस्ते, स्वच्छता ही पालिकेची कामे, पण लोकांचे पोटही पालिकेच्या वतीने भरण्याची संकल्पना काँग्रेसने काढली आहे. मोकळ्या पदपथावर चालता यावे ही मुंबईकरांची अपेक्षा, पण ती कधी पूर्ण होणार हा नागरिकांना प्रश्न पडतो. कारण सर्वच राजकीय पक्षांना फेरीवाल्यांचा पुळका असतो. काँग्रेसने तर यूपीए सरकारच्या काळात मंजूर झालेल्या फेरीवाला धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले आहे. मुंबईतील सर्व फेरीवाल्यांना परवाने देऊन त्यांना कायदेशीर दर्जा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याबरोबरच नागरिकांना मोकळ्या पदपथाचेही आश्वासन आहेच. आता फेरीवाल्यांकरिता वेगळी जागा कुठून देणार, पदपथ मोकळे करणार हे सारे गुलदस्त्यात असले तरी हे सारे शक्य आहे, अशी पुष्टी देण्यात आली आहे. प्रत्येक घरामध्ये गरजेनुसार पिण्यासाठी मोफत पाणी, १५०० रुपयांमध्ये नळजोडणी, सर्वाना पाण्याच्या मीटर्सचे आश्वासन देण्यात आले आहे.  काँग्रेसने सत्तेत आल्यास महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्याचे आश्वासन दिले आहे.