देशभरात महाविद्यालयीन पातळीवर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या दिल्ली विद्यापीठातील निवडणुकांचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यामध्ये भाजपशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभविप) उमेदवारांनी चारही जागांवर विजय मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवारांना धूळ चारली. ‘अभविप’च्या सतिंदर आवाना, सनी देढा, अंजली राणा आणि छत्रपाल यादव या उमेदवारांनी अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, उप-सचिवासाठीच्या पदांवर विजय मिळवला.
दिल्ली विद्यापीठात यापूर्वी भाजपची सत्ता असली तरी यावेळी त्यांच्यापुढे आम आदमी पक्षाच्या छात्र युवा संघर्ष संघटनेचे कडवे आव्हान होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, ती सपशेल फोल ठरली. दरम्यान, गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या आक्रमक प्रचारानंतर शुक्रवारी या निवडणुकीसाठीची मतदानप्रक्रिया पार पडली होती. त्यासाठी ५० महाविद्यालयांतून जवळपास ४२ टक्के मतदान झाले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला आपकडून दारूण पराभव स्विकारावा लागला होता.