उत्तर प्रदेशातील निवडणुकीवरही मुंबईच्या निकालांचा परिणाम होणाची धास्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत सभा घ्याच, तरीही शिवसेनेचाच भगवा महापालिकेवर फडकेल, असे जाहीर आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देऊनही मोदी व अध्यक्ष अमित शहा यांना प्रचारात उतरविण्याची ‘जोखीम’ भाजपची नाही. मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालाचा परिणाम उत्तर प्रदेशातील मतदानाच्या काही फेऱ्यांवर पडण्याची शक्यता असल्याने प्रचाराची सर्व धुरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मोदी-शहा हे सरसेनापती मुंबईतील रणात उतरणार नसले तरी त्यांनी रणनीतीमध्ये जातीने लक्ष घालून केंद्रीय मंत्र्यांचा फौजफाटा आणि ‘कुमक’ मुंबईसाठी रवाना करण्याची जय्यत तयारी केली आहे.
भाजपवर हल्ला चढविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘लक्ष्य’ केले असून मुंबईत सभा घेण्याचे आव्हान दिले आहे. अमित शहा यांनी शिवसेनेबरोबर मैत्रीपूर्ण सामना असल्याचे सांगितल्याने ठाकरे यांनी त्यांच्यावर वैयक्तिक हल्ला चढविला नसला तरी मोदींना सभा घेण्याचे आव्हान देऊन ‘गुगली’ टाकली आहे. मोदी-शहा प्रचारात उतरल्यास महापालिका निवडणुकीसाठी सर्वोच्च नेते आल्याने यश मिळविल्याची टीका होणार आणि शिवसेनेला अधिक यश मिळाल्यास हे नेते येऊनही भाजपला यश मिळाले नाही, या टीकेला सामोरे जावे लागणार, अशी भाजपची पंचाईत आहे. त्यामुळे शिवसेनेशी लढण्यास आपणच पुरेसे असून ‘मला आधी निपटा’ असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
उत्तर प्रदेशच्या मतदानाच्या फेऱ्या ८ मार्चपर्यंत होणार असून मुंबईसह राज्यातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल २३ फेब्रुवारीला लागणार आहेत. त्यामुळे मोदी-शहा प्रचाराला येऊनही मुंबईत भाजपला शिवसेनेपेक्षा कमी यश मिळाल्यास हा कौल मोदी व फडणवीस यांच्या सरकारविरोधात असल्याचा जोरदार प्रचार विरोधकांकडून देशभर केला जाईल आणि त्याचा फटका उत्तर प्रदेशमध्येही बसू शकतो, ही भाजपला भीती आहे. त्यामुळे सरसेनापतींना रणात उतरविण्याची जोखीम पत्करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांवरच सर्व मदार टाकण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विदर्भात, प्रकाश जावडेकर पुणे-पिंपरी चिंचवड, हंसराज अहिर विदर्भात प्रचारात उतरतील. गडकरी मुंबईतही येण्याची शक्यता असून उत्तर भारतीय, मुस्लीम मतदारांच्या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला, मनोज सिन्हा, मुक्तार अब्बास नक्वी, शाहनवाझ हुसेन आदी नेते प्रचारासाठी येतील. गृहमंत्री राजनाथ सिंह उत्तर प्रदेशात गुंतले असल्याने त्यांची मुंबईतील सभा अजून निश्चित करण्यात आलेली नाही. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यावर मुंबईतील निवडणुकीची सर्व धुरा सोपवण्यात आली असून राज्य-केंद्र समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे पक्षाकडून सर्वतोपरी केंद्रीय ‘कुमक’ पाठविण्याची जबाबदारी ते सांभाळत असून सर्व नेते लवकरच मुंबईत धडकू लागतील, असे सूत्रांनी सांगितले.
