आयोगाची तयारी सुरू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईसह दहा महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीनंतर लगेचच काही महिन्यांत नवनिर्मित पनवेल महापालिका तसेच भिवंडी-निजामपूर, मालेगाव, परभणी, लातूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुकांचेही रणशिंग फुंकले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने या सहा महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. साधारणत: एप्रिलमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे. २७ फेब्रुवारीला या सहा महापालिकांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर ४ मार्चपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. ५ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध झालेली विधानसभेची मतदार यादी या महापालिकांच्या निवडणुकांसाठी ग्राह्य़ धरली जाणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करून त्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवून त्यानंतर त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. भिवंडी-निजामपूर, मालेगाव, परभणी, लातूर व चंद्रपूर या पाच महापालिकांचा कार्यकाल मे ते जून यादरम्यान संपुष्टात येत आहे. त्यानुसार या पाच महापालिकांबरोबरच पनवेल महापालिकेचीही निवडणूक घेण्याचे ठरविण्यात आले असून आयोगाने तशी तयारी सुरू केली आहे.

मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal corporation elections 017
First published on: 20-02-2017 at 00:41 IST