आधी गुंड म्हणून आरोप, आता मुलाशी हातमिळवणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘शरद पवार यांनी पप्पू कलानी आणि भाई ठाकूरला पोसले’, ‘कलानी हा गुंडांचा बादशहा’, ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबविण्यासाठी मला सत्ता द्या’ ही विधाने आहेत १९९०च्या दशकात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची. मुंडे यांच्या या मोहिमेचा निवडणुकीत भाजपला फायदाही झाला होता. त्याच भाजपने कलानी यांच्या मुलाशी जुळवून घेतले आहे. यश संपादन करण्यासाठी भाजपने गावोगावच्या टग्यांना बरोबर घेण्यावर भर दिला असून, कलानीपुत्राला बरोबर घेणे हा त्याचाच भाग मानला जातो.

भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने भाजप आणि कलानीपुत्राच्या गटात युती झाली. कलानीपुत्राला भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश दिल्यास त्याची वेगळी प्रतिक्रिया उमटेल, अशी भीती भाजपला होती. यातूनच सोयीचा भाग म्हणून कलानीपुत्राशी भाजपने युती केली. अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश दिलेला नसला तरी युती करून भाजपने कलानी याचीच मदत घेतली आहे.

१९९२ च्या सुमारास काँग्रेसअंतर्गत राजकारणात शरद पवार यांना शह देण्याच्या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकराव नाईक यांनी पावले उचलली होती. त्याचाच भाग म्हणून ठाणे जिल्ह्य़ातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पप्पू कलानी आणि भाई ठाकूर यांना ‘टाडा’ कायद्यान्वये अटक करण्यात आली होती. त्यातून गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि कलानी, ठाकूर यांना पवारांनी केलेली मदत यावरून वातावरण ढवळून काढले होते. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरोधात तेव्हा मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढली होती. १९९५च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोघांनाही मुंडे यांच्या कठोर भूमिकेचा फायदा झाला होता. कलानीचे वादग्रस्त ‘सीमा रिसॉर्ट’ हे हॉटेल तत्कालीन जिल्हाधिकारी मधुकर पाटील यांनी जमीनदोस्त केले होते. तेव्हा मुंडे यांनी घटनास्थळी जाऊन अधिकाऱ्यांचे कौतुक करीत कलानीच्या हॉटेलमध्ये दहशतवादी आणि गुंडांना आसरा दिला जात होता, असा आरोपही केला होता. उल्हासनगरच्या राजकारणातही भाजपने कायम कलानी विरोधात भूमिका घेतली होती. पण सत्तेची आस लागलेल्या भाजपच्या मंडळींनी आता मुंडे यांनी लक्ष्य केलेल्या कलानीच्या पुत्राला पावन करून घेतले.  शिवसेनेने पाठिंबा काढल्यास हितेंद्र ठाकूर यांच्या तीन आमदारांची मदत लागेल हे गृहीत धरून वसई-विरारमध्ये ठाकूर कंपनीला भाजप सरकारने झुकते माप दिले आहे. ठाकूर यांच्या मनाप्रमाणेच फडणवीस सरकार निर्णय घेत असून, वसईतील हिरवळ किंवा नैसर्गिक संपदा नष्ट केली जात असल्याचा आरोप फादर दिब्रिटो, मनवेल तुस्कानो व मार्कुस डाबरे यांनी अलीकडेच केला.

स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात – भांडारी

कलानीपुत्राला पक्षात प्रवेश देण्यात आलेला नाही. तसा प्रस्तावही नव्हता. फक्त स्थानिक पातळीवर काही निर्णय घ्यावे लागतात. यानुसार कलानी यांच्या मुलाच्या गटाबरोबर जागांचे वाटप झाले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pappu kalani and bjp in bmc election
First published on: 30-01-2017 at 01:35 IST